लोटेतील वादग्रस्त कंपनी बंद करण्याची मागणी
लोटेतील ‘ती’ वादग्रस्त कंपनी बंद करा
काँग्रेसतर्फे निदर्शने ; तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ८ ः लोटे औद्योगिक वसाहतीमधील बहुचर्चित ‘त्या’ कंपनीविरोधात काँग्रेसच्यावतीने प्रवेशद्वारासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यानंतर कंपनी व्यवस्थापनाने आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांशी कार्यालयात बोलावून चर्चा केली. उपस्थितांचे समाधान झाले नाही. जोपर्यंत स्थानिकांचे प्रश्न आणि समस्यांचे निराकरण होत नाही तसेच आयआयटी दर्जाच्या तज्ज्ञांची चौकशी समिती नेमून अहवाल येत नाही तोपर्यंत ही कंपनी बंद ठेवावी अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिला.
लोटेतील एक्सल फाटा येथे आंदोलक हातात रध्वज घेऊन कंपनीविरोधात जोरदार निदर्शने केली. एक्सल फाटा येथून घोषणा देत आंदोलनकर्ते कंपनीच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले. खेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी सणस यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. माजी खासदार हुसेन दलवाई यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. पोलिसांनी सुरुवातीला प्रवेशद्वारावर आंदोलनकर्त्यांना अडवले. आंदोलनकर्त्यांनी कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करण्याची मागणी केली. त्यानुसार शिष्टमंडळ व कंपनी व्यवस्थापन आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा झाली. दलवाई म्हणाले, हा मोर्चा म्हणजे कोकणच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. या वेळी कंपनी व्यवस्थापनाकडून कंपनीच्या उत्पादनाबाबत माहिती दिली; मात्र उपस्थित आंदोलनकर्त्यांचे समाधान झाले नाही. अधिकारी कंपनीचीच बाजू मांडणार, अशी भूमिका घेत आंदोलनकर्ते उदय घाग, भरत लब्धे, अशोक जाधव, पंकज दळवी यांनी आक्षेप घेत या कंपनीत घडलेल्या दुर्घटनांबाबत विषय मांडला. सध्या कंपनीत १२० कर्मचारी कार्यरत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आम्हीदेखील येथे काम करत आहेत. सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे, असे सांगितले. शेवटी आंदोलनकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जोपर्यंत स्थानिक ग्रामस्थ व लोकांच्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत, त्यांचे शंका निरसन होत नाही तोपर्यंत कंपनी बंद ठेवावी, अशी मागणी नायब तहसीलदार इंगळे यांच्याकडे केली. या वेळी काँग्रेसच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग, भरत लब्धे, अशोक जाधव, इब्राहिम दलवाई, उल्का महाजन, निर्मला जाधव, नगरसेवक साजिद सरगुरोह, सफा गोठे, मिसबाह नाखुदा, मुजफ्फर सय्यद, सुमती जांभेकर, राजन इंदुलकर, रवीना गुजर, राम रेडीज, सुबोध सावंतदेसाई, सतीश कदम, रामदास घाग तसेच संदीप फडकले आदींसह लोटे परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

