शिक्षक समितीतर्फे
आंदोलनाचा इशारा

शिक्षक समितीतर्फे आंदोलनाचा इशारा

Published on

शिक्षक समितीतर्फे
आंदोलनाचा इशारा
सिंधुदुर्गनगरी : गेल्या वर्षभरात प्राथमिक शिक्षकांचे विविध प्रश्न प्रलंबित राहिले असून हे प्रश्न ५ जानेवारीपर्यंत निकाली न काढल्यास ७ जानेवारीपासून जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कार्यालयासमोर बेमुदत साखळी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्राथमिक शिक्षक समितीने दिला आहे. ऑगस्ट २०२६ मध्ये संघटनेने प्रशासनाला आंदोलनाची नोटीस दिली होती. त्या वेळी प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने प्रश्न अधिकच जटिल झाले आहेत. त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. हे प्रश्न विहित मुदतीत न सुटल्यास आंदोलन करण्याचा निर्णय जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस व जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना दिलेल्या नोटीसमध्ये कळविला आहे.
--------------
पोलिस दलातर्फे
दुचाकी रॅली
सिंधुदुर्गनगरी ः महाराष्ट्र पोलीस दलाचा वर्धापन दिन (रेझिंग डे) २ जानेवारीला साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त २ ते ८ जानेवारी या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलातर्फे विविध जनजागृतीपर व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या उपक्रमांचा एक भाग म्हणून सिंधुदुर्ग पोलिस दल व उप प्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता.५) सकाळी साडेआठला दुचाकी रॅलीचे आयोजन केले आहे. ही रॅली पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर व अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या उपस्थितीत होणार आहे. रॅलीचा प्रारंभ कुणकेश्वर (ता. देवगड) येथून होणार असून ती कुणकेश्वर-आचरा-मालवण-निवती-वेंगुर्ला या सागरी महामार्गाने जात वेंगुर्ला येथील बॅ. नाथ पै क्रीडांगणात समाप्त होईल. जिल्ह्यातील नागरिकांनी स्वतःची दुचाकी घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पोलिस दलाने केले आहे. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी क्यूआर कोड स्कॅन करून नोंदणी करावी, असेही कळविले आहे.
------------------
पणजी येथे २७ ला
पेन्शन अदालत
सिंधुदुर्गनगरी ः टपाल विभागाच्या पेन्शनधारकांच्या तक्रारींचे प्रभावी निवारण करण्यासाठी गोवा टपाल क्षेत्रामार्फत टपाल पेन्शन अदालत आयोजित करण्यात येणार आहे. ही पेन्शन अदालत मंगळवार, २७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता पोस्टमास्टर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी येथील कार्यालयात होणार आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग विभागाचे अधीक्षक डाकघर यांनी दिली. गोवा टपाल क्षेत्रात (गोवा राज्य तसेच महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हे) टपाल विभागातून सेवानिवृत्त झालेले किंवा दिवंगत झालेले कर्मचारी व त्यांच्या वारसांच्या पेन्शन मंजुरीस तीन महिन्यांहून अधिक कालावधी झालेल्या तक्रारी या अदालतीत विचारात घेतल्या जाणार आहेत. मात्र, वारसा हक्काचे वाद व धोरणात्मक स्वरूपाच्या तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत. इच्छुक पेन्शनधारकांनी विहित नमुन्यात अर्ज १५ जानेवारी २०२६ पूर्वी महेश एन., वरिष्ठ लेखा अधिकारी/सचिव, पेन्शन अदालत, पोस्टमास्टर जनरल कार्यालय, गोवा क्षेत्र, पणजी या पत्त्यावर पाठवावेत. १५ जानेवारीनंतर प्राप्त अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
----------------
बेरोजगारांसाठी
प्रशिक्षण योजना
सिंधुदुर्गनगरी ः राज्यातील युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण मिळून रोजगारक्षम बनविण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्र शासनाने २०२४-२५ पासून सुरू केली आहे. जिल्ह्यातील बेरोजगार युवकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत १२ वी उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींना ६ हजार, आयटीआय व पदविकाधारकांना ८ हजार, तर पदवीधर व पदव्युत्तर प्रशिक्षणार्थींना १० हजार रुपये प्रतिमाह विद्यावेतन ११ महिन्यांपर्यंत दिले जाणार आहे. १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार पात्र असून शिक्षण सुरू असलेले, ‘एनएपीएस’, ‘एमएपीएस’ उमेदवार अपात्र राहतील. इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळावर नोंदणी करावी. योजनेबाबत अडचण असल्यास संपर्क साधावा, अथवा जिल्हा कौशल्य विकास कार्यालयास प्रत्यक्ष भेट द्यावी.
----------------
दिव्यांगांसाठी
रोजगार मेळावा
सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील दिव्यांग बेरोजगार उमेदवारांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत दिव्यांग रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांनी दिली. दिव्यांग व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार हा मेळावा होणार असून जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खासगी आस्थापनांनी आपल्याकडील रिक्त पदांची माहिती जिल्हा कौशल्य विकास कार्यालयास कळवावी, असे आवाहन केले आहे. रिक्त पदे अधिसूचित झाल्यानंतर मेळाव्याची तारीख निश्चित करून संबंधित आस्थापनांना व उमेदवारांना कळविण्यात येणार आहे. योजनेची सर्व प्रक्रिया ऑनलाईन असून एईबीएएस प्रणालीद्वारे उपस्थिती नोंदणी अनिवार्य आहे. दिव्यांग उमेदवार व आस्थापनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com