पक्ष्यांची संख्या घटतेय

पक्ष्यांची संख्या घटतेय

Published on

swt812.jpg व swt813.jpg
16376 , 16377
मालवण ः तालुक्यात दिसून येणारे पक्षी

कोकणचा आकाशविहार ओस पडतोय
पक्ष्यांची संख्या घटल्याने पर्यावरणीय असंतुलन; हवामान बदलाबरोबरच मानवी हस्तक्षेपाचा परिणाम
प्रशांत हिंदळेकर : सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ८ : कोकणची निसर्गसमृद्धी असलेल्या मालवण तालुक्यात गेल्या काही वर्षांत झालेल्या पक्षी निरीक्षणातून एक चिंताजनक वास्तव समोर आले आहे. शहरीकरण, पर्यावरणाचा ऱ्हास, झाडांवरील कीटकनाशकांची फवारणी, हवामान बदलाचा थेट परिणाम स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांवर झाला आहे.
काही प्रजातींची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. जिल्ह्याच्या इतर भागातही कमी जास्त प्रमाणात हीच स्थिती आहे. परिणामी जैवविविधतेवर मोठे संकट ओढवले आहे.
मालवणमधील धामापूर तलाव, कर्ली खाडी, तारकर्ली आणि आचरा तसेच शहरालगतच्या परिसरात आणि अन्य भागांत विविध संस्थांकडून, पक्षी मित्रांकडून करण्यात आलेल्या नोंदीनुसार पूर्वी या भागात पक्ष्यांच्या सुमारे २०० हून अधिक प्रजाती आढळत होत्या. मात्र, गेल्या काही वर्षांत अनेक मुख्य निरीक्षणे नोंदवली गेली आहेत. यात रशिया आणि सायबेरियातून येणाऱ्या पक्ष्यांच्या आगमनाच्या वेळेत बदल झाला आहे. एकूण प्रजातींच्या संख्येत १० ते १५ टक्के घट दिसून आली आहे. जिल्ह्याच्या इतर भागातही कमी जास्त प्रमाणात हीच स्थिती आहे. घरटी बांधण्यासाठी लागणाऱ्या नैसर्गिक अधिवासाच्या अभावामुळे अनेक स्थानिक पक्ष्यांचा प्रजनन दर कमी झाला आहे.
सर्व्हेनुसार आता मालवणच्या परिसरात अनेक पक्षी दुर्मिळ होत चालले आहेत. यात पांढऱ्या पाठीचे गिधाड हे दिसणे अतिशय दुर्मिळ बनले आहे. अन्नाचा अभाव आणि औषधयुक्त जनावरांचे मांस खाल्ल्याने किडनी बाद होऊन मृत पावत असल्याने त्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.
रानपिंगळा यांचीही संख्या घटत चालली आहे. मोठ्या वृक्षांची तोड हे यामागील प्रमुख कारण आहे. चिमणी या पक्षांची शहरी भागात संख्या कमी झाली आहे. सिमेंटची घरे आणि अन्नाची कमतरता हे यामुळे चिमण्यांची संख्या घटली असल्याचे दिसून येत आहे. समुद्री पक्षी यांची किनाऱ्यावर घट झाली असल्याचे दिसून येत आहे. पर्यटनाचा वाढता हस्तक्षेप आणि कचरा यांसारख्या कारणांमुळे या पक्ष्यांची संख्या कमालीची घटल्याचे चित्र आहे. किंगफिशर (खंड्या) यांचीही खाडी भागात घट झाल्याचे दिसून येत आहे. जलप्रदूषण आणि मासळीची उपलब्धता कमी झाल्यामुळे या पक्ष्यांची संख्या घटली आहे. याशिवाय पोपट, सुतार पक्षी तसेच अन्य छोटे पक्षी यांची संख्याही घटल्याचे दिसून येत आहे.
धोक्यात आलेल्या प्रजातींचा विचार करता मलबार पाइड हॉर्नबिल (धनेश) घनदाट झाडी, मोठी जुनी झाडे तोडल्यामुळे घरट्यांचा प्रश्न निर्माण झाल्याने या पक्ष्यांची संख्या घटली आहे. ग्रेटर फ्लेमिंगो (रोहित) कर्ली खाडी किनारी वाढते जलप्रदूषण आणि बोटींची वर्दळ यामुळे या पक्ष्यांची संख्याही घटली असल्याचे दिसून येत आहे. पिवळा धोबी या पक्ष्यांचे वास्तव्य पाणथळ जागा ज्याठिकाणी आहे तेथे असायचे मात्र आता पाणथळ जमिनींचे प्लॉट्समध्ये रूपांतर झाल्याने या पक्ष्यांच्या संख्येतही घट झाली आहे.
पक्ष्यांची संख्या कमी होणे हे केवळ एका जीवजातीचे नुकसान नसून ते संपूर्ण परिसंस्थेसाठी धोक्याची घंटा आहे. पक्षी कमी झाल्यामुळे शेतीवरील कीड आणि टोळधाडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक पक्षी फळे खाऊन बियांचा प्रसार करतात. पक्षी घटल्याने नैसर्गिक वनसंपदेच्या पुनरुज्जीवनावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. खाडी आणि समुद्रातील लहान मासे खाणाऱ्या पक्ष्यांच्या कमतरतेमुळे जलचर अन्नसाखळी विस्कळीत होत आहे.
अनेक तज्ज्ञांच्या मते किनारपट्टी भागात होणारे अनधिकृत बांधकाम आणि मोठ्या झाडांची झालेली तोड यामुळे पक्ष्यांचे नैसर्गिक घरटे उद्ध्वस्त होत आहेत. वेळीच उपाययोजना न केल्यास कोकणच्या सौंदर्याचा हा महत्त्वाचा भाग कायमचा हरवेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
-------------
चौकट
कर्णकर्कश आवाज, फवारणींचा परिणाम
पर्यावरण अभ्यासकांच्या मते तीन घटकांमुळे मालवणची पक्षी विविधता धोक्यात आली आहे. यात पर्यटन हंगामात रात्री उशिरापर्यंत चालणारे लाऊडस्पीकर आणि बोटींचे इंजिन यामुळे पक्ष्यांच्या संवाद साधण्याच्या आणि प्रजननाच्या प्रक्रियेत अडथळा येतो. आंबा, काजू बागायतींमध्ये होणाऱ्या अति कीटकनाशकांच्या फवारणीमुळे पक्ष्यांचे मुख्य अन्न असलेले कीटक नष्ट होत आहेत, परिणामी पक्ष्यांची उपासमार होत आहे. पावसाळ्याच्या अनिश्चित चक्रामुळे स्थलांतरित पक्ष्यांच्या येण्या-जाण्याच्या वेळेत विसंगती निर्माण झाली आहे.
-------------
चौकट
कावळे, घारींच्या संख्येत वाढ
गेल्या काही वर्षांत पक्ष्यांच्या वास्तव्यात अनेक बदल प्रकर्षाने जाणवले आहेत. पूर्वी भातशेतीनंतर कडधान्ये लावली जात, जिथे पक्ष्यांना मुबलक अन्न मिळे. आता शेतीचे प्रमाण कमी झाल्याने स्थानिक पक्षी स्थलांतर करत आहेत. काही पक्ष्यांची संख्या मात्र लक्षणीयरीत्या वाढली आहे, जे पर्यावरणातील असंतुलनाचे लक्षण मानले जाते. यात कावळे आणि घार यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. पर्यटनामुळे वाढलेल्या कचऱ्यामुळे यांची संख्या वाढली आहे. जे इतर लहान पक्ष्यांची अंडी आणि पिल्ले खातात. मानवी वस्तीत अनुकूलन साधल्यामुळे मैना पक्ष्यांची संख्या स्थिर किंवा वाढीव आहे.
---------------
चौकट
प्रशासनासह नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे
मालवण तालुक्यात विशेषतः धामापूर तलाव, आचरा खाडीसह लगतच्या भागांमध्ये झालेल्या बदलांवर तज्ज्ञांनी अधिक भर दिला आहे. येथील ''धामापूर तलाव'' हे पक्ष्यांचे नंदनवन म्हणून ओळखले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत तलावाच्या परिसरात मानवी हस्तक्षेप वाढल्याने बदकांच्या काही प्रजातींनी येथे येणे बंद केले आहे. ही धोक्याची सूचना आहे. मालवणची ओळख केवळ पर्यटनापुरती मर्यादित न ठेवता, इथल्या जैवविविधतेचे रक्षण करणे ही काळाची गरज आहे. निसर्गाचा हा समतोल राखण्यासाठी प्रशासन आणि नागरिक दोघांनीही पुढाकार घेणे आवश्यक आहे.
----------------
उपाययोजना
* कांदळवन आणि जुन्या वृक्षांचे जतन करणे
* प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवणे
* चिमण्यांसारख्या पक्ष्यांसाठी लोकसहभागातून कृत्रिम घरटे लावणे
-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com