कोकणचे विहग वैभव

कोकणचे विहग वैभव

Published on

rat11p7.jpg-
16913
थव्याने अवकाशामध्ये कसरती करणारे इवलेशे सीगल पक्षी.
rat11p13.jpg-
16905
कोकणातून नामशेष होत असलेले गिधाड.
rat11p14.jpg-
16906
ग्रेट हॉर्नबिल
- rat11p15.jpg-
16907
लेसर व्हिसलिंग डक
- rat11p16.jpg-
16908
अमूर ससाणा
rat11p17.jpg-
16909
युरोपियन रोलर
- rat11p18.jpg-
O16910
ब्लॅक स्टॉर्क (काळा करकोचा)
---------------

बिगस्टोरी----------लोगो

इंट्रो

पश्‍चिम घाट आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या कुशीमध्ये वसलेल्या कोकणातील जैवविविधता आणि निसर्गसंपदा सार्‍यांचे लक्ष वेधून घेते. त्याला विपुल पक्षीवैभवाचीही जोड मिळाल्याने खऱ्या अर्थाने कोकणचे निसर्गसौंदर्य आणि जैवविविधता अधिक खुलली आहे. ‘बर्ड वॉच’सारखे पर्यटन राबवल्यास त्यातून नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होताना निसर्गाचेही जतन आणि संवर्धन होणार आहे; मात्र निसर्गसाखळीमध्ये महत्त्वपूर्ण असलेले आणि पर्यावरणातील विविध मानांकनाचे सूचक ठरणारे पक्षीवैभव अनेक कारणांमुळे धोक्यात येऊ लागले असून काही पक्षी प्रजाती संकटात येऊ लागल्या आहेत. त्यामुळे कोकणच्या पक्षीवैभवाचे जतन आणि संवर्धनासाठी जनप्रबोधनासोबतच सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे.

- राजेंद्र बाईत, राजापूर

--------

कोकणचे विहगवैभव

पाहुण्यांसाठीही निवास ; पक्षी निरीक्षणासाठी पर्यटकांचा ओघ, संवर्धनाचेही आव्हान

निसर्गसाखळी अबाधित राखणे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यामध्ये पक्ष्यांचे अस्तित्व महत्त्वाचे आहे. बीजप्रसाराद्वारे पक्षी जंगलवाढ करण्यास साह्य करतात. या जंगलवाढीतून तापमानवाढीसारखी समस्या नियंत्रणात आणणे शक्य होणार आहे. मृत प्राण्यांचे अवशेष घारी, गिधाड आदी पक्ष्यांनी खाऊन नष्ट न केल्यास असे प्राणी अवशेष कुजल्याने त्यातून मुक्त होणारा मिथेनसारखा वायू तापमानवाढीला कारणीभूत ठरतो. कीटकांना खाद्य पुरवण्याचे काम वनस्पती व प्राणी करतात; मात्र कीटकांची संख्या नियंत्रित न राहिल्यास शेती वा अन्य वनस्पती जिवंत राहण्याची शक्यता कमी आहे. अशा कीटकांना पक्षी खात असल्याने कीटकांची संख्या नियंत्रित राहण्यासह पर्यावरणाचा समतोल राखण्यामध्ये पक्ष्यांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.
-------

देवराया संवर्धनाची गरज

कोकणातील अनेक गावांमध्ये विविध वनसंपदा असलेल्या देवराया आहेत. ग्रामदेवतेच्या देवळाच्या परिसरातील या देवरायांमध्ये शेकडो वर्षांचे पुरातन आणि दुर्मिळ अनेक झाडे पाहायला मिळतात. देवराया पक्ष्यांना नैसर्गिक अधिवास पुरवताना त्यांना अन्न (फळे, मध), पाणी आणि निवारा मिळतो. त्याचवेळी देवराया जंगलतोडीला प्रतिबंध करतात आणि मातीची धूप थांबवतात, ज्यामुळे पक्ष्यांसाठी एक स्थिर आणि सुरक्षित नैसर्गिक पर्यावरण तयार होते. देवरायांमधील वृक्षांना असलेल्या ढोल्या यांसह देवरायांमधील शांत वातावरण त्यांच्या वास्तव्यासाठी उपयुक्त ठरते. एकंदरीत, गावातील देवराया पक्ष्यांसाठी एकप्रकारे ‘सुरक्षित बेट’ ठरत आहेत. उन्हाळ्यामध्ये पाण्याअभावी काही रूक्ष वाटणारे कोकणातील विस्तीर्ण सडे वा माळराने पावसाळ्यामध्ये हिरवीगार आणि विविधांगी फुलोर्‍याने बहरलेली असतात. याच सडे आणि माळरानावर पाणीसाठा झालेल्या छोट्या-छोट्या डबक्यांमध्ये असलेले विविध कीटक, बेडकांमुळे पक्ष्यांना मुबलक खाद्य उपलब्ध होते. त्यामुळे बगळे, वंचक, पाणकावळे, करकोचे, शराटी यांसारखे पक्षी या पाणथळ भागामध्ये आढळून येतात. यासोबत खंड्या, घारी, गरुड, ससाणे, हारियर आदी शिकारी पक्ष्यांसह समुद्री भागामध्ये प्लोवर, टिटवी, ल्हावे, तुत्वार, धोबी आदी पक्षी दिसून येतात. समुद्रकिनारपट्टीही पक्ष्यांसाठी महत्त्वाची ठरत आहे. समुद्रभागातील पाणथळ जागी वेगवेगळ्या बदकांसह पाणकोंबडी, कमळपक्षी, वारकरी, चक्रवाक, चक्रांग, चापट्या शेंडीवाले बदकसुद्धा आढळून येतात.
-----

पक्षी स्थलांतरासाठी कोकण प्रदेश महत्त्वपूर्ण

पश्‍चिम किनारपट्टीवर वसलेला कोकण प्रदेश जैवभौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा पट्टा आहे. अरबी समुद्र, नदीमुख, खारफुटी, मडफ्लॅट, पाणथळ प्रदेश आणि तटीय भातशेती यांचे संयोगात्मक अधिवास देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावरून येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांसाठी अनुकूल हिवाळी निवास उपलब्ध करतात. या प्रदेशात दरवर्षी ऑक्टोबर ते मार्च या कालखंडात मोठ्या प्रमाणावर देश-विदेशातील पक्षी स्थलांतराचे निरीक्षण नोंदवले जाते. उबदार तापमान, खाद्य उपलब्धता आणि शिकाऱ्यांपासून संरक्षण या प्रमुख कारणांमुळे अनेक आंतरराष्ट्रीय स्थलांतरित पक्षी सायबेरिया, मध्य आशिया, युरोप आदी उच्च अक्षांशातील प्रदेशातून प्रजननानंतर दक्षिणेत स्थलांतर करतात. तर भारतातील उत्तर आणि मध्य भागातून स्थलांतर करून अनेक पक्षी हिवाळ्यामध्ये कोकणामध्ये दाखल होतात. त्याचवेळी कोकण हा मध्य आशिया फ्लायवेचा प्रमुख थांबा आहे. त्यामुळे या मार्गावरील अनेक पक्षी तात्पुरता निवास करण्यासाठीही कोकणात थांबतात.
-----------

पक्षी स्थलांतराचे पर्यावरणीय महत्त्व

निसर्गसाखळीमध्ये पक्ष्यांचे ज्या प्रमाणे विशेष स्थान आणि महत्त्व आहे, त्याप्रमाणे स्थलांतरित पक्षी हे पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वाचे निर्देशक मानले जातात. स्थलांतरित पक्ष्यांच्या संख्येमधील बदल हवामान, प्रदूषण, अधिवासाच्या हानी आणि जैविक ताणांबद्दल विविध बाबी सूचित करतात. त्यामुळे पक्षी स्थलांतराचा अभ्यास पर्यावरणीय निरीक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो.
-----------

पक्षी निरीक्षणातून पर्यटन व्यवसाय

गुहागर आबलोली येथे सचिन कारेकर यांनी गारवा कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून पक्षी निरीक्षण ही नावीन्यपूर्ण संकल्पना राबवित रोजगार निर्मिती केली आहे. त्यामध्ये त्यांनी निसर्ग आणि पर्यावरणाचा समतोल न बिघडवता त्याचा सकारात्मक दृष्टिकोनातून खुबीने उपयोग केला आहे. पंधरा वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या कृषी पर्यटन केंद्रामध्ये पहिल्या वर्षी फक्त दहा पर्यटक आले होते. त्यानंतर जाहिरात वाचून पुण्यातून रमेश अरगुळकर यांनी फोनद्वारे संपर्क साधून आपल्या भागामध्ये पक्षी किती दिसतात असे विचारले, तेव्हा त्यांना अंदाजे ५० पक्षी दिसत असल्याचे सांगितले. त्यानंतर अरगुळकर गावी येऊन त्यांनी केलेल्या पाहणीमध्ये विविध प्रकारचे १०० पक्षी आढळले. त्या पक्ष्यांची पुस्तकातून ओळख करून घेतली. सध्या गावात २०० प्रकारचे पक्षी आढळत असल्याचे निदर्शनास आले. नीलकर्णी खंड्या पक्षी या भागामध्ये दरवर्षी नेस्टिंग करतो. नीलकर्णी खंड्यासह अन्य पक्ष्यांचे फोटो काढण्यासह त्यांचे जीवनमान जवळून अनुभवण्यासाठी देश-विदेशातील २५०–३०० फोटोग्राफर आणि पर्यटक दरवर्षी या ठिकाणी येतात. त्यातून आबलोली गाव जगाच्या नकाशावर आल्याचे सचिन कारेकर यांनी सांगितले. त्यातून चांगली उलाढाल होऊन त्यातून समाधानकारक उत्पन्न आणि रोजगार मिळत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
------------

अवाजवी मानवी हस्तक्षेप धोकादायक

सुरक्षित प्रजनन होण्यासाठी पक्ष्यांना नैसर्गिक अधिवासाची आवश्यकता असते; मात्र विविध कारणांसाठी भरमसाठ होणाऱ्या वृक्षतोडीमुळे पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास हरवला आहे. घरटी बांधण्यासाठी मोठी झाडे उपलब्ध होत नाहीत. त्यातून स्थानिक पक्ष्यांचा प्रजनन दर कमी झाल्याचे बोलले जात आहे. पक्ष्यांची संख्या घटण्यासह प्रजाती धोक्यात येण्यास सिमेंटची घरे आणि अन्नाची कमतरता हेही कारणीभूत ठरताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणात विकसित झालेल्या आंबा-काजू बागायतींमध्ये होणाऱ्या अतिकीटकनाशकांच्या फवारणीमुळे पक्ष्यांचे मुख्य अन्न असलेले कीटक नष्ट होत आहेत. वृक्षतोडीमुळे जंगली फळे देणारी झाडे कमी होत आहेत. परिणामी, पक्ष्यांची उपासमार होत आहे. याच्यातून पक्ष्यांच्या विहाराअभावी अवकाश काहीसे मोकळे दिसत आहे.
----------

पर्यावरणातील बदलाचा पक्षीजीवनावर परिणाम

देश-परदेशातून विविध पक्षी कोकणामध्ये ऋतुमानानुसार स्थलांतरित होऊन गेल्या कित्येक वर्षांपासून ये-जा करीत आहेत. स्थलांतरित पक्ष्यांचा समुद्रकिनारपट्टी वा नदीकिनाऱ्यावरील किलबिलाट आणि आकाशातील कसरती अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी करतात; मात्र पर्यावरणातील बदल, पावसाचे बदललेले चक्र आणि वादळांची वाढती संख्या या मानवी जीवनासोबतच पक्षीजीवनावरही प्रतिकूल परिणाम करताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये चार महिने कोसळणारा पाऊस अधिक काळ सुरू राहतो आहे. पावसाच्या या अनिश्चित चक्रासह समुद्रामध्ये सातत्याने येणाऱ्या वादळांची भर पडली आहे. यामुळे स्थलांतरित पक्ष्यांच्या येण्या-जाण्याच्या वेळेमध्ये बदल आढळले आहेत.

-------

स्थलांतरित पक्ष्यांची संख्या घटली

सातत्याने पर्यावरणामध्ये होणाऱ्या बदलांचा ऋतुमानानुसार स्थलांतरित होऊन कोकणासह रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येणाऱ्या देशी-परदेशी पक्ष्यांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्याच्यातून स्थलांतरित पक्ष्यांची संख्या घटताना ती पूर्वीच्या तुलनेमध्ये निम्म्यावर आल्याची माहिती पक्षी अभ्यासक नयनीश गुढेकर यांनी दिली. स्थलांतर होऊन आलेले पक्षी या ठिकाणी काही कालावधीपर्यंत वास्तव्य करून पुन्हा आपल्या मूळ भागामध्ये परततात; मात्र गेल्या काही वर्षांमध्ये स्थलांतर होऊन आलेले पक्षी पुन्हा परत न जाता याच ठिकाणी राहिल्याचेही दिसून येत असल्याचे गुढेकर यांनी स्पष्ट केले. पर्यावरणातील बदलांमुळे मार्गामध्ये अडथळा आल्याने किंवा मार्गक्रमण करताना भरकटल्याने काही पक्षी चुकून या ठिकाणी आल्याचीही नोंद झाल्याचे त्यांनी सांगितले. समुद्रकिनाऱ्यावर घरटी करून वास्तव्यास राहणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांना भरमसाठ होणाऱ्या मासेमारीमुळे पुरेसे खाद्य उपलब्ध होत नाही. वादळामध्ये मोठमोठी झाडे मोडून पडत असल्याने घरटी बांधण्यासाठी त्यांना किनारपट्टीवर उंच झाडे उपलब्ध होत नसल्याने अनेक स्थलांतरित पक्षी किनारपट्टीवर थांबत नाहीत.

-------

पक्षी निरीक्षकांच्या नोंदी…

* रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुमारे ३५० प्रजातींच्या पक्ष्यांचे वास्तव्य आहे. कातळसडे, गवताळ कुरणे, पानझडी जंगले, देवराया, कांदळवने तसेच पाणथळ व समुद्री असे विविध प्रकारचे अधिवास असल्याने पक्ष्यांच्या प्रजातींमध्येही तितकीच विविधता दिसून येते. यामध्ये धनेश, अनेक प्रकारचे शिकारी पक्षी, समुद्री स्थलांतरित पक्षी तसेच सामान्यपणे दिसणारे कवडे, चिमण्या, खंड्या यांचा समावेश आहे.
* अतिसंकटग्रस्त श्रेणीतील दुर्मिळ अशा तणमोर प्रजातीच्या एक मादी पक्ष्याची छायाचित्रित नोंद रत्नागिरीतील पक्षी निरीक्षकांनी मे २०२४ मध्ये चंपक मैदान येथून केली.
* संघचारी टिटवी या अतिसंकटग्रस्त प्रजातीच्या दोन पक्ष्यांची नोंद रत्नागिरीतील चंपक मैदान येथील सड्यांवर २०२२ मध्ये झाली असून ती महाराष्ट्रातील केवळ दुसरी नोंद ठरली आहे. या चंपक मैदानावर ग्रेटर स्पॉटेड ईगल, इंडियन स्पॉटेड ईगल, पॅलिड हॅरियर, इजिप्शियन वल्चर या संकटग्रस्त व दुर्मिळ पक्ष्यांच्या नोंदीही झाल्या आहेत.
* समुद्री स्थलांतरित पक्ष्यांपैकी ग्रेट नॉट, गॉडविट तसेच अनेक प्रकारचे सँडपायपर हे काळबादेवी, मिर्‍या, गुहागरचा समुद्रकिनारा व कांदळवन परिसरात आढळून येतात.
* भौगोलिक रचना, समुद्रापासूनचे निकटत्व, विस्तृत गवताळ कुरणे व खुरटी झुडपे यांमुळे चंपक मैदान परिसर विविधांगी दुर्मिळ तसेच स्थलांतरित पक्ष्यांचे महत्त्वाचे अधिवासस्थळ बनले आहे.
* नष्ट होत असलेले अधिवास, खाणकाम, हवामानातील बदल, अवैध शिकार व तस्करी, शेतीतील कीटकनाशकांचा अतिवापर आणि एकसुरी पिकांची लागवड यांचा पक्षीजीवनावर प्रतिकूल परिणाम होताना दिसत आहे.
-------
चौकट

संकटग्रस्त धनेश संवर्धनावर भर

संकटग्रस्त धनेश पक्षी संवर्धनासाठी देवरूख (जि. रत्नागिरी) येथील सह्याद्री संकल्प सोसायटी या संस्थेने २०१७ पासून ‘प्रोजेक्ट हॉर्नबिल’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. यामध्ये धनेश खाद्य झाडांची रोपवाटिका, खाद्य झाडांचे पुनर्लागवड, अधिवास पुनर्निर्मिती, कृत्रिम घरट्यांचा वापर तसेच जनजागृती यांच्या माध्यमातून धनेश संवर्धनाचा जागर सुरू करण्यात आला आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या गावांमध्ये, शाळा व महाविद्यालयांमध्ये ‘धनेश मित्र निसर्ग मंडळ’ स्थापन करण्यात आले आहे. जनजागृतीसाठी २०२४ मध्ये निसर्गप्रेमी, पर्यावरण व संवर्धन क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्ती व संस्थांच्या एकत्रित सहभागातून महाराष्ट्रातील पहिले ‘धनेश संमेलन’ देवरूख येथे झाले. त्यामध्ये धनेश पक्ष्यांची सद्यःस्थिती, त्यांना असणारे धोके व त्यावरील उपाययोजना यांचे एकत्रीकरण करून धनेश संवर्धन आराखडा तयार करण्यात आला. हा आराखडा राज्य शासन, प्रशासन, स्थानिक संस्था व वनविभाग यांना सादर करण्यात आला आहे. यासोबतच हवामान बदलामुळे धनेश पक्ष्यांच्या विणीवर होणाऱ्या परिणामांचे संशोधन संस्थेतर्फे सुरू आहे. त्याचबरोबर धनेश पक्ष्यांच्या जनुकीय विविधतेबाबतही संशोधन केले जात आहे. पक्षीतज्ज्ञ संशोधक रोहित नानिवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने धनेश खाद्य झाडांची रोपवाटिका विकसित केली आहे, अशी माहिती पक्षीमित्र व अभ्यासक प्रतिक मोरे यांनी दिली.
------

* रत्नागिरीत आढळलेले संकटग्रस्त श्रेणीतील पक्षी :

लेसर फ्लोरिकन (अती चिंताजनक)
सोशिएबल लॅपविंग (अती चिंताजनक)
ग्रेट नॉट (चिंताजनक)
इजिप्शियन व्हल्चर (चिंताजनक)
ग्रेट हॉर्नबिल (असुरक्षित)
मलबार पाईड हॉर्नबिल (असुरक्षित)
मलबार ग्रे हॉर्नबिल (असुरक्षित)
ग्रेटर स्पॉटेड ईगल (असुरक्षित)
इंडियन स्पॉटेड ईगल (असुरक्षित)
ब्लॅक कॅप्ड किंगफिशर (असुरक्षित)
एशियन वुलिनेक स्टॉर्क (निकट-असुरक्षित)
ब्लॅक हेडेड इबिस (निकट-असुरक्षित)
डार्टर (निकट-असुरक्षित)
ग्रेट थिक-नी (निकट-असुरक्षित)
युरेशियन करल्यु (निकट-असुरक्षित)
बार टेल्ड गोडविट (निकट-असुरक्षित)
ब्लॅक टेल्ड गोडविट (निकट-असुरक्षित)
करल्यु सँडपायपर (निकट-असुरक्षित)
पॅलिड हॅरियर (निकट-असुरक्षित)
ओरिएन्टल ड्वार्फ किंगफिशर (निकट-असुरक्षित )
रेडहेडेड फालकन (निकट-असुरक्षित )
युरेशियन रोलर (निकट-असुरक्षित )
.............

* यांचा होतोय पक्षी जीवनावर प्रतिकूल परिणाम

- वाढते नागरीकरण, दळणवळणाची साधनांचा पक्षी जीवनावर प्रतिकूल परिणाम
- वाढती जंगलतोड
- शेतीपद्धतीत होणारे बदल
- उत्पादनवाढीसाठी बागायतींमध्ये होणारी अतिरेकी कीटकनाशकांची फवारणी
- घरटी बांधण्यासाठी मोठमोठ्या वृक्षांची कमतरता
- स्वच्छतेचे बदललेल्यां निकषांचा परिणाम
- हवामानातील प्रतिकूल बदल
- वादळाची वाढती संख्या
- अनियमित पाऊस
- वणव्यांमध्ये नष्ट होणारी वनसंपदा
- रासायनिक खतांची वाढती मात्रा
----------

* पक्षी स्थलांतरित पक्ष्याना पोषक घटक

- खारफुटी
- मडफ्लॅट
- नदीमुख
- पाणथळ प्रदेश
- भात खाचरे
- किनारपट्टी परिसंस्था
----------

* स्थलांतरीत पक्षी यामुळे धोक्यात

- पाणथळ जमिनींचे शहरीकरण
- खारफुटीचा र्‍हास
- प्रदूषण
- विद्युततारा व पवनचक्र धोक्ये
- हवामान बदल
- शिकार
- मानवी हस्तक्षेप
-----------

* स्थलांतरित पक्ष्यांसाठी उपाययोजना

- अधिवास संरक्षण
- पाणथळ प्रदेशांचे दस्तऐवजीकरण व मान्यता
- लोकजागृती कार्यक्रम
- शैक्षणिक व संशोधन प्रकल्प
- विधी व धोरणात्मक संरक्षण
- आंतरराष्ट्रीय सहकार्य
-------
- rat11p8.jpg-
16914
प्रतीक मोरे

कोट १

“ गेल्या काही वर्षात कोकणात अवैध शिकारीचे प्रमाण वाढत आहे. रानकोंबडे, तीतर, लावे, बदके अगदी मोरसुद्धा या शिकारीचे बळी ठरत आहेत. मोर सर्वत्र आढळत असला तरी अभ्यासाअंती त्यांच्या संख्येवर होणारा परिणाम अभ्यासणे गरजेचे आहे. शिकारीसाठी लावले जाणारे वणवे घातक असून हजारो पक्ष्यांची आश्रयस्थाने आणि घरटी हे वणवे नष्ट करतात. त्याचवेळी पक्ष्यांचे खाद्य असणारे कीटक सरिसृप मोठ्या प्रमाणात नष्ट करतात. त्यामुळे वणवे रोखणे गरजेचे आहे. ”
- प्रतीक मोरे, पक्षीमित्र
--------
कोट २
rat11p10.jpg-
16902
धनंजय मराठे

कोकण हा स्थलांतरित पक्ष्यांच्यादृष्टीने जैवविविधतेचा महत्वपूर्ण प्रदेश असून आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत स्थलांतराचा संगम क्षेत्र म्हणून ओळखला जावा. अधिवासांचे संरक्षण, दस्तऐवजीकरण व संशोधन यांसाठी नियोजनबद्ध उपक्रम राबवणे अत्यावश्यक आहे.
- धनंजय मराठे, राजापूर, पक्षीमित्र
-------
कोट ३

rat11p12.jpg-
16904
विराज आठल्ये

दिवसेंदिवस कमी व नष्ट होणारी पक्ष्यांची संख्या ही खूप काळजीची बाब आहे. पर्यावरणातील परागीभवन, कीटक नियंत्रण, अन्नसाखळीचे नियोजन यासारख्या महत्वाच्या कार्यातला पक्ष्यांचा वाटा अनमोल आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काही निसर्गसेवी संस्थांच्या माध्यमातून नेचर वॉक आणि जनतेला पक्षी आणि एकूणच निसर्गाबद्दल अधिकाधिक माहिती पोचवण्याचा प्रयत्न आणि जनजागृती करणे ही काळाची गरज आहे.
- विराज आठल्ये, प्रकल्प व्यवस्थापक, सह्याद्री संकल्प सोसायटी
------
कोट ४
- rat11p11.jgp-
16903
नयनीश गुढेकर

निसर्गसाखळीमध्ये पक्ष्यांचा अधिवास आणि भूमिका महत्वाची ठरते; मात्र, निसर्गातील अवाजवी मानवी हस्तक्षेप, बदललेले पर्यावरण वा अन्य विविध कारणांमुळे पक्षीजीवन अडचणीत आल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे पक्ष्यांच्या विविधांगी प्रजातींचे संरक्षण आणि संवर्धन होण्यासाठी पक्षीजीवनाचा अभ्यास अन् संशोधन होणे गरजेचे आहे. त्याचवेळी समाजप्रबोधनासोबत पक्षीजीवन संरक्षण आणि संवर्धनासाठी विविध उपाययोजना करून त्यांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

- नयनीश गुढेकर, चिपळूण, पक्षी अभ्यासक
------
कोट ५
rat11p19.jpg-
16911
सचिन कारेकर

दैनंदिन धक्काधक्कीच्या जीवनाला कंटाळलेले नागरीक पर्यटनासाठी कोकणात शांत आणि निसर्गाने नटलेल्या ठिकाणी दाखल होतात. त्यामुळे पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात पक्षी निरिक्षण, फोटोग्राफी यासाठी पर्यटकांचा रत्नागिरीत राबता असतो. त्यामधून पर्यटन व्यवसायाला चालना मिळालेली आहे. त्यासाठी पक्षी संवर्धन काळाची गरज आहे.
- सचिन कारेकर, गुहागर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com