अंबाबाईचा झरा पाहिल्यावर श्रीचा ऊर भरून यायचा
परिवर्तन---------लोगो
(१ जानेवारी टुडे ३)
अंबाबाईचा झरा पाहिल्यावर
श्रीचा ऊर भरून यायचा
अंबाबाई स्वयंभू असल्याने या नवरात्रोत्सवाला विशेष महत्त्व होते. अंबाबाईच्या दर्शनासाठी श्रीच्या कुटुंबीयांना अंबाबाईच्या देवळात जाण्याची गरज नव्हती. कारण, घरातील देवीच स्वयंभू होती. कोल्हापूरचे भाईबंदच या स्वयंभू देवीचे दर्शन घ्यायला यायचे. काहीजण नवरात्रोत्सवासाठी यायची. त्यातील एकाने तर देवघराच्या दरवाजावर चांदीचा रुपया ठोकला होता, हेही श्रीला माहीत होते. तो हा दरवाजावरील रुपया पाहुण्यांना आवर्जून दाखवी. एकंदरीत, आपल्याकडील देवी शक्तिशाली आहे आणि त्यामुळेच मोठी माणसे तिची भक्तिभावे पूजा करतात, हेही श्री जाणून होता.
- rat7p1.jpg-
P26O16097
- डॉं. शरद प्रभूदेसाई, रत्नागिरी
-----
सोवळ्याओवळ्याचे नियम श्रीच्या डोक्यात अगदी लहान वयातच बंदिस्त झाले असल्यामुळे सोवळ्याओवळ्याचे नियम नीट पाळले नाहीत तर मुंग्या येणे किंवा तत्सम संकटे घरात येऊ शकतात. या नियमांचे नीट केले नाही तर देव शाप देतो, अशा गप्पा मोठी माणसे मारताना श्रीने ऐकले होते. त्यामुळे घाबरून तोही या नियमांचे काटेकोरपणे पालन करत असे. नवरात्र हा नऊ दिवसांचा सोहळा. श्रीच्या घरातील अंबाबाई ही स्वयंभू. अर्थात, याचा अर्थ श्रीला कळत नव्हताच! बाबांनी नातेवाइकांशी गप्पा मारताना सांगितलेली ही गोष्ट त्याच्या स्मरणात राहिली. खरेतर, त्यांच्या देव्हायात अंबाबाईची मूर्ती नव्हती. एका चांदीच्या वाटीवर चार सोन्याच्या टिकल्या होत्या. त्या टिकल्या म्हणजेच अंबाबाई! त्याना अंबाबाईच्या पादुका असे मानत. या पादुका पूर्वजांना जवळच असलेल्या अंबाबाईच्या झऱ्यात सापडल्या. बाबांनी हा झरा पाटाचे पाणी आणायला गेला असताना श्रीला अनेकवेळा दाखवला होता. अंबाबाईचा झरा पाहिल्यावर त्याचा ऊर भरून यायचा कारण, देव्हाऱ्यातील देवीच्या पादुका याच झऱ्यात सापडल्या होत्या ना!
पूर्वी नवरात्रोत्सवात सकाळी साधी पूजा आणि रात्री देवीची महापूजा होत असे. खरेतर, देवीच्या देवस्थानामध्ये सकाळी महापूजा होते; पण या स्वयंभू देवीची महापूजा रात्री! या रात्रीच्या महापूजेला आठ-दहा भटजी असत. देव्हारा फुलांनी सजवत. सर्व देव फळीवर दोन बाजूने लावून मध्ये देवीच्या पादुका ठेवत. भटजीमार्फत पूजा झाल्यावर महानैवेद्य होत असे. महानैवेद्य रात्री अकराला होई. त्यानंतर महाआरत्या एक-दोन तास चालत. ब्राह्मणभोजनास रात्री एक वाजे. सर्व आटपून झोपायला तीन होत. गावातील विविध देवांचे नैवेद्य नेण्यासाठी सकाळी त्या त्या देवस्थानचे गुरव किंवा गावकार येत. असा हा नवरात्रोत्सवाचा रगाडा नऊ दिवस चाले. नवव्या दिवशी शस्त्रपूजन असे. त्या दिवशी घरातील सर्व अवजारे धुवून ओटीवर मांडून त्यांची पूजा भटजी करी. श्री मोठा झाल्यावर अवजारे धुवून मांडण्याचे काम हौसेने करी.
नवरात्रात दररोज नैवेद्यासाठी नवीन पक्वान्न असे. त्यामुळे श्री नवरात्रात खूश असे. नऊ दिवस खाण्या-पिण्याची चंगळ असे. कधी खीर, कधी वडे, घारगे तर कधी पुरणपोळी! नऊ दिवस नऊ पक्वान्ने आणि दसऱ्याच्या दिवशी दहावे! दररोज रात्री साधारणतः पन्नास पानं जेवायला असे. या नवरात्रोत्सवापोटी बराच खर्च होत असे. त्याचे सोयरसुतक श्रीला असण्याची गरज नव्हती. श्रीचे दिवस मजेत जायचे. बहुधा त्यामुळेही त्याचा अंबाबाईवरचा विश्वास अधिक दृढ झाला असावा, अगदी लहान वयापासून!
श्रीला नवरात्रातील सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे आरत्या. वेगवेगळ्या आरत्या सुंदर तालासुरात म्हटल्या जात. रात्री कितीही उशीर झाला तरी तो आरत्यांसाठी जागा राही. नवरात्रात रात्री झोपायला उशीर झाला तर सकाळी उशीरा उठायला त्याला परवानगी होती. श्रीच्या लक्षात आलेली एक गोष्ट म्हणजे या उत्सवात कोणाही ब्राह्मणेतरांना आमंत्रण नसे. ही गोष्ट त्याच्या मनावर ठसून राहिली. ब्राह्मणेतरांकडून आलेल्या भाया उत्सवासाठी चालत. त्यातील काही खास उत्सवासाठी भाया आणून देत; पण त्यांच्यापैकी कोणालाही जेवायला आमंत्रण नसे, हेही श्रीने हेरले. असे का? याचे कारण त्याला कळत नव्हते. घरातील मोठ्यांचे अनुकरण करायचे, ही एकच गोष्ट त्याला माहित होती. वयपरत्वे त्याच्या मनावर हेच संस्कार होत होते.
नवरात्राच्या नवव्या दिवशी मोठा होम होत असे. हा होम बहुधा तीन-चार तास चाले. त्यात भाताच्या आहुती देत असत. उंबर, पिंपळवगैरे झाडांच्या समिधा असत. हा होम पाहण्यास श्रीला आनंद वाटत असे. हा नवरात्रोत्सव श्री आठ वर्षाचा होईपर्यंत चालू होता.
(लेखक बालरोगतज्ज्ञ आणि चिंतनशील अभ्यासक आहेत.)
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

