फिजिओ संवाद
rat4p2.jpg-
O15433
डॉ. पुष्कराज चांदोरकर
फिजिओ संवाद ..........लोगो
इंट्रो
फक्त क्लिनिकमध्ये अडकलेली फिजिओथेरपी आपल्याला घराघरात घेऊन जाणे गरजेचे आहे. फिजिओथेरपी ही केवळ दुखणं कमी करण्याची उपचार पद्धती नसून; शरीर कसं काम करतं, असंतुलन कुठे आहे, आणि कुठल्या गोष्टी सुधारण्याची गरज आहे हे समजून घेण्याची शास्त्रशुद्ध पद्धती आहे. दुखणे आल्यानंतर जशी फिजिओथेरपी केली जाते तशीच दुखणं येऊ नये म्हणून देखील फिजिओथेरपी करणे हा अतिशय उत्तम निर्णय ठरू शकतो. जीवनशैलीतील छोटे छोटे बदल आपल्या दुखण्यामध्ये खूप प्रमाणात परिणाम करत असतात. त्यामुळे काही गोष्टींमध्ये छोटेसे केलेले बदल आपल्या दुखण्यावर प्रभावी ठरतात.
- डॉ. पुष्कराज चांदोरकर
(PT)B.P.Th.
ई-मेल - cpushkaraj07@gmail. com
--------------------------------------------
फिजिओथेरपी घराघरात घेऊन जाणे गरजेचे
नमस्कार वाचकहो! ‘न हि रोगात् परं दुःखं | न हि तुष्टात् परं सुखम् ||’ अर्थात रोगापेक्षा मोठे दुःख नाही आणि समाधानापेक्षा मोठे सुख नाही. ही ओळ वाचायला जेवढी चांगली वाटते, तेवढीच प्रत्यक्ष अनुभवायला कठीण. एखादी वेदना आपल्या वाटेला येईपर्यंत आपण आपल्याकडे असलेल्या चांगल्या शरीराचा, चांगल्या बुद्धीचा, चांगल्या आरोग्याचा, चांगल्या जीवनाचा कधीच गांभीर्याने विचार करत नाही. पण एकदा का वेदना पाठीला लागली की मग ‘‘बाकी सर्व ठीक आहे; पण हे दुखणं मात्र त्रास देत आहे’’ अशी वाक्ये सर्रास ऐकू येऊ लागतात. आपले आरोग्य संतुलित असण्यातच खरं समाधान आहे आणि समाधान हेच सुख आहे ही गोष्ट तेव्हा लक्षात येऊ लागते. थोडक्यात काय तर वेदना येऊ न देणे किंवा आलेली वेदना अंगावर न काढणे ही गोष्ट किती महत्त्वाची आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे.
फिजिओथेरपी हा शब्द ऐकला की लोकांच्या मनात बऱ्याच गोष्टी येतात; पण त्यापैकी किती बरोबर आहेत आणि किती चूक ? एखादी दुखापत घडल्यानंतरच फिजिओथेरपी करावी का ? एखाद्या सर्जनने किंवा फिजिशियनने तुम्हाला सांगितल्यानंतरच फिजिओथेरपी करावी का? व्यायामाची काय गरज आहे का ? व्यवस्थित व्यायाम करून सुद्धा माझं दुखणं का जात नाही? एवढ्या कमी वयात मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी का बरं येऊ लागली आहे ? वेदनेचे मूळ नेमकं कुठे आहे ? व्यायाम कधी करावा ? कसा करावा? व्यायामाच्या जोडीने आहाराचे महत्त्व काय आहे? दुखण्यावर फक्त पेनकिलर हाच उपाय आहे का ? ऑपरेशनचा पर्याय केव्हा निवडावा ? एखादा आजार कसा टाळता येऊ शकतो ? किंवा एखादं दुखणं त्याच्या पहिल्या काही दिवसांतच थांबवणं गरजेचं का असतं ? महिलांच्या समस्या आणि त्यावेळी फिजिओथेरपी फायदेशीर ठरू शकते का ? मानसिक स्वास्थ्य आपल्या दुखण्यावर कसे परिणाम करते ? अशा प्रकारच्या बऱ्याच शंका सततच सगळ्यांच्या मनात येत असतात.या लेखमालेतून आपण या सगळ्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करूया. फिजिओथेरपी बद्दल असलेले गैरसमज, फिजिओथेरपी मध्ये वापरले जाणारे नवीन तंत्रज्ञान, विविध आजार आणि त्यावर फिजिओथेरपीने चांगल्या प्रकारे उपचार कसे करता येऊ शकतात याबद्दलची माहिती, अशा अनेकविध विषयांवर आपण चर्चा करणार आहोत. योग्य वेळी केलेली फिजिओथेरपी तुम्हाला शस्त्रक्रिया टाळण्यासाठी फायदेशीर ठरते.
फिजिओ-संवाद हा एक डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातला संवाद नसून; तुम्ही आणि तुमचे शरीर यांच्यातला संवाद आहे. त्यामुळे हा संवाद चांगल्या पद्धतीने होण्यासाठी ‘‘आरोग्यं परमं भाग्यम्’’ असं म्हणत प्रत्येकाने शरीराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. तर मग संवादाला सुरुवात करूया आणि भेटूया प्रत्येक बुधवारी एका नवीन लेखातून.
(लेखक लांजा येथे अनादि फिजिओथेरपी क्लिनिक चालवतात )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

