जनतेच्या सुरक्षेततेसाठी कडक नियम अवलंबा
swt५२६.jpg
१५७२०
देवगड ः येथे रस्ते सुरक्षा अभियानाचे उद्घाटन पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते झाले. बाजूला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. मोहन दहिकर. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)
जनतेच्या सुरक्षेततेसाठी कडक नियम अवलंबा
पालकमंत्री नीतेश राणेः देवगडात ‘रेझिंग डे’ निमित्त मोटारसायकल रॅली
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ५ ः जिल्ह्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करून नागरिकांचे जीवन अधिक सुरक्षित करण्यासाठी प्रसंगी राजकारण म्हणून एखाद्या निवडणूकीत त्रास झाला तरी चालेल परंतु जनतेच्या कल्याणासाठी पोलीस आणि परिवहन विभागाने संयुक्तपणे नियमांची कडक अंमलबजावणी करावी, असे आवाहन पालकमंत्री नीतेश राणे यांनी येथे केले. पर्यावरणपुरक संदेश देण्यासाठी प्रशासकीय पातळीपासून ईलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्य पोलीस दल वर्धापन दिनाच्या अनुषंगाने विविध जनजागृती कार्यक्रम अंतर्गत जिल्हा पोलीस दल व उपप्रादेशिक परिवहन विभाग सिंधुदुर्ग यांच्यावतीने रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत आयोजित मोटारसायकल रॅलीचे उद्घाटन पालकमंत्री श्री. राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलिस अधिक्षक डॉ. मोहन दहिकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे, उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार रमेश पवार, सहायक गटविकास अधिकारी विनायक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव, उद्योगपती नंदकुमार घाटे, माजी आमदार अॅड. अजित गोगटे, डॉ. सतीश लिंगायत, विक्रम देशमुख उपस्थित होते.
सुरूवातीला येथील शेठ म. ग. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा तर गिर्ये येथील भाऊसाहेब लोकेगावकर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीबाबत पथनाट्यातून जनजागृती केली. श्री. राणे म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी करून नागरिकांचे जीवन सुरक्षित ठेवणे ही सामूहिक जबाबदारी आहे. मनुष्य गमावल्यावर संबधित कुटुंबाला त्याची झळ बसते. याकरिता राजकारण म्हणून प्रसंगी एखाद्या निवडणूकीत त्रास झाला तरी चालेल परंतु जनतेच्या कल्याणासाठी पोलीस आणि परिवहन विभागाने संयुक्तपणे नियमांच्या कडक अंमलबजावणीवर भर द्यावा. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. विशेषतः तरुणांनी वाहन चालवताना आवश्यक काळजी घ्यावी. जीवन सुरक्षित ठेवणे हेच उद्दिष्ट आहे. पालकांनीही आपल्या पाल्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती द्यावी. पर्यावरणपुरक संदेश देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन द्यावे, आपलाही तसाच आग्रह राहील.’’
जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी, घराबाहेर पडताना स्वतःलाच वाहतुकीच्या नियमांची आठवण करून दिल्यास रस्ते अपघात टाळता येऊ शकतात. वाहन चालवताना नियमांची माहिती असणे आणि ते प्रत्यक्षात पाळल्यास आपल्यासह इतरांची सुरक्षितता सुनिश्चित होऊ शकते, असे सांगितले.
दरम्यान, मोटारसायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पालकमंत्री राणे श्री. दहिकर यांच्यासोबत मोटारसायकलवर बसले. तर जिल्हाधिकारी धोडमिसे यांनीही स्वतः मोटारसायकल चालवून रॅलीला पुढे चाल दिली.
चौकट
रस्ते अपघातात ६८ जणांनी गमवावे प्राण
डॉ. दहिकर यांनी, जिल्ह्यात रस्ते अपघातात सुमारे ६८ जणांना प्राण गमवावे लागले. यामध्ये १८ ते ३४ वयोगटातील तरूणांचा समावेश आहे. हे प्रमाण तुलनेत कमी असले तरीही ते शून्यावर आणण्यासाठी रस्ता सुरक्षा हा जीवनाचा अविभाज्य भाग समजून लक्ष द्यायला हवे. राष्ट्रीय महामार्गांप्रमाणेच राज्य मार्गांवरही अपघातांचे प्रमाण अधिक आहे. बेजबाबदार वाहन चालवणे, वेगमर्यादा न पाळल्यामुळे अपघात घडतात. तरूणांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी वाहतुकीचे नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

