दृष्टिहीन बांधवांना स्वावलंबनाची दिशा
16557
दृष्टिहीन बांधवांना स्वावलंबनाची दिशा
मालवणातील कार्यशाळा; विविध प्रात्यक्षिकांसह उपयुक्त माहिती
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ९ ः दृष्टिहिन व्यक्तींना कोणाच्याही मदतीशिवाय समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने व आत्मविश्वासाने वावरता यावे, तसेच त्यांना मदत करण्याची योग्य व संवेदनशील पद्धत समजावी, या उद्देशाने मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण येथे दोन दिवसीय स्वयंसिद्धता निवासी कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली.
महात्मा गांधी सेवा संघ संचलित सिंधुदुर्ग जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन मालवणच्या नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे, दिव्यांग वित्त विकास महामंडळाचे निवृत्त महाव्यवस्थापक नंदकुमार फुले, पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे समुपदेशक हरिदास शिंदे, राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष बाबूराव गावडे, मातृत्व आधार फाउंडेशनचे सचिव दादा वेंगुर्लेकर, कार्यशाळा समन्वयक स्वागत थोरात, साहाय्यक प्रशिक्षक स्वरूपा देशपांडे व रेवा कदम यांच्यासह अंध दिव्यांग व डोळस प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
कार्यशाळेत दृष्टिहीन व्यक्तींसाठी अत्यंत उपयुक्त पांढऱ्या काठीचा शास्त्रीय वापर, पायऱ्या चढणे-उतरणे, रस्ता ओलांडणे, फुटपाथवर सुरक्षित चालणे, हस्तांदोलन यांसह दैनंदिन व्यवहारातील विविध कृतींचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक व सराव करून घेतला. तसेच गंध व स्पर्शाच्या आधारे धान्य व भाज्या ओळखणे, आवाजांवरून दिशा व अंतर ओळखणे याबाबत मार्गदर्शन केले. स्नायूंची लवचिकता वाढवणारे व्यायाम तसेच श्रवणशक्ती व स्मरणशक्ती वाढवणारे खेळ यामुळे सहभागी दृष्टिहीन बांधवांमध्ये आत्मविश्वास व सकारात्मकतेचा नवा संचार झाल्याचे चित्र दिसून आले. बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण व लायन्स क्लब, मालवण यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडली. यशस्वी आयोजनासाठी अनिल शिंगाडे, बाबूराव गावडे, दादा वेंगुर्लेकर, विशाखा कासले, प्रसन्ना शिर्के, ललित गावडे, अरविंद आळवे, प्रकाश वाघ, रंजना इंदुलकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

