सांडपाण्यामुळे दुर्गंधी, आरोग्याचा प्रश्न
17010
सांडपाण्यामुळे दुर्गंधी, आरोग्याचा प्रश्न
सावंतवाडी-चिवारटेकडी परिसर; इमारत मालकास सूचना
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ ः शहरातील चिवारटेकडीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर एका इमारतीचे सांडपाणी थेट रस्त्यावर सोडले जात असल्याने गेल्या आठ दिवसांपासून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. यामुळे केवळ स्थानिक नागरिकच नव्हे, तर शहरात येणाऱ्या पर्यटकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार होणाऱ्या त्रासामुळे नागरिकांनी नगरसेवक बाबू कुडतरकर यांच्याकडे ही कैफियत मांडली होती. याची दखल घेत नगरसेवक कुडतरकर आणि शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते सागर गावडे यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन वस्तुस्थितीची पाहणी केली.
या पाहणी दरम्यान असे निदर्शनास आले, की संबंधित इमारतीचे सांडपाणी एका पाईपद्वारे आंबोलीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील गटारात सोडले आहे. मात्र, या मार्गावरील गटार बंदिस्त झाल्याने सांडपाण्यासोबतच उष्टे-खरकटे आणि गाळ तिथेच तुंबून राहिला आहे. हे साचलेले सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने परिसरात अस्वच्छता पसरली असून पर्यटकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या प्रकाराबद्दल नगरसेवक कुडतरकर यांनी तत्काळ आरोग्य निरीक्षक विनोद सावंत यांच्याशी संपर्क साधला. संबंधित इमारत मालकाने आपल्या सांडपाण्याची व्यवस्था स्वतःच्या जागेतच करावी, अशा सूचना प्रशासनामार्फत देण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच, यापुढे रस्त्यावरील गटारात सांडपाणी सोडल्याचे आढळल्यास प्रशासनातर्फे कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या दौऱ्यात नगरसेवक कुडतरकर यांनी श्री उपरलकर देवस्थान ते लाडाचीबाग आणि चिवारटेकडी भागातील इतर नागरी समस्यांचीही पाहणी केली. यावेळी रस्त्याच्या कडेला वाढलेली झाडी तोडणे, गटार खोदाई करणे आणि रस्त्याच्या साईडपट्ट्या मातीने भरण्याबाबत त्यांनी प्रशासनाला सूचना केल्या. याशिवाय, उपरलकर देवस्थानपासून पुढील काही अंतरापर्यंत अपूर्ण असलेले स्ट्रीट लाईटचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. देवस्थानजवळील वळणावर टाकला जाणारा कचरा ही एक मोठी समस्या असून त्यावरही उपाययोजना करण्याचे आश्वासन कुडतरकर यांनी दिले. या भागातील कोणत्याही समस्या असल्यास नागरिकांनी थेट संपर्क साधावा, त्या सोडवण्यासाठी आपले कायम प्रयत्न राहतील, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या पाहणी प्रसंगी उमेश सावंत आणि संतोष परब उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

