रत्नागिरी- आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन उपक्रमात मराठीचा यशस्वी वापर
rat५p१.jpg-
P२६O१५६३३
रत्नागिरी : मराठी भाषेसाठी समर्पित करण्यात आलेल्या कोकण कोस्टल मॅरेथॉनमध्ये मराठीतूनच फलकांचा वापर करण्यात आला. स्टार्ट लाईनऐवजी प्रारंभ आणि फिनिशच्याऐवजी सुफळ संपूर्ण असे लिहिण्यात आले.
---
आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन उपक्रमात मराठीचा वापर
प्रसाद देवस्थळी ः कोकण कोस्टलच्या तिसरे पर्वाला उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ : कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या तिसऱ्या वर्षी मराठी भाषेचा सन्मान आणि वापर हा मुख्य उद्देश ठेवून मॅरेथॉन यशस्वी करण्यात आली. मॅरेथॉनसारख्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या उपक्रमात जास्तीत जास्त मराठीचा वापर करून मराठी समजण्यास सोपी, आधुनिक आणि व्यवहारक्षम भाषा असल्याचे दाखवून दिले, अशी माहिती आयोजक सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संस्थापक प्रसाद देवस्थळी यांनी सांगितले.
कोकणात क्रीडापर्यटन वाढावे, या हेतूने तीन वर्षांपूर्वी अर्धमॅरेथॉनच्या आयोजनास सुरुवात केली. २०२४ मध्ये शिक्षण, २०२५ मध्ये जैवविविधता आणि यंदा मराठी भाषेकरिता मॅरेथॉन समर्पित होती. त्यामुळे अनेक शब्द मराठीतच वापरण्याचे ठरवले. मॅरेथॉनमधील इंग्रजी शब्दांना सोपे, समजण्यासारखे मराठी पर्याय काही प्रचलित इंग्रजी शब्दांसाठी नवे, अर्थपूर्ण मराठी शब्द वापरले. जसे पेसरसाठी गतिदूत, आयडॉलसाठी आदर्शदूत, आणि मोटिव्हेटरसाठी प्रेरणादूत, अॅंबेसेडरसाठी धावदूत, स्टार्टलाईनसाठी प्रारंभ व फिनिश लाईनसाठी सुफळ संपूर्ण असे शब्द वापरले. धावकाला देण्यात येणारा बिब नेम व नंबर हे प्रथमच मराठीत केले. त्यामुळे सर्व धावपटूंची नावे आणि क्रमांक मराठीत अचूकतेसह छापण्यात आली, असे देवस्थळी म्हणाले.
नोंदणी, सूचना व महत्त्वाच्या माहितीचे ई-मेल मराठी भाषेत पाठवण्यात आले. मॅरेथॉनच्या मार्गावर सर्वत्र संपूर्ण मार्गदर्शन मराठीत करण्यात आले. म्हणजे धावकांना दिसणारे अंतर पूर्ण झाले किंवा उरलेले अंतर असे सर्व फलक मराठीत लिहिण्यात आले होते. प्रचलित इंग्रजी शब्दांऐवजी मराठीतील योग्य शब्दांचा वापर करण्यात आला. या स्पर्धेकरिता मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचे, महाराष्ट्र शासनाची राज्य मराठी संस्था, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उदय सामंत फाउंडेशन यांचे भरीव सहकार्य लाभल्याचे देवस्थळी यांनी सांगितले.
चौकट
सर्व मॅरेथॉनमध्ये मराठी वापरणार
‘एक धाव मराठी भाषेसाठी’ म्हणजे भाषावाद किंवा प्रांतवाद आहे का? मुळीच नाही. ही आहे एक आश्वासक आणि सकारात्मक सुरुवात. आपली मातृभाषा केवळ घरात बोलण्यापुरती, नाटक, सिनेमा किंवा गाण्यांपुरती मर्यादित नाही तर व्यावसायिक, व्यवस्थापकीय आणि दैनंदिन वापरासाठीही ती तितकीच सक्षम आहे. महाराष्ट्रातील मॅरेथॉन आयोजकांना विनंती करतो की, यापुढे प्रत्येक मॅरेथॉनमध्ये मुक्तपणे, अभिमानाने आणि आत्मविश्वासाने मराठी वापरूया. कारण…म मराठीचा आहे, म मायबोलीचा आहे, म महाराष्ट्राचा आहे आणि म मॅरेथॉनचा आहे, असे देवस्थळी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

