छत्रपती शिवाजी महाराज धर्माभिमानी
17179
छत्रपती शिवाजी महाराज धर्माभिमानी
डॉ. शिवरत्न शेटे ः सावंतवाडी येथे व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ ः छत्रपती शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष होते, असे काही मंडळी सांगत आहेत. मात्र, वस्तुस्थिती तशी नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे धर्माभिमानी होते. स्वधर्माच्या रक्षणासाठी त्यांनी अनेक निर्णय घेतले, हे पुराव्यांवरून सिद्ध होते, असे प्रतिपादन हिंदवी परिवार महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. शिवरत्न शेटे यांनी रविवारी (ता. १०) येथे केले. सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान यांच्यावतीने येथील राजवाड्यात ‘धर्मरक्षक छत्रपती शिवाजी महाराज’ विषयावर शेटे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. यंदाचे व्याख्यानाचे नववे वर्षे होते.
डॉ. शेटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धर्माभिमानाबाबत अनेक पदर ओघवत्या शैलीत उलगडून दाखवत उपस्थित रसिक वर्गाला खिळवून ठेवले. ते म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज हे धर्मरक्षक होते. मात्र, पुरोगामी मंडळी छत्रपती शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष असल्याचे सांगत आहेत. तटस्थपणे पाहिल्यास छत्रपती शिवाजी महाराज हे धर्माभिमानी होते. स्वधर्माबाबत त्यांना अभिमान होता. स्वधर्माच्या रक्षणासाठी त्यांनी अनेक निर्णय घेतले. गोव्यात पोर्तुगाल मिशनऱ्यांकडून हिंदू धर्मीयांवर अत्याचार होत होते, त्यावेळी शिवाजी महाराजांनी आक्रमण करून तेथील ख्रिश्चन मिशनऱ्यांना धडा शिकवला होता. त्यामुळे स्वधर्माबाबत शिवाजी महाराजांना किती आस्था होती, हे स्पष्ट होते. शिवाजी महाराजांनी गोव्यातील हरिहरेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेत रक्षणासाठी काम केले. मुस्लिम राजवटीने मंदिरे पाडून मशिदी उभ्या केल्या होत्या, तेथे पुन्हा मंदिरे उभारण्याचे काम त्यांनी केले. चेन्नईमध्ये कालिकंबल देवीचे मंदिर आहे. तेथील गोपुरात छत्रपती शिवाजी महाराजांना देवदेवतांबरोबर स्थान दिले आहे. हिंदुस्थानाच्या इतिहासातील असे स्थान मिळणारा एकमेव राजा आहे. तेथील कार्तिकी पौर्णिमेला होणारा दीपोत्सव मुस्लिम राजवटीने बंद केला होता, तो शिवाजी महाराजांनी पुन्हा सुरू केला. त्यामुळे तामिळ लोकांनी शिवाजी महाराजांना गोपुरात स्थान दिले. मराठी माणसाने शिवाजी महाराजांना स्थान देणे ठीक आहे. मात्र, तामिळ लोकांनी असे स्थान देणे अद्वितीय असे आहे.’
----
शिवराय अध्यात्मिक होते!
डॉ. शेटे म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले होते. ते अध्यात्मिक होते. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी क्रांतिकारी निर्णय घेतले. मोगलांनी नेताजी पालकर आणि त्यांच्या मुलावर अत्याचार करून त्यांचे धर्म परिवर्तन केले होते. त्यानंतर दिलेरखानाबरोबर महाराष्ट्रात मोहिमेवर आले असताना नेताजी पालकर यांनी रायगडावर शिवाजी महाराजांची भेट घेतली आणि हिंदू धर्मात येण्याची इच्छा व्यक्त केली. सनातनी कर्मठ विचारांच्या मंडळींनी त्यांना पुन्हा हिंदू धर्मात स्थान देण्यास विरोध दर्शवला. मात्र, शिवाजी महाराजांनी पालकरांसह मुलाला पुन्हा हिंदू धर्मात स्वीकारले. त्यामुळे शिवाजी महाराज धर्मरक्षकच होते, हे स्पष्ट होते.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

