सौंदर्यापेक्षा गुण आणि संस्कारांनीच होतो व्यक्तिमत्व विकास
- rat१३p१८.jpg-
२६O१७४०८
दोनदिवसीय निवासी व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात सहभागी विद्यार्थी.
----
खरा व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे गुणांचा संस्कार
डॉ. जयश्री जोग ः गोळवलीत सेवा भारतीच्यावतीने विकास शिबिर
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १३ ः सुंदर चेहरा किंवा मुखवटा म्हणजे व्यक्तिमत्त्व विकास नव्हे तर अंगी असलेले कलागुण, बोलण्यातील गोडवा, संस्कार आणि इतरांना मदत करण्याची प्रवृत्ती म्हणजे आदर्श व्यक्तिमत्त्व होय. आपल्यातील गुणांचा सकारात्मक बदल जेव्हा स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी उपयोगी पडतो तेव्हाच खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो, असे प्रतिपादन समाजसेविका डॉ. जयश्री जोग यांनी केले.
सेवा भारती कोकण प्रांत ट्रस्ट प्रकल्प समिती संगमेश्वरअंतर्गत ‘फिरती विज्ञान प्रयोगशाळा’ यांच्या विद्यमाने आयोजित दोनदिवसीय निवासी व्यक्तिमत्त्व विकास शिबिराच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. गोळवली येथील गोळवलकर गुरुजी प्रकल्प सभागृहात हे शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिराचे उद्घाटन संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या हस्ते झाले. या वेळी कोकण प्रांतप्रमुख प्रमोद वैद्य, जिल्हा सचिव मंदार जोशी, प्रकल्प सहप्रमुख अजिंक्य पावसकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात विनायक पाध्ये यांनी फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेची कार्यपद्धती आणि त्याचा जिल्हा परिषदेच्या २१ शाळांमधील विद्यार्थ्यांना होणारा उपयोग विशद केला. नासा आणि इस्रोच्या चाळणी परीक्षांसाठी ही प्रयोगशाळा कशी पूरक ठरते, यावर त्यांनी प्रकाश टाकला. या दोन दिवसांत विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संपदा हेमण, प्रमोद दळी, दत्तात्रय खातू, अमोल सहस्रबुद्धे आणि श्रीकृष्ण खातू यांनी सायबर सिक्युरिटी, शिवरायांचे बालपण, वैज्ञानिक दृष्टिकोन, पर्यावरणीय सजगता आणि सामाजिक समरसता या विषयांवर मार्गदर्शन केले.
सायंकाळी राष्ट्रीय कीर्तनकार श्रीनिवास पेंडसे यांच्या व्याख्यानाने विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले. तसेच मैदानी खेळ, योगासने, सूर्यनमस्कार आणि कथाकथन स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये क्रिशा इंदानी हिने सादर केलेल्या विण्या या कथेने सर्वांची वाहवा मिळवली. विद्यार्थ्यांनी केवळ चर्चासत्रात भाग न घेता प्रकल्पावरील गोशाळा, गांडूळ खत प्रकल्प आणि गोमूत्र व शेणापासून बनवल्या जाणाऱ्या साबण, शाम्पू व इतर वस्तूंची प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली. या निवासी शिबिरात तालुक्यातील ८० विद्यार्थी सहभागी झाले होते. समारोपप्रसंगी विद्यार्थिनी दूर्वा येडगे, स्वरा घाटपांडे आणि शिक्षिका अपर्णा दायमा यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

