-आज्जीच्या मायेची उब देणारी राजवाडी गोधडी
-rat७p९.jpg-
२६O१६१०६
संगमेश्वर ः राजवाडी येथे गोधडी शिवणारी महिला.
---
आजीच्या मायेची ऊब देणारी ‘राजवाडीची गोधडी’
महिलांच्या पुढाकारातून नावारूपाला; थंडीच्या दिवसात मागणी वाढली
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ७ : गोधडीचं नाव घेताच घरातील प्रेमळ आजी, तिच्या सुती साड्या आणि नातवंडांसाठी जपलेली मायेची ऊब आठवते. आपल्या नातवंडांना कुशीत घेऊन गोष्टी सांगणारी आजी, ती झोपी गेल्यावर स्वतःच्या हाताने शिवलेली गोधडी त्यांच्या अंगावर पांघरून मायेची ऊब देत असे. हीच परंपरा जपण्यासाठी आणि तिला नवं स्वरूप देण्यासाठी संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी गावातील महिलांनी पुढाकार घेतला आहे. लोकसक्षमीकरण चळवळ संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ‘राजवाडी गोधडी’ बाजारात आणली असून, या गोधडीला सध्या मोठी मागणी आहे.
बदलत्या काळात कुटुंबव्यवस्था मर्यादित झाली, संयुक्त कुटुंबांची जागा विभक्त कुटुंबांनी घेतली आणि आजी–नातवंडांमधील ती आपुलकीची नाळही काहीशी दूर गेली. परिणामी, आजीच्या मायेची ऊब देणारी गोधडीही दुर्मिळ होत गेली. एकेकाळी जुन्या साड्या, लुगडी, चादरी किंवा घरातील इतर कापडांचे तुकडे वापरून घरातील महिलांनी शिवलेल्या गोधड्या थंडीच्या दिवसांत प्रत्येक घरात हमखास दिसायच्या; मात्र, यांत्रिक युगात हाताने शिवलेली गोधडी आता क्वचितच पाहायला मिळते. राजवाडीतील महिलांनी मात्र ही कला केवळ जपली नाही तर तिला आधुनिकतेची जोड देत व्यावसायिक यशही मिळवलं आहे.
नव्या कोऱ्या शंभर टक्के सुती कापडावर आकर्षक नक्षीकाम केलेलं आवरण, मांजरपाटाचं अस्तर आणि मधोमध उबदार कापड वापरून तयार केलेली ही गोधडी वजनाला हलकी, वापरायला अत्यंत उबदार असून धुलाई यंत्रात सहज धुता येते. या उपक्रमासाठी लोकसक्षमीकरण संस्थेचे सतीश कामत यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत असल्याचे महिलांनी सांगितले. आजीच्या मायेची आठवण जपणारी ही ‘राजवाडी गोधडी’ ग्रामीण महिलांसाठी रोजगाराचं साधन ठरत असून, परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम घडवत आहे.
----
चौकट
सात फूट लांब, चार फूट रुंद
सात फूट लांब आणि चार फूट रुंद अशी ‘राजवाडी गोधडी’ पारंपरिक पद्धतीने पूर्णपणे हाताने टाके घालून शिवली जाते. या कामासाठी मेहनतीबरोबरच कौशल्याचीही आवश्यकता असते. एका गोधडीसाठी साधारण दोन दिवसांचा कालावधी लागतो. गोधडी जितकी रंगीत कापडाच्या तुकड्यांनी बनलेली असेल तितकं टाके घालण्याचं काम अधिक किचकट होतं.
----------
चौकट
घरपोच उपलब्ध
गेल्या काही वर्षांत ‘राजवाडी गोधडी’ने केवळ राज्यातील महानगरांमध्येच नव्हे तर परदेशातही अनोखी भेटवस्तू म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. यंदाच्या हिवाळ्यासाठी गोधडींची निर्मिती आणि विक्री सुरू झाली असून, आगाऊ मागणी नोंदवल्यास गोधडी घरपोच उपलब्ध करून दिली जाते.
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

