जिल्हाधिकारी कार्यालय परिसर स्वच्छतेचे आदेश
17227
जिल्हाधिकारी कार्यालय परिसर स्वच्छतेचे आदेश
सिंधुदुर्गनगरी, ता. १२ ः जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाढलेली झाडे तसेच परिसरातील कचऱ्याचे ढीग तत्काळ स्वच्छ करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय नूतनीकरण कामाची तसेच परिसराची पाहणी केली.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कचऱ्याचे ढिग तसेच परिसरात झुडपे वाढली असून इमारती झुडपात दिसेनाशा झाल्याचे दिसून आले. यावेळी जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी परिसरात वाढलेली झाडी व कचऱ्याचे ढीग तत्काळ हटवून या परिसराची स्वच्छता करण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकारी कार्यालय संकुल इमारत नूतनीकरण कामाची पाहणी करून आवश्यक सूचना त्यांनी दिल्या.

