कसाल-हेदुळ रस्त्यावर 
धुळीचा ग्रामस्थांना त्रास

कसाल-हेदुळ रस्त्यावर धुळीचा ग्रामस्थांना त्रास

Published on

कसाल-हेदुळ रस्त्यावर
धुळीचा ग्रामस्थांना त्रास
कुडाळ ः कसाल येथील हेदुळ मालवण या प्रमुख रस्त्याच्या दुतर्फा धुळीचे साम्राज्य पसरले असून नागरिक हैराण झाले आहेत. रस्ते रुंदीकरणाच्या नादात ठेकेदाराने कामे पूर्ण केली; मात्र रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे सतत प्रदूषण होत आहे. या धुळीमुळे दुचाकीस्वार व रस्त्यालगतच्या नागरिकांना फटका बसत आहे. यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून ठेकेदाराने लक्ष द्यावे, अशी मागणी जनतेतून होत आहे. रस्त्यावरील या धुळीचा सर्वाधिक फटका रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिक, दुचाकीस्वार, वाहनचालकांना बसतो. डोळ्यांची जळजळ, घसा खवखवणे, श्वास घेण्यास त्रास अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. रस्त्यावरून पुढे जाणार्‍या वाहनामागे वाहन, दुचाकी असेल, तर त्या धुळीमधूनच वाहनचालकांना गाडी पुढे हाकावी लागत आहे. त्यामुळे डोळ्यात धुळीचे कण जाऊन त्रास होतो. ठेकेदाराने नियमित पाण्याची फवारणी करावी. तातडीची स्वच्छता करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
---
वेंगुर्ले येथे गुरुवारी
बाल आनंद मेळावा
वेंगुर्ले ः आधार फाउंडेशन, सिंधुदुर्गच्या दुसर्‍या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी (ता. १५) दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत येथील नगरवाचनालय येथे शिशु/बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्यात ६ ते ११ महिने यातील लहान मुलांची ‘रांगण्याची स्पर्धा’ (३० फूट) या विशेष स्पर्धेचे आयोजन केले आहे. शिवाय ३ वर्षांखालील व ३ वर्षांवरील ते ६ वर्षांखालील मुलांसाठी ‘वेशभूषा स्पर्धा’ आयोजित केली आहे. प्रत्येक स्पर्धकाला दोन मिनिटांचा कालावधी असेल. सहा वर्षांवरील ते आठ वर्षांखालील मुलांसाठी कविता पाठांतर स्पर्धा तसेच ८ वर्षांवरील ते १० वर्षांखालील मुलांसाठी मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा (किमान १०) आयोजित केली आहे. प्रत्येक स्पर्धकाला तीन मिनिटांचा कालावधी आहे. कविता व मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळेत त्याच हॉलमध्ये होतील. प्रथम तीन क्रमांकांना बक्षिसे देण्यात येतील. स्पर्धेत तालुक्यातील वा जिल्ह्यातील स्पर्धक सहभागी होऊ शकतो. अधिक माहितीसाठी अ‍ॅड. नंदन वेंगुर्लेकर, किरण वेंगुर्लेकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आधार फाउंडेशनच्या अध्यक्षा माधुरी वेंगुर्लेकर यांनी केले आहे.
-----
सातोसेत ज्येष्ठांचा
उद्या स्नेहमेळावा
सावंतवाडी ः सातोसे येथील ज्येष्ठ नागरिक संघाचा स्नेहमेळावा उद्या (ता. ११) श्री देवी माऊली मंदिर येथे होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वाजता आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद, सायंकाळी सातोसे गावातील वयाची ७५ वर्षे व विवाहाची ५० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान, सायंकाळी ६ वाजता सातोसे अत्रेवाडी येथील प्रवचनकार गोविंद पेडणेकर यांचा सत्कार, प्रवचन, ७ वाजता नेरुर येथील कलेश्वर दशावतार मंडळाचा ''गोमय गणेश'' हा नाट्यप्रयोग होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघ व सातोसे ग्रामस्थांनी केले आहे.
......................
शिडवणे कोनेवाडीत
रविवारी क्रिकेट स्पर्धा
खारेपाटण ः शिडवणे-कोनेवाडी ग्रामस्थ व मुंबई क्रीडाप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने कोनेवाडी प्रीमियर लीग पर्व दुसरे २०२६ या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवारी (ता. १८) शिडवणे (कोनेवाडी) येथे होणार आहे. या स्पर्धेत शिडवणे कोनेवाडीमधील नामांकित संघांचा सहभाग असणार असून क्रिकेटप्रेमींना दर्जेदार आणि रंगतदार सामने पाहण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेसाठी प्रथम २५,०००, तर द्वितीय पारितोषिक १५,००० रुपये ठेवण्यात आले आहे. उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज यांनाही विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
---
सावंतवाडीत रविवारी
मकर संक्रांती उत्सव
कुडाळ ः राष्ट्र सेविका समिती सिंधुदुर्ग यांच्या वतीने ''नवं पाऊल नवा डाव'' या ब्रीदप्रमाणे सघोष पथसंचलन व मकर संक्रांती उत्सवाचे आयोजन रविवारी (ता. १८) सायंकाळी ४ ते ६ या वेळेत सावंतवाडी राजवाडा येथे करण्यात आले आहे. राजवाडा, बाजारपेठ, आरपीडी हायस्कूल, मारुती मंदिर ते पुन्हा राजवाडा असा संचलन मार्ग आहे. नागरिकांनी उपस्थित राहून पुष्पवृष्टी व रांगोळ्या काढून ध्वजाचे स्वागत करावे, असे आवाहन जिल्हा कार्यवाहिका मृणाल देसाई, सावंतवाडी तालुका कार्यवाहिका मीना उकीडवे यांनी केले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com