मेंदू मोबाईलच्या माहितीच्या माऱ्याने थकून जातो
rat11p2.jpg-
16882
डॉ. स्नेहल तोडकर-अंधारे
राखूया मनाचे आरोग्य .........लोगो
इंट्रो
जानेवारीची ती गुलाबी थंडी आणि सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश, पण कॉलेजच्या कट्ट्यावर बसलेल्या समीरच्या चेहऱ्यावर मात्र चिंतेचे ढग होते. हातात महागडा स्मार्टफोन पण डोळ्यांत हरवलेली स्वप्ने. आयटी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असलेला समीर आजच्या पिढीचा प्रतिनिधी . बाहेरून ''अप-टू-डेट'' पण आतून प्रचंड मानसिक तणावाखाली. "मार्क्स चांगले मिळतील का? नोकरी लागेल का? आणि लागलीच तर मी इतरांच्या स्पर्धेत टिकेन का?" अशा प्रश्नांच्या जाळ्यात अडकलेला. कॉलेजच्या हॉलमध्ये स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन चालू होते. समीर तिथे जाऊन कोपऱ्यात शांत बसला. व्यासपीठावरून एका वक्त्याने स्वामीजींचा एक विचार सांगितला, "लोखंडी स्नायू आणि पोलादी मज्जातंतू असलेला तरुण मला हवा आहे." समीरला वाटले, "हे स्नायू तर जिममध्ये जाऊन बनतील, पण हे ''पोलादी मज्जातंतू'' (Nerves of Steel) म्हणजे नक्की काय ?
- डॉ. स्नेहल तोडकर-अंधारे,
एमबीबीएस, डी.पी.एम., एमआयपीएस, (मानसशास्त्र- सुवर्णपदक प्राप्त).
------------------------------------------
मेंदू मोबाईलच्या माहितीच्या माऱ्याने थकून जातो
आजच्या काळात पोलादी मज्जातंतू म्हणजे केवळ शारीरिक ताकद नाही, तर ते आहे ''मानसिक आरोग्य''. आज प्रत्येक सेकंदाला आपली तुलना जगाशी केली जाते. इन्स्टाग्रामवरील कोणाचे तरी ''फिल्टर'' लावलेले आयुष्य पाहून आपल्याला आपले साधे आयुष्य फिके वाटू लागते. यालाच मानसशास्त्रात कंपॅरिझन ट्रॅप (comparison trap) म्हणतात. सध्या जागतिक स्तरावर १०-१९ वयोगटातील ७ पैकी १ मुलगा कोणत्या ना कोणत्या मानसिक समस्येचा सामना करत आहे. भारतात शैक्षणिक ताण, शरीर प्रतिमेची भीती (body image anxiety) आणि डिजिटल बर्नआऊट यासारख्या समस्या वाढत आहेत.
स्वामी विवेकानंद म्हणायचे, ‘‘ब्रह्मांडातली सर्व शक्ती तुमच्यात आहे. तुम्हीच तुमच्या डोळ्यांवर हात ठेवता आणि म्हणता की किती अंधार आहे!’’ समीरला जाणवले की, तोही हेच करत होता. करिअरच्या आणि स्पर्धेच्या चिंतेने त्याने स्वतःच्या क्षमतेवरच शंका घ्यायला सुरुवात केली होती. स्वतःवरचा विश्वास गमावणे म्हणजे मानसिक आरोग्य बिघडणे. कार्यक्रमानंतर समीर ग्रंथालयात गेला. तिथे त्याने स्वामीजींच्या जीवनातील एक प्रसंग वाचला. जेव्हा अमेरिकेत स्वामीजींवर टीका होत होती, लोक त्यांना त्रास देत होते, तेव्हाही ते विचलित झाले नाहीत. त्यांच्या मनाची एकाग्रता इतकी दांडगी होती की, समुद्रकिनारी बसूनही त्यांना केवळ त्यांचे ध्येय दिसत होते.
आजच्या तरुणाचा सर्वात मोठा शत्रू आहे. ''डिस्ट्रॅक्शन'' (distraction) करण्यासाठी आपण दिवसाचे ६ ते ७ तास मोबाईलवर घालवतो. आपला मेंदू सतत माहितीच्या माऱ्याने थकून जातो. यालाच ''मेंटल फटीग'' (mental fatigue) म्हणतात. समीरने ठरवले उत्तम भविष्य हवं तर आधी माझे मन सशक्त हवे. त्याने त्याच क्षणी रोज रात्री झोपण्यापूर्वी एक तास तो मोबाईल बाजूला ठेवेल आणि स्वतःशी संवाद साधेल असा निश्चय केला.
समीरच्या कथेसारखीच कथा आज प्रत्येक घरातल्या मुला-मुलीची आहे. आपल्याला वाटतं की आपण एकटेच आहोत, पण तसं नसतं. आपल्या आजूबाजूला अशी अनेक माणसं असतात जी आपल्याला मदत करायला तयार असतात. फक्त आपल्याला संवादाचा पूल बांधता आला पाहिजे. स्वामीजींनी सांगितले होते, "मदत मागणे हा कमकुवतपणा नाही, तर ती स्वतःला सुधारण्याची पहिली पायरी आहे."
* डिजिटल जगासोबत निरोगी नाते निर्माण करण्यासाठी पुढील टिप्स तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील.
१) फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन ''Digital Wellbeing'' किंवा ''Screen Time'' तपासा.
२) अनावश्यक नोटिफिकेशन्स बंद करा
३) ''नो फोन झोन'' (No Phone Zones) तयार करा. घरात काही नियम पाळा. जेवताना फोन जवळ न ठेवणे: कुटुंबासोबत संवाद साधा. बेडरूममध्ये फोन नेणे टाळा: झोपण्यापूर्वी किमान १ तास आधी फोन लांब ठेवा.
४) सकाळचा पहिला एक तास मोबाईल ऐवजी स्वतःला द्या. सकाळी उठल्यावर लगेच व्यायाम, वाचन किंवा ध्यान (Meditation) करा.
५) ग्रे-स्केल मोडचा वापर करा. यामुळे स्क्रीन काळी-पांढरी दिसेल आणि फोन वापरण्याचा मोह आपोआप कमी होईल.
६) पर्यायी छंद जोपासा. जेव्हा आपण रिकामे असतो तेव्हाच फोन जास्त वापरला जातो. फोनऐवजी पुस्तक वाचन, चित्रकला, खेळ किंवा एखादे नवीन कौशल्य शिकण्यावर लक्ष केंद्रित करा.
७ आठवड्यातून एक दिवस (उदा. रविवार) मोबाईल फ्री दिवस म्हणून पाळा. तसेच, ज्या ॲप्सचा तुम्हाला उपयोग नाही, ते त्वरित डिलीट करा.
आणखी काही गोष्टी लक्षात ठेवा. वेळ पाहण्यासाठी फोन बघण्याऐवजी हातातील घड्याळ वापरा. इंस्टाग्राम किंवा गेमिंग ॲप्ससाठी दररोज ३०-४५ मिनिटांची मर्यादा सेट करा. कामाच्या वेळी किंवा अभ्यासाच्या वेळी फोन दुसऱ्या खोलीत ठेवा.लक्षात ठेवा मोबाईल आपल्याला जोडण्यासाठी आहे, कैद करण्यासाठी नाही. त्याचा वापर तुम्ही करा, त्याला तुमचा वापर करू देऊ नका.
(लेखक मानसोपचारतज्ञ , व्यसनमुक्तीतज्ञ व समुपदेशक असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी येथे कार्यरत आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

