दररोजच्या जगण्यात आर्थिक चौकट असते
पैसा बोलतो, आपण ऐकतो !.................लोगो
(२ जानेवारी टुडे ३)
दररोजच्या जगण्यात
आर्थिक चौकट असते
बहुतेकवेळा आपण ‘परवडतं का?’ एवढाच प्रश्न विचारतो; पण परवडणं आणि किंमत योग्य असणं यात फरक असतो. एखादी गोष्ट आज परवडू शकते; पण तिचा उद्याचा खर्च जड ठरू शकतो. आजचा हप्ता सांभाळता येईल; पण उद्या तोच हप्ता इतर गरजांवर मर्यादा आणू शकतो. कधी कधी सुटीवर फिरायला जाण्याचा निर्णय मनाला आनंद देतो; पण त्यानंतर काही महिने खर्च आवरायला लागतो. या अनुभवातून आपल्याला कळतं की, प्रत्येक निर्णयाची किंमत फक्त आज मोजायची नसते; ती पुढच्या काळातही भरावी लागते. हा फरक समजायला लागणं म्हणजे अर्थसाक्षरतेकडे टाकलेलं पहिलं पाऊल.
rat८p१.jpg-
P26O16313
- सीए वैभव देवधर, रत्नागिरी
----
आपण रोज अनेक निर्णय घेत असतो. काही अगदी साधे वाटणारे तर काही आयुष्याची दिशा ठरवणारे. भाजी कुठून घ्यायची, महिन्याचा खर्च कसा सांभाळायचा, मुलांच्या शिक्षणासाठी कोणता पर्याय निवडायचा, घर घ्यायचं की, भाड्यानेच राहायचं, कर्ज घ्यायचं की, टाळायचं हे सगळे निर्णय आपल्या रोजच्या जगण्याचा भाग असतात. आपण त्यांना आर्थिक निर्णय म्हणून वेगळं ओळखत नाही; पण प्रत्यक्षात प्रत्येक निर्णयामागे काही ना काही आर्थिक गणित असतंच.
उदाहरणार्थ, भाजी बाजारातून घेताना आपण दर विचारतो, गुणवत्ता पाहतो आणि ‘आज महाग आहे’ असं म्हणतो. महिन्याच्या शेवटी काही खर्च मुद्दाम टाळतो तर कधी अचानक एखादी गोष्ट घ्यायचा निर्णय घेतो. मोबाईल बदलताना ‘ऑफर आहे’ म्हणून स्वतःला समजावतो. घरात एखादं मोठं उपकरण घ्यायचं असेल तर त्याची गरज तपासण्याआधी ‘हप्ता किती येईल?’ हा प्रश्न आपोआप पुढे येतो. ही सगळी उदाहरणं पाहिली तर लक्षात येतं की, आपण नकळत रोज अर्थकारणाशी संवाद साधत असतो. फक्त त्याची जाणीव ठेवत नाही.
इथे एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात घ्यायला हवी. अर्थसाक्षरता ही एखाद्या ‘युरेका’ क्षणी अचानक मिळणारी गोष्ट नाही. ती एका लेखातून, एका भाषणातून किंवा एका सल्ल्यातून पूर्णपणे मिळत नाही. ती रोजच्या छोट्या निर्णयांतून, झालेल्या चुकांतून, अनुभवातून आणि विचार करण्याच्या सवयीतून हळूहळू तयार होते. एखादा चुकीचा खर्च आठवणीत राहतो, एखादा योग्य निर्णय दिलासा देतो आणि पुढच्या वेळी आपण थोडं अधिक सावध होतो. अशाच छोट्या अनुभवांतून अर्थसाक्षरता आकार घेत जाते.
अर्थसाक्षरता म्हणजे केवळ खर्च मोजणं किंवा आकड्यांची बेरीज-वजाबाकी करणं नव्हे. ती आपल्याला निर्णय घेताना थोडा थांबा घ्यायला शिकवते. ‘हे आत्ता खरंच आवश्यक आहे का?’, ‘याचा पुढील काही वर्षांवर काय परिणाम होईल?’, ‘या निर्णयामुळे मला कोणत्या गोष्टींना नकार द्यावा लागेल?’ असे प्रश्न विचारण्याची सवय लागली की, निर्णय अधिक जाणीवपूर्वक होऊ लागतात. उदाहरणार्थ, मुलांच्या शिक्षणासाठी शाळा निवडताना केवळ फी नव्हे, तर पुढील अनेक वर्षांची आर्थिक बांधिलकी, इतर खर्चांवर होणारा परिणाम आणि कुटुंबाच्या एकूण आर्थिक क्षमतेचा विचार होऊ लागतो.
इथे एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करणं आवश्यक आहे. अर्थसाक्षरतेचा थेट संबंध उत्पन्नाच्या प्रमाणाशी नसतो. उत्पन्न कमी असो किंवा भरपूर, निर्णय चुकीचे किंवा योग्य ठरू शकतात. कमी उत्पन्न असतानाही योग्य प्राधान्यक्रम ठेवून आर्थिक शिस्त पाळता येते आणि जास्त उत्पन्न असूनही नियोजन नसेल तर आर्थिक ताण निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अर्थसाक्षरता ही ‘किती कमावतो’ यावर नाही तर ‘कसं ठरवतो’ यावर आधारलेली असते.
आपण अनेकदा आर्थिक निर्णय भावनेतून घेतो. कधी भीतीपोटी, कधी समाजाच्या अपेक्षांमुळे, कधी ‘सगळेच करत आहेत’ या विचारातून. त्या क्षणी निर्णय योग्य वाटतो; पण काही काळानंतर तोच निर्णय प्रश्न निर्माण करतो. अशा वेळी अडचण पैशांची नसते; अडचण असते ती निर्णय घेताना पुरेसा विचार न केल्याची.
अर्थसाक्षरता आपल्याला परिपूर्ण बनवते अस नाही; पण ती आपल्याला सावध बनवते. प्रत्येक चूक टाळता येईलच असं नाही; पण अनावश्यक चुका नक्कीच कमी करता येतात. हळूहळू हे लक्षात येऊ लागतं की, आर्थिक निर्णय म्हणजे केवळ आजचा खर्च नसतो तर उद्याची बांधीलकीही असते आणि त्या बांधीलकीला सामोरं जाण्याची तयारी म्हणजेच अर्थसाक्षरतेचा खरा उपयोग.
रोजचं आयुष्य अर्थशास्त्राचं पुस्तक नसतं; पण त्यातल्या प्रत्येक पानावर कुठेतरी आर्थिक चौकट दडलेली असते. ती चौकट समजून घेण्याची सवय लागली की, निर्णय अधिक सुज्ञ होतात आणि अशा सुज्ञ निर्णयांची सवय लागणं हाच अर्थसाक्षरतेचा खरा, शांत आणि दीर्घकालीन प्रवास आहे.
(लेखक सीए असून, रत्नागिरीत सराव करत आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

