कौलारू घरांची शाकारणी व्यवसायाला घरघर

कौलारू घरांची शाकारणी व्यवसायाला घरघर

Published on

कौलारू घरांची शाकारणी व्यवसायाला घरघर
स्लॅब व पत्र्यांच्या घरांना मागणी; मजुरांना फटका
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ११ : अलीकडच्या काळात जिल्ह्यात स्लॅबची घरे तसेच छपरांसाठी प्लास्टिक, लोखंडी व सिमेंट पत्र्यांचे विविध पर्याय मोठ्या प्रमाणात वापरात येऊ लागले आहेत. यामुळे पारंपरिक कौलारू घरे हळूहळू दुर्मिळ होत असून, या घरांच्या शाकारणीवर अवलंबून असलेल्या कामगारांच्या रोजगारावर गंभीर परिणाम झाला आहे. अनेक शाकारणी कामगारांना आता उपजीविकेसाठी पर्यायी रोजगाराचा शोध घ्यावा लागत आहे.
शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही स्लॅबचे बंगले झपाट्याने उभे राहत आहेत. स्लॅब बांधकाम परवडत नसलेल्या नागरिकांकडून कौलारू घरे बांधली जात असली तरी त्यामध्ये मातीच्या कौलांऐवजी प्लास्टिक, लोखंडी किंवा सिमेंट पत्र्यांचा वापर वाढत आहे. परिणामी उन्हाळ्यात घरात नैसर्गिक गारवा देणारी पारंपरिक कौलांची छपरे आता इतिहासजमा होत चालली आहेत.
ग्रामीण भागात मातीच्या कौलांनी बांधलेली घरे मोठ्या प्रमाणावर आढळत. अशा घरांमध्ये उन्हाळ्यातही गारवा टिकून राहत असे. मात्र छपराच्या रचनेमुळे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शाकारणी करणे आवश्यक असायचे. अन्यथा पावसाचे पाणी झिरपून लाकडी रिपा कुजण्याचा धोका निर्माण होत असे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी कौल उतरवणे, खराब झालेले लाकूड बदलणे, साफसफाई करणे आणि पुन्हा कौल बसवण्याची प्रक्रिया केली जात असे.
आजही ग्रामीण भागात तुरळक प्रमाणात जुन्या कौलारू घरांवर कौल दिसून येतात. दरवर्षी ठरावीक हंगामात कराव्या लागणाऱ्या शाकारणीच्या कामामुळे ही कला अवगत असलेल्या ग्रामस्थांसाठी हा एक महत्त्वाचा हंगामी रोजगार ठरत असे. गावागावांत चार ते पाच कामगारांचा समावेश असलेले शाकारणीचे गट कार्यरत असत. गटप्रमुखाला माहिती दिल्यानंतर सूर्योदयानंतर काम सुरू होऊन सायंकाळपर्यंत चालत असे. घर मोठे असल्यास हे काम दोन दिवसांपर्यंतही चालायचे.

चौकट
कौल शाकारणीची कामे पडली बंद
या कामासाठी मिळणारी मजुरी इतर कामांच्या तुलनेत चांगली होती. एप्रिल ते मे अखेरपर्यंत चालणाऱ्या या हंगामामुळे अनेक कुटुंबांना रोजगार मिळत असे. मात्र सध्या आकर्षक डिझाइनची प्लास्टिक व लोखंडी पत्रे तसेच स्लॅब घरांकडे लोकांचा वाढता कल असल्याने कौलारू घरे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी कौल शाकारणीची कामे जवळजवळ बंद पडली असून, तीन ते चार महिने रोजगार देणारा हा पारंपरिक व्यवसाय अस्तंगत होण्याची भीती व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com