रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यांचे होणार रक्षण

रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यांचे होणार रक्षण

Published on

रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यांचे होणार रक्षण
गणपतीपुळे, आरे, नेवरेत संरक्षक बंधारे ः सीआरझेडच्या परवानगीनंतर कामाला मुहूर्त
रत्नागिरी, ता. २ : कोकण किनारपट्टीला सातत्याने बसणारा चक्रीवादळाचा तडाखा आणि समुद्राच्या उधाणामुळे होणारी जमिनीची धूप रोखण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. कोकण आपत्ती निवारण योजनेंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे, आरे आणि नेवरे या तीन महत्त्वाच्या किनाऱ्यांवर सुमारे १२ ते १३ कोटीचे संरक्षक बंधारे बांधण्यात येणार आहेत. हे जुने प्रस्ताव असून, शासनाने त्याला मंजुरी दिली आहे; परंतु किनारी नियमन क्षेत्राची (सीआरझेड) परवानगी अनिवार्य केल्याने या कामाला खो बसला आहे. सीआरझेडच्या परवानगीनंतरच या कामाला मुहूर्त मिळणार आहे. पत्तन विभागाने याला दुजोरा दिला.
महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने या कामाला हिरवा कंदील दिला आहे. सीआरझेडच्या परवानगीनंतरच कामाचा श्रीगणेशा होणार आहे. समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे किनारपट्टीवरील बागा आणि वस्त्यांना धोका निर्माण झाला आहे, हे लक्षात घेऊन सरकारने गणपतीपुळे येथे सुमारे साडेपाचशे मीटरचा तीन ते चार कोटींचा धूपप्रतिबंधक बंधारा मंजूर केला आहे. आरे किनारी ८२५ मीटर लांबीच्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्यासाठी ६ कोटी मंजूर आहेत. पत्तन अभियंता विभागाकडून या कामाची क्षेत्र निश्चिती आणि आखणी पूर्ण झाली आहे, तसेच नेवरे किनारी ५२५ मीटर लांबीच्या संरक्षक कामासाठी ३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड आणि पत्तन अभियंता विभागाच्या देखरेखीखाली होणारी ही कामे आधुनिक निकषांनुसार केली जात आहेत. केवळ पारंपरिक दगडी बंधारे न उभारता हवामान बदलाचे आव्हान लक्षात घेऊन लाटांची तीव्रता आणि भविष्यातील समुद्राची वाढणारी पातळी याचा विचार करण्यात आला आहे. त्याप्रमाणे या बंधाऱ्यांची उंची आणि मजबुती निश्चित करण्यात आली आहे.


घरे, नारळीच्या
बागांना मिळणार संरक्षण
या तिन्ही संरक्षक बंधाऱ्यांमुळे लोकवस्तीचे, किनाऱ्याचे आणि खाऱ्या पाण्यापासून शेतीचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागत असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. या प्रकल्पामुळे किनारपट्टीवरील घरांना आणि नारळ-पोफळीच्या बागांना उधाणाच्या धोक्यापासून कायमस्वरूपी संरक्षण मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com