कोकणचे पर्यावरण जपणे हिच खरी श्रद्धांजली
पर्यावरण जपणे हीच डॉ. गाडगीळना श्रद्धांजली
जागवल्या आठवणी; आपत्ती मानवाने निसर्गात केलेल्या हस्तक्षेपामुळे
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ८ : रत्नागिरी जिल्ह्यात पूर, चक्रीवादळ, दरडी कोसळणे, डोंगरांना तडे जाण्यासारखे नैसर्गिक संकट मोठ्या प्रमाणावर येत आहे. हे संकट नैसर्गिक असले तरी त्यामुळे झालेल्या मनुष्य आणि वित्तहानीचे मूळ मानवाने निसर्गात केलेल्या हस्तक्षेपात आहे, हे वक्तव्य ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी रत्नागिरीतील दौऱ्यावेळी केले होते. डॉ. गाडगीळ यांचे आज सकाळी निधन झाले अन् त्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. कोकण दौऱ्यावेळी त्यांची भेट झालेल्या पर्यावरण अभ्यासकांनी गाडगीळ यांच्या जाण्याने पर्यावरण संवर्धन चळवळीतील तारा निखळल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली तर कोकणचा निसर्ग आणि पर्यावरण जपणे हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरेल, असेही मत व्यक्त केले.
शासनाने २०११ मध्ये पश्चिमघाटाचा अभ्यास करण्यासाठी गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. त्या वेळी डॉ. गाडगीळ यांनी चिपळूण, रत्नागिरी, राजापूरसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी दिल्या होत्या. जिल्ह्यातील डोंगराळ भागात असलेल्या स्टोन क्रशरला त्यांनी विरोध केलेला होता. दगडाच्या खाणीमुळे डोंगराला तडे जाण्याचे प्रकार वाढलेले आहेत. हवेचे प्रदूषण वाढले आहे, हे त्यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. राजापूरच्या नाणार प्रकल्पाला त्यांनी विरोध केला होता. लोटे औद्योगिक वसाहतीमुळे चिपळूणमधील वाशिष्ठी नदी विषारी झाल्याचे त्यांनी अहवालात नमूद केलेले होते. माशांच्या घटत्या संख्येमुळे येथील मासेमारी झपाट्याने कमी होत चालली आहे. कोकण हे विषाने भरले जात आहे. हे वेळीच थांबले नाही तर भविष्यात चिपळूण, दापोली, खेड, गुहागरचा समृद्ध निसर्ग नष्ट होईल, असा इशारा त्यांनी दिला होता.
-------
कोट १
कोकणातील निसर्गाचा कोप टाळण्यासाठी संवेदनशील भागातील मानवी हस्तक्षेप थांबवण्याचा इशारा डॉ. माधव गाडगीळ यांनी दिलेला होता. गाडगीळ समितीचा अहवाल हा कोकणातील पर्यावरण क्षेत्रातील मैलाचा दगड मानला जातो. कोकणचे निसर्ग आणि पर्यावरण जपणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार.
- समीर कोवळे, पर्यावरणप्रेमी, चिपळूण
-------
कोट २
भारतामधील पर्यावरण संवर्धन चळवळ ही दोन टोकाची आहे. त्यामधील दरी भरून काढण्याचे काम ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी केले. ते जागतिक दर्जाचे संशोधक होते. त्यांनी जे संशोधन केले ते लोकांसाठी उपयुक्त असेच होते. त्यांच्या संशोधनाचा उपयोग अनेक अभ्यासकांना झाला. पश्चिमघाट बचाव चळवळीला त्यांच्या संशोधनामुळे बळ मिळाले.
- डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई, अभ्यासक
-------
कोट ३
संयुक्त राष्ट्रातर्फे पर्यावरण क्षेत्रातील दिला जाणारा सर्वोच्च सन्मान चॅम्पियन ऑफ दी अर्थ’ हा पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. माधवराव गाडगीळ यांना मिळाला होता. हा पुरस्कार पश्चिम घाटातील जैवविविधतेचे जतन व संशोधन कामातील अतुलनीय योगदानासाठी दिला जातो.
- डॉ. विवेक भिडे, अभ्यासक
-----
कोट ४
गाडगीळ यांनी विकासात स्थानिक समुदायांना सहभागी करून घेण्यावर भर दिला. त्यांच्या मते, निसर्ग वाचवण्यासाठी स्थानिक लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे म्हणून त्यांनी ग्रामसभेला निर्णय घेण्याची शिफारस केली होती. विकास हवा; पण निसर्गाचा बळी देऊन नको, अशी त्यांची भूमिका होती.
- भाऊ काटदरे, चिपळूण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

