रत्नागिरी- अश्मयुगापासून ते मध्ययुगापर्यंतचा उलगडला इतिहास

रत्नागिरी- अश्मयुगापासून ते मध्ययुगापर्यंतचा उलगडला इतिहास

Published on

rat2p18.jpg-
15187
सांची स्तूप परिसराला भेट देताना गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे विद्यार्थी.
rat2p19.jpg
15188
भीमबेटका येथील प्रागैतिहासिक काळातील भित्तीचित्रांसोबत विद्यार्थी.
------------

अश्मयुगापासून ते मध्ययुगापर्यंतचा उलगडला इतिहास
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या शोध व बोध मंडळाची भीमबेटका, सांची वारसास्थळांना भेट
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : मध्यप्रदेशातील भोपाळ व विदिशा परिसरातील ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसास्थळांना विद्यार्थ्यांनी भेट देत उत्तर पुराश्मयुगीन काळापासून ते बाराव्या शतकापर्यंतच्या इतिहासाचा मागोवा घेतला. निमित्त होते गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) व अभ्यंकर–कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील इतिहास शोध व बोध मंडळातर्फे आयोजित इतिहासाच्या विद्यार्थ्यांच्या अभ्याससहलीचे.
सहलीत विद्यार्थ्यांनी सांची स्तूप, सतधारा स्तूप, उदयपूर येथील नीलकंठेश्वर मंदिर, ग्यारसपूर येथील ब्रजमठ मंदिर, देखीनाथ स्तूप, आठखंबा मंदिर, हिंदोळा तोरण, मालादेवी मंदिर, विदिशा व भोपाळ येथील संग्रहालयांची पाहणी केली. गुर्जर–प्रतिहार काळातील नीळकंठेश्वर व मालादेवी मंदिरे ही नागरशैलीतील स्थापत्याची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. त्यामध्ये हिंदू व जैन स्थापत्यशैलीचा सुंदर संगम विद्यार्थ्यांना अभ्यासता आला. उदयगिरी गुंफा व हेलिओडोरस स्तंभसारख्या महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांबाबत विद्यार्थ्यांना माहिती मिळाली. पृथ्वीचे कर्कवृत्त ज्या ठिकाणाहून जाते तेथेही विद्यार्थ्यांनी भेट दिली. मध्यप्रदेश शासनातील उच्चशिक्षण, आयुष व तांत्रिक शिक्षणमंत्री इंदरसिंह परमार यांनी मध्यप्रदेश भेटीवर आलेल्या विद्यार्थ्यांची आवर्जून भेट घेतली. विद्यार्थ्यांना भारतीय ज्ञानपरंपरेचा वारसा जपून विकसित भारत घडवण्याची जबाबदारी स्वीकारण्यासंबंधी मार्गदर्शन केले. या सहलीला ३१ विद्यार्थी व ४ शिक्षक सहभागी झाले. पुरातत्त्व अभ्यासक मंदार चौधरी यांनी मार्गदर्शक म्हणून सखोल व अभ्यासपूर्ण माहिती दिली. सहलीचे नियोजन प्रा. निनाद तेंडुलकर व डॉ. पंकज घाटे यांनी केले. सहलीच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. तन्वी कोळंबेकर व प्रा. अपर्णा तगारे यांचे सहकार्य लाभले.

चौकट
बौद्ध भिक्षूंशी संवाद
विदिशा येथील सतधारा स्तूप येथे दिलेल्या भेटीवेळी दार्जिलिंग येथील काही बौद्ध भिक्षू स्तुपाची प्रार्थना आणि अन्य धार्मिक विधी करण्यासाठी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने त्यांच्याशी संवाद साधत बौद्ध धर्मातील प्रार्थना, धार्मिक विधी व त्यामागील आध्यात्मिक अर्थ जाणून घेतला तसेच त्यांच्या पूजाविधींमध्ये सहभाग नोंदवला. या थेट संवादामुळे इतिहासाशी जोडलेले जिवंत धार्मिक व सांस्कृतिक जीवन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवता आले.

कोट
प्रागैतिहासिक कलेसाठी प्रसिद्ध जागतिक वारसास्थळ भीमबेटका येथे आदिम काळातील मानवाने अनेक गुहा व शैलाश्रयांचा (रॉकशेल्टर) वापर केला होता. शैलचित्रांमध्ये पाळीव व वन्यप्राणी, शिकारीचे प्रसंग, मासेमारी, नृत्य, संगीत, धार्मिक विधी, जन्म-मृत्यूच्या घटना पाहिल्या. प्रागैतिहासिक मानवाच्या जीवनाचे चित्रकलेद्वारे उमटलेले प्रत्यक्ष आलेख तेथील भिंतींवर पाहून विद्यार्थी स्तिमित, आश्चर्यचकित झाले.
- डॉ. पंकज घाटे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com