देवरूख–काटवली–सायले रस्त्याचे डांबरीकरण रखडले
‘देवरूख–काटवली-सायले’ रस्त्याचे डांबरीकरण रखडले
जनआंदोलनाचा इशारा ; सार्वजनिक बांधकामाने लक्ष देण्याची गरज
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. ५ ः देवरूख–काटवली–सायले या महत्त्वाच्या मार्गावरील डांबरीकरणाचे काम सुरू होऊन तब्बल एक वर्ष उलटले असले, तरी अद्याप संपूर्ण रस्त्याचे काम प्रलंबितच आहे. जानेवारी २०२५ मध्ये या कामाची सुरुवात करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात देवरूख ते गणपती मंदिर, ओझरे या मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात आले. माघी गणेशोत्सवापूर्वी हा टप्पा पूर्ण झाला; मात्र पुढील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असतानाही उर्वरित डांबरीकरणाचे काम अद्याप सुरू झालेले नाही.
या रखडलेल्या कामामुळे त्रस्त झालेल्या काटवली पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते संजय घाग यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुस्त कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत विभागाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. येत्या पंधरवड्यात या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही, तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
हा रस्ता पुढे चिंचेची घाटी, विघ्रवली, माळवाडीपर्यंत मंजूर असताना, वर्षभरात केवळ देवरूख ते गणपती मंदिर एवढेच काम पूर्ण झाले आहे. अवेळी आलेल्या पावसामुळे काम थांबले असे गृहीत धरले, तरी मागील एक ते दीड महिन्यात ठेकेदार इतर ठिकाणी रखडलेली कामे पूर्ण करताना दिसत आहेत. मात्र देवरूख–काटवली–सायले या मार्गाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
रस्त्यालगत मोऱ्यांचा खचलेला भाग दुरुस्त करूनही पुन्हा खचला असून, त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या मार्गावरून प्रवास करणारे वाहनचालक जीव मुठीत धरून संथ गतीने वाहन चालवतात. अनेक दुचाकीस्वार आतापर्यंत दैव बलवत्तर म्हणून बचावले आहेत. खड्ड्यांमधून वाट काढताना लहान-मोठ्या वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून वाहन दुरुस्तीचा खर्चही वाढला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

