नारळ, सुपारी विमा संरक्षणाअभावी अडचणीत
swt519.jpg व swt520.jpg
15691, 15690
तळकट ः येथील सुपारीच्या बागा.
नारळ, सुपारी विमा संरक्षणाअभावी अडचणीत
हजारो कुटुंबासमोर प्रश्न; बागायतदारांना वालीच नसल्याची धारणा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ ः वातावरणातील बदल आणि वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे कोकणातील नारळ आणि सुपारी ही दोन्ही पिके अडचणीत आली आहे. गेल्या पाच वर्षात या पिकांचे होणारे नुकसान कितीतरी पटीने वाढले आहे. यावर कोकणातील हजारो कुटुंब अवलंबून आहेत; मात्र या पिकांना विमा संरक्षण नसल्याने बागायतदारांना कोणी वालीच नसल्याची स्थिती आहे.
कोकणात आंबा काजू या बरोबरच नारळ आणि सुपारी ही पिकेही महत्त्वाची आहेत. विशेषतः किनारी आणि सह्याद्रीच्या रांगांमध्ये या पिकाखालील क्षेत्र जास्त आहे. सर्वसाधारणपणे नारळ बागायतीमध्ये आंतरपीक म्हणून सुपारीची लागवड केली जाते. एकट्या सिंधुदुर्गाचा विचार करायचा झाल्यास वेंगुर्ले, सावंतवाडी आणि दोडामार्ग या तालुक्यामध्ये मुख्य पीक म्हणून नारळ, सुपारीकडे पाहिले जाते. येथील शेकडो कुटुंब याची व्यवसायीक बागायतीकरतात. जिल्ह्यात सुमारे १८ हजार हेक्टर क्षेत्र नारळ पिकाखाली येते. सुपारी आंतरपीक असल्याने याचे लागवड क्षेत्र अगदी अचुकपणे मिळवणे कठीण असले तरी हे क्षेत्र १५ हजार हेक्टरच्या दरम्यान आहे. याच प्रमाणात रत्नागिरीमध्ये गुहागर, दापोली, मंडणगड आदी तालुक्यात मोठया प्रमाणात सुपारीचे पीक घेतले जाते. नारळ क्षेत्र तर पूर्ण कोकणात पसरले आहे. या दोन्ही पिकांवर अवलंबून असणार्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे.
असे असले तरी या दोन्ही पिकांकडे यंत्रणेचे फारसे लक्ष नसल्याची स्थिती आहे. ही पिके फक्त कोकणात व्यवसायीक पध्दतीने घेतली जात असल्याने शेतकऱ्यांची संघटीत ताकद मर्यादीत आहे. यामुळे त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचत नाही. ही बागायती एकदा विकसीत केली की दोन ते तीन पिढ्यांना उत्पन्न देवू शकते. याचा देखभाल खर्चही मोठा असतो. कारण नियमीत सिंचन सुविधा आवश्यक असते. अलिकडे वातावरण बदल आणि वन्य प्राण्यांच्या उपद्रवाने या पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे उत्पन्न आणि देखभाल खर्च याचा ताळमेळ बसताना दिसत नाही. या सगळ्यात यावर अवलंबून बागायतदार अडचणीत आले आहेत.
गेल्या पाच वर्षात सुपारीवरील गळ रोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. पावसातील अनियमीतता हे याचे मुख्य कारण आहे. यंदाही जवळपास ६० टक्केपेक्षा जास्त पीक गळून फुकट गेले आहे. शिवाय वातावरणाती चढ उतारामुळे संवेदनशील असलेल्या या पिकाच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. नारळावरही वातावरण बदलाचा परिणाम होवून उत्पन्न कमी झाले आहे. कोळे रोगाचा उपद्रव वाढल आहे. या शिवाय लालतोंडची माकडे, शेकरू यासह अन्य वन्य प्राण्यांचा उपद्रव खूप जास्त तीव्रतेने जाणवत आहे. यामुळे नारळाचे उत्पन्न अगदी ६० ते ७० टक्केपर्यंत घसरले आहे. सध्या नारळाला चांगला दर मिळत असला तरी हातात पीकच नसल्याने बागायतदार हतबल आहे.
या सगळ्याचा विचार करता ही दोन्ही पिके पंतप्रधान पीक विमा योजनेत समाविष्ट होणे आवश्यक आहे. सध्यातरी येथील आंबा, काजू ही दोनच फळपिके या योजनेत येतात. त्यामुळे त्या बागायतदारांना विमासंरक्षणाचा तरी आधार असतो. नारळ, सुपारी बागायतदारांना असा कोणताच आधार नसल्याची स्थिती आहे. विमा संरक्षण मिळाल्यास या बागायतदारांना दिलासा मिळणार आहे. बागायतीचे आर्थिक गणित बसवणे सोपे होणार आहे. असे न झाल्यास या दोन्ही पिकांखालील बागायती क्षेत्र अडचणीत येणार आहे. यातून बेरोजगारीचे प्रमाण वाढण्याची भिती आहे.
चौकट
आयुष्यभराची पुंजी
वादळात होते नष्ट
नारळ आणि सुपारी याचे उत्पन्न सुरू व्हायला ८ ते १५ वर्षे लागतात. यानंतर साधारण ३० किंव त्यापेक्षा जास्त वर्षे उत्पन्न मिळते; मात्र फलधारणा होईपर्यंत ही बागायती जगवण्यासाठी आर्थिकदृष्ट्या बरीच गुंतवणूक करावी लागते. अलिकडे वादळी वार्यांसह दिर्घकालीन पावसामुळे या दोन्ही पिकांची झाडे उन्मळून किंवा मोडून पडण्याचे प्रमाण वाढले आहे. ही झाडे पडल्यास त्या बागायतदाराची आयुष्यभराची पुंजी जमिनदोस्त होते. असे नुकसान झाले तर बागायतदाराला सावरणे कठीण बनते. या सगळ्यातून दिलासा मिळावा म्हणून शासनस्तरावर विचार होणे आवश्यक आहे.
कोट
नारळ आणि सुपारी ही दोन्ही पिके महाराष्ट्र सरकारच्या हद्दीत वर्षानुवर्षे दुर्लक्षीत आहेत. हमीभावापासून इतर कितीतरी मागण्या करून शेतकरी थकला आहे. लगतच्या गोव्यात याच पिकांना बर्यापैकी राजाश्रय आहे. ही स्थिती बदलणे आवश्यक आहे. या दोन्ही पिकांना विमा संरक्षण दिल्यास काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.
- दीपक नाटेकर, बागायतदार, तळकट
कोट
मागील काही वर्षाच्या तुलनेत गेली दोन तीन वर्ष सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे सुपारी पिकांमध्ये बुरशीचे प्रमाण वाढते. त्यानतंर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. त्याचा विपरित परिणाम सुपारी पिकांवर होत आहे. मोठ्या प्रमाणात फळगळ होते. शेतकऱ्यांनी पावसाळ्यात पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी खबरदारी घ्यावी. सुपारी बागेत स्वच्छता ठेवावी, पुर्ण बागेत सुर्यप्रकाश पोहोचेल, अशी रचना ठेवावी. विद्यापीठाने बुरशीकरीता शिफारस केलेल्या बुरशीनाशकांची फवारणी करावी.
- डॉ. के. व्ही. मालसे, शास्त्रज्ञ, भाटये संशोधन केंद्र, रत्नागिरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

