सदर-धुंधूरमास अन् पारंपरिक बाजरीची खिचडी

सदर-धुंधूरमास अन् पारंपरिक बाजरीची खिचडी

Published on

rat9p1.jpg
16517
संगीता खरात

पाक-पोषण .................लोगो

इंट्रो

सूर्य ज्या महिन्यात धनू राशीत असतो त्या मासाला धनुर्मास किंवा धुंधूरमास म्हटले जाते. हा कालावधी साधारणत: मार्गशीर्ष आणि पौष महिन्यांदरम्यान म्हणजेच डिसेंबर-जानेवारीमध्ये येतो. याच महिन्याला ‘शून्यमास’ असेही म्हणतात. कारण, या काळात शुभकार्ये वर्ज्य मानली जातात; मात्र आरोग्य व आध्यात्मिक साधना आणि विविध व्रते घेतली जातात. यात पहाटे उठून गरम अन्न खाणे, देवाला नैवेद्य दाखवणे यासारख्या गोष्टी केल्या जातात. गावोगावी धुंधूरमासाचे औचित्य साधून देवळात काकड आरती मग कीर्तन आणि प्रसाद वाटला जात असे. अशा काळात मस्त खाणे कोणते पाहूया....

- संगीता खरात
सहसंचालिका, सृष्टीज्ञान संस्था
------------------------------------

धुंधूरमास अन् पारंपरिक बाजरीची खिचडी

हेमंत ऋतूमध्ये या काळात रात्री मोठ्या असतात. हवेत गारठा असतो आणि छान भूक लागत असते. तसेच या काळात खरिपातील धान्ये सडवून तयार व्हायची तर रब्बीतीळ शाळू, मक्यासारखी कणसे तयार व्हायची त्याशिवाय दवावर वाढलेल्या विविध फळभाज्या, शेंगभाज्या तयार असतात. त्यांचाच वापर करून विविध खाद्यपदार्थ तयार केले जातात. धनुर्मासात सकाळी ताजे गरम अन्न आधी सूर्याला नैवेद्य दाखवावा आणि मग भक्षण करावे, अशी परंपरा आहे. रब्बीचा हंगाम करत असताना शेतकरी धुंधूरमास पाळायचे. या वेळी आहारात आवर्जून बाजरी, गूळ, तीळ आणि स्निग्ध पदार्थांचा आहारात समावेश केला जातो. पहाटे सूर्य उगवायच्या आधी शेतात जायचं आणि शेकोटीच्या उबेत मुगाच्या डाळीची खिचडी, बाजरीची भाकरी, वांग्याची भाजी किंवा भरीत, कांदा, लोणी किंवा लोणकढं तूप असा बेत जेवायचा. मित्रमंडळींना जमवून हुर्डापार्टी केली जायची. शेतात उपलब्ध विविध भाज्यांची मिश्रभाजी बनवतात, त्याला लेकूरवाळी भाजी असंही म्हणतात. धुंधूरमासाचा शेवटचा दिवस म्हणजे भोगी! त्यामुळे एरवी शक्य झाले नाही तरी आजही भोगीला तीळ लावून बाजरीची भाकरी, लेकूरवाळी भाजी, वांग्याचे भरीत, कढी असा नैवेद्य नक्की केला जातो.
आता आपल्याला खिचडी म्हणजे तांदूळ-डाळीची खिचडी आठवते; मात्र खिचडीच्या पारंपरिक पाककृतीमध्ये तांदळाऐवजी बाजरी, ज्वारी, राळा, कोदो, कुटकीयासारख्या आदिमधान्यांचा वापर केला जायचा. त्यात मुगाची साली डाळ घालून ही खिचडी केली जात असे. पाहूया, पारंपरिक बाजरीच्या खिचडीची पाककृती. त्याला बाजरीचा खिचडा असेही म्हटले जाते.
साहित्य-एक वाटी बाजरी, अर्धी वाटी बारीक तांदूळ, मुगाची साली डाळ एक वाटी, शेंगदाणे अर्धी वाटी, फोडणीसाठी २ टीस्पून तेल, मोहरी एक टीस्पून, कढीलिंबाची पाने, दोन हिरव्या मिरच्या, आले एक इंच किसून, हिंग पाव टीस्पून, हळद अर्धा टीस्पून, तिखट अर्धा टीस्पून, सुक्या खोबऱ्याचा कीस अर्धी वाटी, एकटी स्पून जिरे, सजावटीसाठी कोथिंबीर बारीक चिरून, मीठ आणि गूळ चवीनुसार.
कृती : बाजरी स्वच्छ धुवून तीन तास भिजत घालावी. मूगडाळ आणि शेंगदाणे स्वच्छ धुवून एक तास भिजवावे. भिजलेली बाजरी मिक्सरमध्ये हलकेच फिरवून भरड करून घ्यावी.
बाजरीची भरड, धुतलेले तांदूळ, भिजलेली मूगडाळ आणि शेंगदाणे यात तिप्पट पाणी आणि मीठ घालून कुकरमध्ये शिजवून घ्यावे. साधारणपणे तीन ते चार शिट्टीमध्ये खिचडा मऊ शिजतो. सुके खोबरे किसून घ्यावे. मंद आंचेवर हे खोबरे आणि जिरे भाजून घ्यावेत. गार झाले की, मिक्सरमधून बारीक करून घ्यावे. फोडणीसाठी तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता, मिरच्या, आले, हिंग, हळद, तिखट असे क्रमाने घालत जावे. शेवटी शिजवलेला खिचडा त्यात टाकावा. सुके खोबरे आणि जिरे यांचे वाटण टाकावे. एक ग्लास पाणी गरम करून खिचडामध्ये घालावे. शेवटी चव घेऊन गरजेनुसार थोडे मीठ आणि गूळ घालून मंद आंचेवर एक वाफ येऊ द्यावी. खिचडा पळीवाढा असावा. सजावटीसाठी कोथिंबीर बारीक चिरून घालावी. सोबत खोवलेले ओले खोबरेपण घालू शकता. खिचडीप्रमाणेच साजूक तूप, ताकाची कढी, पापड, लोणचे यांच्याबरोबर बाजरीच्या खिचड्याची जोडी छान जमते. धुंधूरमासात मस्त खा आणि स्वस्थ राहा !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com