साटेली महापुरुष जत्रोत्सव उद्या
साटेली महापुरुष
जत्रोत्सव उद्या
सावंतवाडीः साटेली-खालचीवाडी (गचकूळ) येथील श्री महापुरुष देवाचा वार्षिक जत्रोत्सव बुधवारी (ता. ७) होणार आहे. यानिमित्त सकाळी अभिषेक, ब्राह्मण भोजन, रात्री १० वाजता पावणी, त्यानंतर पार्सेकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महापुरुष देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
...................
सातार्ड्यातील
‘एटीएम’ बंद
सावंतवाडी ः बँक ऑफ इंडियाच्या सातार्डा येथील शाखेचे एटीएम गेल्या आठ दिवसांपासून बंद असल्याने शिंदे शिवसेनेचे ओबीसी जिल्हाप्रमुख सुदन कवठणकर यांनी बँकेचे महाप्रबंधक एस. यू. आकमार यांची भेट घेऊन चर्चा केली. सेंट्रल बँकेच्या सातार्डा शाखेचे एटीएम बंद असल्याने दशक्रोशीतील ग्राहकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे नवीन एटीएम मशीन बसवून येत्या पंधरा दिवसात ग्राहकांना एटीएम सुविधा देण्यात येणार आहे, असे महाप्रबंधक आकमार यांनी यावेळी सांगितले.
....................
कणकवली येथे
‘क्वांटम’चे धडे
कणकवली ः एसएसपीएम अभियांत्रिकी महाविद्यालय, कणकवली येथे ‘क्वांटम टेक्नॉलॉजी : ट्रान्सफॉर्मेटिव्ह अॅप्रोच फॉर नेक्स्ट जनरेशन कम्प्युटिंग’ या विषयावर एआयसीटीई प्रायोजित अटल फल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (एफडीपी) ऑनलाईन पद्धतीने ८ ते १३ डिसेंबर या कालावधीत झाला. कार्यक्रमाला देशभरातील विविध शैक्षणिक संस्था, संशोधन संस्थांचे संशोधक तसेच उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांकडून ३०० हून अधिक नोंदणी प्राप्त होत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी कॅनडा, युनायटेड किंगडम आणि भारतातील प्रख्यात विद्यापीठे व उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांना व्याख्यानांसाठी आमंत्रित करण्यात आले होते. खासदार नारायण राणे, एसएसपीएमच्या अध्यक्षा नीलम राणे, उपाध्यक्ष व आमदार नीलेश राणे, सचिव तथा पालकमंत्री नीतेश राणे, प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम डॉ. नितीन शिवशरण आणि प्रा. तन्मय कदम यांच्या समन्वयाखाली आयोजित केला होता. समन्वयक डॉ. डी. एस. बाडेकर होते. प्रा. सचिन वंजारी, प्रा. सुप्रिया नलावडे यांनी सहसमन्वयक म्हणून काम पाहिले.
.....................
दुकानवाड पुलाचे
काम युध्दपातळीवर
माणगावः दुकानवाड पुलाच्या कामाला गती आली असून दोन ते तीन महिन्यांत हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. गेल्यावर्षी या पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती; परंतु पाऊस लवकर सुरू झाल्याने काम थांबविण्यात आले होते. यावर्षी मात्र ठेकेदाराने लवकरच काम सुरू केल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. गेली अनेक वर्षे या पुलाची प्रतीक्षा होती. ठाकरे सरकार असताना या पुलाला मंजुरी मिळाली होती. ठाकरे सरकार गेल्याने कामाला निधी मिळत नव्हता. नंतर महायुतीच्या सरकारने निधीची तरतूद केली आणि गेल्यावर्षी उशिराने काम सुरू झाले, परंतु पावसाळा लवकर सुरू झाल्याने ठेकेदाराला काम अर्धवट सोडावे लागले होते. या पुलाचा प्रश्न मार्गी लागल्याने उपवडे, आंजिवडे व वसोली या गावांचा बारमाही वाहतुकीचा प्रश्न मिटणार आहे.
.....................
विकासकामांचा
परमेत प्रारंभ
दोडामार्ग ः परमे येथे विविध योजनांतून २७ लाख रुपयांच्या कामांचा श्रीफळ वाढवून शुभारंभ झाला. अनेक वर्षांपासून प्रलंबित परमे मुख्य रस्ता ते फणसवाडी रस्ता काँक्रिटीकरणाचा समावेश आहे. हा रस्ता जिल्हा नियोजन (१० लाख) व जिल्हा जनसुविधा योजनेतून (५ लाख) होणार आहे. पालकमंत्री नीतेश राणे यांच्या माध्यमातून व भाजप जिल्हा चिटणीस सुधीर दळवी, भाजप तालुका अध्यक्ष दीपक गवस यांच्या प्रयत्नांमुळे हा निधी उपलब्ध झाला आहे. यासाठी सरपंच प्रथमेश मणेरीकर, भाजप बूथ अध्यक्ष शैलेश बोर्डेकर यांनी पाठपुरावा केला. परमे मडाळवाडी येथे कालव्यावरील काँक्रेट पुलाचे कामही मंजूर झाले, १२ लाख खर्च अपेक्षित आहे. जिल्हा चिटणीस दळवी, सरपंच मणेरीकर, उपसरपंच सुनील गवस, शैलेश बोर्डेकर, संजना सावंत, गोपाळ गवस, संजय उसपकर, संतोष गावडे, पांडुरंग गावडे, सुशांत परमेकर, राजा गावडे, विठोबा गावडे, मनोहर बिर्जे, अशोक गावडे, सखाराम घोगळे, सुभाष गावडे आदी उपस्थित होते.
....................
न्हावेलीत ११ पासून
योगोपचार शिबिर
सावंतवाडी ः न्हावेली पंचक्रोशीतील नागरिकांच्या निरोगी आरोग्यासाठी पतंजली योग समिती, सिंधुदुर्ग यांच्या वतीने निःशुल्क संयुक्त योगोपचार शिबिराचे आयोज़न करण्यात आले आहे. हे शिबिर ११ ते १६ जानेवारी या कालावधीत न्हावेली येथील सदगुरू हॉल, मोर्ये निवास (सोनुर्ली तिठा) येथे दररोज सकाळी ५.३० ते ७ या वेळेत होणार आहे.
....................
कणकवलीत २० ला
निवृत्तांचा सत्कार
कुडाळः राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना सिंधुदुर्ग विभाग मेळावा व ७५ वर्षांवरील सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार समारंभ २० जानेवारीला सकाळी १० वाजता गणेश मंदिर शेजारील हॉल, विभागीय कार्यालय, कणकवली येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला सरचिटणीस सदानंद विचारे, कोषाध्यक्ष गणेश वायफळकर, सचिव पांडुरंग जाधव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या मेळाव्यात जे कर्मचारी २००६, ०७ व ०८ या वर्षात सेवानिवृत्त झाले आहेत व वयाची ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांचा केंद्रीय पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येणार आहे. संबंधितांनी १२ जानेवारीला आयोजित नियोजन बैठकीला हजर राहून नावनोंदणी करावी. अधिक माहितीसाठी बाबा आरोलकर, भाई राणे यांना संपर्क करावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

