विकासकामांपेक्षा मनस्तापच मोठा
16763
विकासकामांपेक्षा मनस्तापच मोठा
सावंतवाडीतील प्रकार; पाणीपुरवठा, गॅस लाईनचे खोदकाम बेशिस्त
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १० : शहरात सुरू असलेल्या गॅस पाईपलाईन व पाणीपुरवठा लाईनच्या नियोजन शून्य कामाचा मनस्ताप स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे. अंतर्गत रस्त्यांची पुरती दैना झाली आहे. धुळीच्या साम्राज्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. हे काम मनमानी पद्धतीने सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
सध्या सर्वोदयनगर कॉलनी आणि खासकीलवाडा परिसरात हे काम सुरू आहे. यातील सर्वोदयनगरमध्ये गेल्या महिनाभरापासून गॅस पाईपलाईन व पाणीपुरवठा लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. काम सुरू होण्यापूर्वी येथील रहिवासी व्यवस्थित व सुरक्षित जीवन जगत होते. ठेकेदाराने मनमानी स्वरुपाचे काम सुरू केल्यानंतर येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते दोन्ही बाजूने फोडले आहेत. पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याची स्थिती आहे. पूर्वकल्पना न देता किंवा आवश्यक काळजी न घेता अचानक रस्ता बंद करून तो खोदला जात असल्याने नागरिकांना बाहेर पडणे कठीण बनले आहे. या विकासकामांमुळे नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू आहे. या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रसामग्रीमुळे प्रचंड धूळ, घाण व अस्वच्छता पसरली आहे. काम सुरू असताना नगरपरिषदेचा एकही जबाबदार कर्मचारी प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित नसतो. त्यामुळे त्याला कोणी वालीच नसल्याचे चित्र आहे.
----
अनेकांना आरोग्याचा त्रास
गेल्या महिनाभरात या परिसरातील अनेक नागरिकांना श्वसनाचा त्रास, आमांश (डिसेन्ट्री), उलट्या व इतर आजारांना सामोरे जावे लागले आहे. यास संपूर्णपणे सद्यस्थितीत सुरू असलेले नियोजनशून्य व बेजबाबदार काम कारणीभूत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. उपजिल्हा रुग्णालयाच्या मागच्या बाजूला खासकीलवाड्यात चार दिवसांपूर्वी या कामाची सुरुवात करण्यात आली. सध्या पाणी योजनेचे पाईप टाकले जात आहेत. त्या कामाबाबत कोणतेच नियोजन नसल्याचे चित्र आहे. वाहतूक मार्गाची पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याने नागरिक हैराण झाले आहे. हा रस्ता आधीच अरुंद आहे. खोदकाम केल्याने त्याची पूर्ण दैना झाली आहे.
.......................
कोट
दोन दिवसांत हे बेशिस्त काम तत्काळ थांबवून योग्य पद्धतीने, आवश्यक खबरदारी व प्रशासनाच्या उपस्थितीत सुरू करावे; अन्यथा सर्वोदयनगरमधील नागरिक स्वतः निर्णय घेण्यास सक्षम आहेत, याची नोंद घ्यावी. याबाबत योग्य ती कार्यवाही करून बेशिस्त कामाला वेळीच यावर आवर घालावा. जनक्षोभाला प्रशासन स्वतः जबाबदार राहील.
- प्रा. सिद्धेश नेरुरकर, स्थानिक रहिवासी, सावंतवाडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

