मालवण येथे व्याख्यानमाला
मालवण येथे
व्याख्यानमाला
मालवण : येथील श्री शिवाजी वाचन मंदिर यांच्या वतीने आयोजित श्रीपाद वाघ पुरस्कृत आणि राजाभाऊ भोसले स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प १७ जानेवारीला गुंफले जाणार आहे. या पहिल्या व्याख्यानाचा विषय ‘मोगल मर्दिनी क्षत्राणी शिवस्नुषा महाराणी ताराराणी’ असा असून या विषयावर प्रख्यात वक्त्या डॉ. ज्योती बुवा तोरसकर विचार मांडणार आहेत. महाराणी ताराराणी यांच्या जाज्वल्य इतिहासावर प्रकाश टाकणाऱ्या या व्याख्यानाचे आयोजन मालवण भरड येथील श्री दत्त मंदिर येथे केले आहे. सायंकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
.......
सांगेली नवोदयतर्फे
फेब्रुवारीत परीक्षा
कुडाळः शिक्षा मंत्रालय भारत सरकार द्वारा संचलित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगेली येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी नववी आणि अकरावीतील रिक्त जागांच्या प्रवेशासाठी होणारी परीक्षा ७ फेब्रुवारीला सकाळी ११.१५ ते १.४५ यावेळेत होणार आहे. विद्यार्थांनी परीक्षा केंद्रावर सकाळी १०.३० वाजता हजर राहणे आवश्यक आहे. प्रवेश पत्रे संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी प्रा. अशोक कांबळे, जे. बी. पाटील. एस. पी. हिरेमठ येथे संपर्क साधावा.
....
मालवण दांडेश्वराचा
रविवारी जत्रोत्सव
मालवणः दांडी येथील श्री देव दांडेश्वर मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव रविवारी (ता. ११) होणार आहे. यानिमित्त पूजा अर्चा, सायंकाळी ४ वाजल्यापासून धार्मिक विधी व रात्री दशावतार नाट्यप्रयोग आदी कार्यक्रम होणार आहेत. लाभ घ्यावा, असे आवाहन दांडी गाव कमिटी व दांडी ग्रामस्थांच्या वतीने केले आहे.
.......................
मालवणात बुधवारी
दशावतारी नाटक
मालवणः हौशी कलाकार वायरी बांधतर्फे मकरसंक्रांतीनिमित्त जुने दत्त मंदिर येथे बुधवारी (ता. १४) दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळ, सिंधुदुर्ग यांचे पौराणिक नाटक ‘वस्त्रात ब्रम्हरेत जन्मास आले शिवतेज’ सादर होणार आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
......................
दिव्यांग निधीचे
दोडामार्गात वाटप
दोडामार्गः कसई दोडामार्ग नगरपंचायतीमार्फत दिव्यांग निधी वाटप कार्यक्रम नगरपंचायत कार्यालयाच्या सभागृहात झाला. या कार्यक्रमास नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष देविदास गवस, मुख्याधिकारी संकेत गायकवाड, लेखापाल आनंद परब आदी उपस्थित होते. दिव्यांग लाभार्थ्यांना शासनाकडून मंजूर झालेल्या आर्थिक मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले. तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. दिव्यांग लाभार्थ्यांना कोणतीही मदत आवश्यक असल्यास नगरपंचायत प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांनी दिले.
...................
वरवडे येथे आज
मल्लखांबाचे धडे
कणकवली ः सिंधुदुर्ग जिल्हा मल्लखांब संघटना कुडाळ आणि आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, वरवडे यांच्यावतीने उद्या (ता. ९) ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये मल्लखांब प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले आहे. मल्लखांब महर्षी म्हणून ख्याती असलेले उदय देशपांडे तसेच शांताराम जोशी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण होणार आहे. विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. तज्ज्ञांकडून कौशल्यास चालना प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन मल्लखांब संघटना, आयडियल इंग्लिश स्कूल यांनी केले आहे.
...................
आरवली शाळेला
पुस्तक संच भेट
वेंगुर्लेः श्री देव वेतोबा देवस्थान न्यास आणि भक्त परिवार यांच्यावतीने जीवन शिक्षण शाळा आरवली क्र. १ येथील शिरिषकुमार बालवाचनालयाला पुस्तक संचाची भेट देण्यात आली. यावेळी व्यासपीठावर देवस्थानचे अध्यक्ष जयवंत राय, विश्वस्त डॉ. प्रसाद साळगावकर, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गजानन मेस्त्री, पालक-शिक्षक संघाच्या सौ. दळवी, सी. कर्णेकर व सौ. रंगजी उपस्थित होते. यावेळी श्री देव वेतोबा देवस्थान कमिटीचे विश्वस्त डॉ. प्रसाद साळगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापिका श्रीमती कोकितकर यांनी स्वागत केले. पुस्तके ही ज्ञानार्जनाचे काम करतात. पुस्तकी ज्ञानाने मुलांची शैक्षणिक प्रगती होते. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पुस्तकांचे वाचन करून ज्ञान वाढवावे, असे आवाहन जयवंत राय यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

