न्यू मांडवे प्रकल्पाची फाईल अखेर वित्त विभागात पोचली
‘न्यू मांडवे प्रकल्प’ फाईल अखेर वित्त विभागात
आत्मदहनाच्या इशाऱ्याने जाग ; खासदार तटकरेंनी घेतली बैठक
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ८ : तालुक्यातील न्यू मांडवे धरणप्रकल्प मार्गी लावण्यासाठी आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जल फाउंडेशन कोकण विभागाचे अध्यक्ष नितीन जाधव यांनी प्रजासत्ताकदिनी प्रकल्पस्थळी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. या गंभीर इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पाठपुराव्यामुळे आणि खासदार सुनील तटकरे यांनी घेतलेल्या बैठकीनंतर अखेर लालफितीत अडकलेली धरणप्रकल्पाची फाईल वित्त विभागाकडे पोहोचली आहे.
गेल्या ४१ वर्षांपासून रखडलेल्या न्यू मांडवे धरणप्रकल्पामुळे अष्टक्रोशी परिसरातील ग्रामस्थांचा भ्रमनिरास झाला आहे. प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी आंदोलने, उपोषणे करण्यात आली; मात्र आश्वासनांपलीकडे काहीच पदरी न पडल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. भूसंपादन प्रक्रियेत अडकलेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून, अपूर्ण अवस्थेतील प्रकल्पामुळे त्यांचे जीवनमानही अडचणीत आले आहे. या पार्श्वभूमीवर जलफाउंडेशनचे अध्यक्ष नितीन जाधव यांनी २६ जानेवारीला आत्मदहनाचा इशारा दिला होता. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले. खासदार सुनील तटकरे यांनीही धरणप्रश्नी आढावा बैठक घेतली असून, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून लालफितीत धूळखात पडलेली धरणप्रकल्पाची फाईल अखेर वित्त विभागाकडे पोहोचल्याने या लढ्याला निर्णायक वळण मिळाले आहे.
------
चौकट
आता निर्णायक टप्पा सुरू
न्यू मांडवे धरणप्रश्नी जोपर्यंत ठोस न्याय मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याची भूमिका जाधव यांनी स्पष्ट केली आहे. हा केवळ प्रकल्पाचा प्रश्न नाही तर हक्क, स्वाभिमान आणि न्यायाचा लढा आहे. शासनाला पुरेसा वेळ दिला आहे. कोणत्याही परिणामांची पर्वा न करता आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

