किल्ले रसाळगडावर खडा पहारा मोहीम यशस्वी
रसाळगडावर ‘खडा पहारा’ यशस्वी
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २ : तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले रसाळगडावर आयोजित केलेली खडा पहारा मोहीम यशस्वी झाली. वर्षअखेरीस मोठ्या प्रमाणात पर्यटक गडावर येत असल्याने गडाचे पावित्र्य जपण्यासाठी शिवप्रेमी व दुर्गप्रेमींनी ही विशेष मोहीम राबवली, अशी माहिती दुर्गप्रेमी व युवा सामाजिक कार्यकर्ते वैभव सागवेकर यांनी दिली.
नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटक किल्ले रसाळगडावर दाखल होत असताना कोणत्याही प्रकारचा धुडगूस होऊ नये तसेच गडाची स्वच्छता व पावित्र्य अबाधित राहावे यासाठी शिवप्रेमींनी गडावर कडक पहारा ठेवला होता. या वेळी मद्यपान, गोंधळ, असभ्य वर्तन किंवा गडाच्या ऐतिहासिक वारशाला बाधा पोहोचेल अशी कोणतीही कृती होऊ नये याबाबत विशेष दक्षता घेण्यात आली. गडकोट हे केवळ दगडमातीचे नसून, ते आपला श्वास आहेत. आपल्या महापुरुषांनी व पूर्वजांनी या किल्ल्यांसाठी रक्त सांडले आहे. त्यामुळे प्रत्येकाने गडकिल्ल्यांचे पावित्र्य राखणे ही आपली जबाबदारी आहे, असा संदेश या मोहिमेदरम्यान देण्यात आला. या मोहिमेत कोकण दौलत प्रतिष्ठानचे मावळे समीर उतेकर, सचिन जड्याळ, विनोद मिंडे, विक्रांत निकम, संग्राम कदम, सुरज गायकवाड, हिमांशू कुडाळकर, विपुल करबेले तसेच गावातील अन्य दुर्गप्रेमी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

