-मी माझ्या मनाची काळजी घेईन

-मी माझ्या मनाची काळजी घेईन

Published on

राखूया मनाचे आरोग्य .........लोगो

मी माझ्या मनाची काळजी घेईन

आपल्या समाजात मानसिक आजारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अजूनही संकुचित आहे. मानसोपचारतज्ज्ञांकडे जाणे म्हणजे ‘वेडेपण’ नसून ती मनाची मशागत आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. सततची चिंता, नैराश्य किंवा निद्रानाश यांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे रूपांतर गंभीर समस्येत होऊ शकते. सामाजिक भीतीपोटी उपचार टाळण्याऐवजी तज्ज्ञांची मदत घेतल्यास आयुष्य अधिक सुसह्य आणि आनंदी होऊ शकते. मनात साठवलेल्या भावनांना वाट करून देणे, ताणतणावाचे व्यवस्थापन करणे आणि स्वसंवाद साधणे ही सुदृढ आयुष्याची गुरूकिल्ली आहे. या नवीन वर्षात, मानसिक आरोग्याभोवती असलेले गैरसमज मोडून काढूया आणि एक पाऊल निरोगी मनाकडे टाकूया.
- rat५p७.jpg-
P26O15653
- डॉ. स्नेहल तोडकर-अंधारे, रत्नागिरी
एमबीबीएस, डी. पी. एम., एमआयपीएस
------
नववर्षात पदार्पण करताना आपण अनेक संकल्प केले असणार. डाएट करणे, जिम लावणे किंवा नवीन कौशल्य शिकणे आदी; पण या धावपळीच्या जगात आपण आपल्या मनाच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला विसरतो. ‘आरोग्य’ म्हणजे केवळ आजाराचा अभाव नव्हे तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या सुदृढ असणे होय.
मानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात शारीरिक आरोग्याइतकेच ‘मानसिक आरोग्य’ जपणे ही काळाची गरज बनली आहे. चिंता आणि नैराश्य या समस्या सर्वसामान्य झाल्या आहेत. अनेकदा आपण शारीरिक जखमेवर तातडीने उपचार करतो; मात्र मनाच्या वेदनांकडे ‘हे तर असच चालतं’ म्हणून दुर्लक्ष करतो. मानसिक आरोग्य ही काळाची गरज आणि गैरसमजांचा शेवट आहे, हे लक्षात ठेवा. मन सुदृढ असेल तरच आपण आयुष्यातील आव्हानांना धैर्याने सामोरे जाऊ शकतो. बदलत्या जीवनशैलीच्या परिणामी सततचा स्क्रीनटाईम, सोशल मीडियावरील तुलना आणि अपुरी झोप यामुळे आपल्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होत आहे. आपण इतरांच्या आयुष्यातील ‘हायलाईट्स’ पाहून स्वतःच्या आयुष्याबद्दल नकारात्मक विचार करू लागतो. यामुळे आत्मविश्वास कमी होणे आणि चिडचिड होणे अशा समस्या उद्भवतात.
जर तुम्हाला सतत उदास वाटत असेल, झोप येत नसेल, भूक लागत नसेल किंवा दैनंदिन कामे करण्यात अडथळा येत असेल तर मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेण्यास संकोच करू नका. मानसोपचारतज्ज्ञांकडे जाणे म्हणजे ‘वेडेपण’ नव्हे तर आपल्या मनाची काळजी घेण्याचे ते एक धाडसी पाऊल आहे. वेळेवर घेतलेला तज्ज्ञांचा सल्ला आणि समुपदेशन एखाद्याचे आयुष्य बदलू शकते. मनमोकळेपणाने बोलणे, पुरेशी झोप घेणे आणि व्यायामासोबतच गरज पडल्यास मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणे यात कोणतीही भीती किंवा लाज वाटू नये. लक्षात ठेवा, निरोगी मन हेच सुखी जीवनाचे मर्म आहे.
नव्या वर्षाचा आणखी एक संकल्प करा. यावर्षी स्वतःला वचन द्या की, ‘मी माझ्या मनाची काळजी घेईन.’ स्वतःवर प्रेम करा, स्वतःला माफ करायला शिका आणि इतरांच्या मानसिक संघर्षाबद्दल संवेदनशीलता बाळगा. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, मानसिक स्वास्थ्याशिवाय आरोग्य पूर्ण होऊ शकत नाही. मानसिक आरोग्य बिघडण्याची काही लक्षणे पुढीलप्रमाणे, सतत चिडचिड होणे किंवा उदास वाटणे. झोप न येणे किंवा अन्नावरची वासना उडणे. कामात लक्ष न लागणे आणि सतत भीती वाटणे. लोकांपासून दूर राहण्याची प्रवृत्ती वाढणे. मानसिक आरोग्य ही एक प्रवासाची प्रक्रिया आहे, एका दिवसाचा निकाल नाही. चला, २०२६ हे वर्ष ‘मानसिक सजगतेचे’ वर्ष म्हणून साजरे करूया.

(लेखक सुवर्णपदकप्राप्त मानसोपचार, व्यसनमुक्तीतज्ज्ञ व समुपदेशक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com