मेढाच्या माध्यमातून सौर ऊर्जा प्रस्ताव द्यावेत
सौरऊर्जा प्रस्ताव ‘मेढा’तून द्यावेत
जिल्हाधिकारी ः जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ ः शासनाच्या सौरऊर्जा प्रकल्पांर्गत इमारती हरित करण्याच्या उद्देशाने सर्व विभागाने आपले सौर ऊर्जा प्रस्ताव मेढाच्या माध्यमातून द्यावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत आढावा बैठक आज झाली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जिंदल म्हणाले, मागील दोन वर्षातील खर्च अतिरिक्त मागणी, यंदाचा खर्च याबाबत प्रत्येक विभाग प्रमुखाने सादरीकरण करावे. ज्या विभागांकडे शासकीय जमिनी आहेत, त्या जमिनींवर अतिक्रमण रोखण्यासाठी संरक्षण भिंत बांधण्यासाठी प्रस्ताव द्यावेत. महासंपत्ती पोर्टलवर पायाभूत नोंदणीबाबतची कार्यवाही युद्धपातळीवर करावी. आयपास लॉगिन आणि त्याच प्रणालीवरून सर्व प्रस्ताव यायला हवेत. झालेला खर्च, पूर्तता अहवाल डॅशबोर्डवर यायला हवा. त्याचबरोबर मे मध्ये झालेल्या बैठकीतील सूचनेनुसार केलेली कार्यवाहीबाबत पूर्तता अहवाल संबंधित विभागाने द्यावा.

