‘आमची सेवा मान्य करून घे आई’

‘आमची सेवा मान्य करून घे आई’

Published on

16232

‘आमची सेवा मान्य करून घे आई’

भक्तांची भावनिक साद; मुणगे यात्रोत्सवाची उत्साहात सांगता

सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. ७ : ‘आम्हा भक्तांकडून झालेली सेवा मान्य करून घे आई,’ अशी भावनिक विनवणी करत हजारो भाविकांनी येथील देवी भगवतीच्या चरणी नतमस्तक होत वार्षिक यात्रोत्सवात सहभाग नोंदवला. थेट गाभाऱ्यातून दर्शनाची व्यवस्था असल्याने देवीची मनमोहक मूर्ती पाहून भाविकांचे डोळे तृप्त होत होते. एकूणच भावपूर्ण, भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात देवी भगवतीचा वार्षिक यात्रोत्सव पार पडला.
येथील देवी भगवतीचा यात्रोत्सव शुक्रवारी (ता.२) ते मंगळवारी (ता.६) या पाच दिवसांच्या कालावधीत साजरा झाला. यात्रोत्सवाच्या निमित्ताने देवी मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम झाले. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सुलक्ष दर्शनासाठी देवस्थानच्या वतीने वाडी-वाडीतील स्वयंसेवकांची नेमणूक केली होती.
दरम्यान, यात्रोत्सवाच्या कालावधीत माहेरवाशिणींसह मुंबईकर चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. दिवसभर मंदिरात ‘श्री देवी भगवती माते नमो नमः’ या मंत्राचा गजर सुरू होता. सायंकाळी गोंधळी गायन, नौबती वादन, विविध ठिकाणाहून आलेल्या भजनी बुवांची भजने, प्राथमिक शाळेतील मुलांचे भक्तीगीत कार्यक्रम तसेच भगवती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे भक्तीगीतांचे सादरीकरण झाले. यात्रोत्सवात प्रत्येक मानकरी, ग्रामस्थ आणि स्वयंसेवकांनी आपापली जबाबदारी चोख पार पाडली. अनेक वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांनी देवीचे दर्शन घेतले. विनाखंडीत वीजपुरवठा केल्याबद्दल वीज वितरणचे देवस्थानने आभार मानले. देवस्थानचे अध्यक्ष ओंकार पाध्ये, उपाध्यक्ष दिलीप महाजन व सचिव निषाद परुळेकर यांनी सर्व सहकार्य करणाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
--------------
जत्रोत्सवात आर्थिक उलाढाल
नेत्रदीपक विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या महापुरुष स्थळापर्यंत विविध प्रकारची दुकाने थाटली होती. दरवर्षी यात्रोत्सवासाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या वाढत असून, यंदा हा यात्रोत्सव आंगणेवाडी व कुणकेश्वर यात्रोत्सवाच्या धर्तीवर अधिक व्यापक स्वरूपात साजरा झाला. एकूणच या जत्रोत्सवात चांगली आर्थिक उलाढाल झाली.
---
पाच फेऱ्यांनंतर ‘पालखी’ची सांगता
ढोल-ताशांच्या गजरात मंगळवारी रात्री उशिरा देवीची पालखी प्रदक्षिणा काढण्यात आली. ठरावीक अंतरावर पालखी थांबवून भक्तीगीत व गोंधळी गायन झाले. ‘हर हर महादेव’च्या घोषानंतर पुन्हा पालखी पुढे सरकत होती. अशा पाच फेऱ्यांनंतर पालखी सोहळ्याची सांगता झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com