मुंबई–गोवा महामार्गासाठी जनतेचा एल्गार

मुंबई–गोवा महामार्गासाठी जनतेचा एल्गार

Published on

पान १
१६९६६

वाढावा
१६९७१
१६९७४

मुंबई-गोवा महामार्गासाठी एल्गार
सोनवी पुलाजवळ रास्ता रोको : ‘जन आक्रोश’; महामार्ग काहीकाळ ठप्प
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ११ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम हा कोकणवासीयांच्या संयमाची, जीविताची आणि जगण्याच्या हक्काची परीक्षा बनलेला आहे. १७ वर्षांपासून अपूर्ण असलेल्या महामार्गामुळे रोज अपघात, मृत्यू, आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास सहन करावा लागणाऱ्या जनतेचा संताप आज उफाळून आला. या अन्यायाविरोधात जन आक्रोश समितीतर्फे येथील सोनवी पुलाजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आता पुरे झाले, अजून किती बळी, असा प्रश्न विचारत नागरिक रस्त्यावर उतरले. रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याचे ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.
सोनवी पुलावर आज सकाळी नागरिक, प्रवासी एकवटलेले होते. आंदोलन सुरू झाल्यानंतर परिसरात प्रचंड तणाव होता. शासन आणि संबंधित यंत्रणांच्या उदासीनतेविरोधात संताप व्यक्त करत आंदोलकांनी प्रतीकात्मक तिरडी यात्राही काढली. हा महामार्ग म्हणजे कोकणाचा मृत्यूमार्ग बनत चालल्याचा गंभीर संदेश याद्वारे दिला. सलग एक तास महामार्ग पूर्णपणे ठप्प राहिल्यामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या किलोमीटरभर रांगा लागल्या. वाहतूक ठप्प झाल्यामुळे प्रवासी, रुग्णवाहिका, मालवाहतूक वाहनांचे हाल झाले. आंदोलकांनी यासाठी प्रशासनालाच जबाबदार धरले. वेळेवर काम झाले असते, तर आज रस्त्यावर उतरायची वेळ आली नसती, अशी तीव्र भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच उपविभागीय अधिकारी नीलेश माईंनकर आणि पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र नेहमीप्रमाणे आश्वासनांची पोकळी आणि ठोस कालमर्यादेचा अभाव पाहता आंदोलक अधिक आक्रमक झाले. त्यामुळे घटनास्थळी हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. निवडणुकीच्या वेळी कोकण आठवतो, पण नंतर विसर पडतो. आमचे जीव स्वस्त आहे काय, असा थेट प्रश्न आंदोलकांनी प्रशासनाला केला. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या दिरंगाईमुळे अपघातात गेलेले जीव, उद्ध्वस्त कुटुंबे आणि उद्ध्वस्त अर्थकारण यासाठी जबाबदारी कोण घेणार, अशी विचारणा केली गेली. तसेच महामार्गाचे काम त्वरित सुरू न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवू, असा निर्धार जनआक्रोश समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. कोकणातील जनतेचा हा आवाज आता दुर्लक्षित करू नका, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, महामार्ग सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांना बाजूला होण्यासाठी आवाहन केले होते. मात्र आंदोलकांनी महामार्गावरच ठाण मांडले. महामार्गावर ठिय्या घातलेल्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केली. काही आंदोलकांनी पोलिसांनी उचलून बाजूला केले. याप्रकरणी ६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेतले आहे.

चौकट
वाहनांच्या दुतर्फा
तासभर रांगा
रविवार असल्यामुळे महामार्गावर वाहनांची गर्दी होती. कोकणात फिरायला आलेल्या अनेकांचा त्यात समावेश आहे. सोनवी पुलावरच आंदोलन केल्यामुळे तासाहून अधिक काळ दोन्ही बाजूने वाहने थांबून होती. प्रशासनाबरोबर संवाद साधल्यानंतर एक तासाने मार्ग मोकळा झाला. तोपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा पाहायला मिळत होत्या.

कोट
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम रडतखडत सुरू आहे. त्यातच अनेकदा ठेकेदार बदलले, नवीन ठेकेदारही पहिल्या सारखेच निघाले. कामाला दर्जा नाही. सिमेंट रस्त्याला समपातळी नाही. सर्वाधिक हाल संगमेश्वरवासीयांचे होत आहेत. अनेक वर्षे येथे वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग, लोकप्रतिनिधी आणि ठेकेदार कोणालाही या गंभीर समस्येकडे लक्ष द्यायला वेळ नसल्यामुळेच आजचे जनआक्रोश समितीचे आंदोलन संगमेश्वर येथील सोनवी चौकात घेण्यात आले.
- युयूत्सु आर्ते, सदस्य, जनआक्रोश समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com