

‘ती’चा भवताल ........लोगो
(७ जानेवारी टुडे ३)
हळदीकुंकू पर्यावरणपूरक
करण्याचा करा निश्चय
जिच्या हाती बदलाची दोरी ती जगाला सांभाळी, असे म्हणण्याची वेळ आता आली आहे. आपण सावित्रीच्या लेकी आणि राजमाता जिजाऊ, माता रमाबाईंचा इतिहास सांगणाऱ्या भारतीय नारी आहोत. आपल्याच या समर्थशील अशा परंपरेला आपण प्रमाण मानून सध्याच्या काळाची गरज ओळखून आपली संस्कृती जपून सर्व सण शंभर टक्के पर्यावरणपूरक करण्याचा नवा संकल्प या नवीन संक्रमण काळात सोडून तो पूर्ण करणे, हेच या नव्या संक्रमण कालावधीतील मोठे यश असणार आहे. त्याचा प्रारंभ या संक्रांतीपासून करूया.
- rat१२p१२.jpg-
P26O17115
- डॉ. प्रशांत परांजपे, दापोली
----
गेले पंधरा दिवस बाजारामध्ये संक्रांत सणानिमित्त वाण लुटण्याकरिता विविध वस्तूंची गर्दी झाली आहे. बाजारपेठेच्या नियमानुसार अनेक योजना आणि अतिशय भुरळ घालणाऱ्या मनमोहक आणि स्वस्त दरातील अनेक प्लास्टिकच्या वस्तू उत्पादकांनी आणि विक्रेत्यांनी उपलब्ध केल्या आहेत. किंबहुना प्रत्येक सणाच्या आधी बाजारपेठ सांगत असते की, आता पंधरा दिवसानंतर अमुक एक सण येतो आहे. धावत्या जगात आपल्या मनावरचा ताबा आपण ठेवणं काळाची गरज आहे. कारण, स्वस्त वस्तू खरेदीच्या नादामध्ये आपण जे खरेदी करतो आणि त्यानंतर जे दान करतो आहोत जे वाण म्हणून संक्रांत सणाच्या निमित्ताने देतो आहोत, ते किती शाश्वत आहे आणि किती उपयुक्त आहे, याचा विचारही होणं आवश्यक आहे.
१४ जानेवारीपासून नवा संक्रमण काळ सुरू होत आहे. या संक्रमण काळामध्ये नवीन सकारात्मक आणि शाश्वत पर्यावरण विकासाच्या दृष्टिकोनातून आपण विचारांचे संक्रमण करून ते कृतीमध्ये उतरवणे काळाची गरज निर्माण झाली आहे. भारतीय परंपरा ही संस्कृती आणि सांस्कृतिक परंपरा जपणारी आहे; मात्र प्रत्येक धार्मिक कार्यक्रमाला बाजारीकरणाचे स्वरूप दुर्दैवाने आलेलं दिसून येत आहे. संक्रमण काळ अर्थात संक्रांत सण हा उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. या काळात प्रामुख्याने आमच्या माताभगिनींकडून या नव्या संक्रमण काळात आम्ही सकारात्मक बदलाच्या अपेक्षा बाळगून आहोत. येणाऱ्या संक्रांत सणानिमित्त पर्यावरणपूरक संक्रांत आणि हळदीकुंकू समारंभ साजरे करून आपण घराघरांमध्ये निसर्ग संवर्धन, स्वच्छता आणि वृक्षसंवर्धन, हरित आच्छादन वाढवण्याचा कृतित्मक संदेश देणे काळाची गरज आहे. पर्यावरणपूरक संक्रांत आणि हळदीकुंकवाची संकल्पना मांडत आहोत.
पर्यावरणपूरक संक्रांत हळदीकुंकू करताना वाण देताना कोणतीही प्लास्टिकची वस्तू वाटणार नाही त्याऐवजी धान्य किंवा कोणतीही पर्यावरणपूरक वस्तू दान करेन. दूध, सरबत, चहा, कॉफी देण्यासाठी कोणत्याही प्रकारचे यूज अँड थ्रो कप वापरणार नाही त्याऐवजी काच आणि चिनीमातीच्याच कपांचा वापर करेन. पेपर डिशऐवजी स्टील डिश किंवा कोणत्याही धातूच्या प्लेटचाच वापर करेन. हलवा किंवा तिळगूळ आणि तिळगूळ लाडू वाटण्यासाठी प्लास्टिकच्या छोट्या पिशव्यांचा वापर करणार नाही. त्याऐवजी कागदाचा वापर करेन. हळदीकुंकवाला जाताना एक छोटासा स्टीलचा डबा सोबत पर्समध्ये घेऊन तिळगूळ दिल्यानंतर तो त्यात ठेवेन, असा पणच करा.
हळदीकुंकू समारंभाचे निमंत्रण देतानाच प्रत्येक आयोजकांनी हळदीकुंकू समारंभ किंवा संक्रांत समारंभाला येताना एक छोटा स्टीलचा डबा पर्समध्ये घेऊन यावा, अशी तळटीप देण्यास विसरू नये. त्यामुळे कोणाचीच अडचण होणार नाही. आयोजकांनीदेखील कागदाच्या कटिंगची व्यवस्था समारंभस्थळी करून ठेवावी जेणेकरून कोणी डबा आणायला विसरल्यास तिळगूळ घेण्यासाठी अडचण पडू नये. शक्य असेल त्यांनी तुळशीचे किंवा ओवा, वेखंड आदी कुंडीवर्गीय आयुर्वेदिक रोपांचे दान या निमित्ताने करावे. कापडी पिशव्यांचे वाटपही वाण म्हणून आपण करू शकतो.
संक्रांतकाळात अनेक वस्तू मिळतात. त्या कुठे ठेवायच्या आणि कशा न्यायच्या, असा प्रश्न पडला की हलकेच प्लास्टिक कॅरिबॅग कोठूनही प्राप्त होते. ते टाळूया आणि घरातून बाहेर पडताना रोज पर्समध्ये एक कापडी पिशवी घेऊन घरातून बाहेर पडण्याचा निश्चय महिलांनी करूया.
दिवसेंदिवस निसर्गाची हानी होण्याचं प्रमाण अनेक मार्गामुळे वाढत आहे. हवा, वायू, जमीन, पाणी सर्वच ठिकाणी प्रदूषणाने विळखा घातला आहे. आजपासूनच आपण आपल्या मनाला आणि आपल्या हाताला आवर घातला नाही तर येणारा काळ हा अधिक कठीण काळ असणार आहे. हिमनद्या वितळणे, बर्फ पुन्हा न साठणे, अतिथंडी, अतिउन्हाळा, अतिपावसाळा या सर्वच गोष्टी वातावरण बदलाचा परिणाम दर्शवत आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी संक्रमण कालावधीमध्ये सकारात्मक पर्यावरणपूरक विचारांचे संक्रमण कृतित्मक बदलाने सिद्ध करूयात आणि येणाऱ्या निसर्गकोपाला थांबवण्याकरिता त्या प्रकोपाची तीव्रता कमी करण्याकरिता वसुंधरेला नतमस्तक होऊन प्रयत्नशील राहूया.
(लेखक पर्यावरणाचा शाश्वत विकास या विषयातील डॉक्टरेट आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.