परजिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी चिपळूणात अनधिकृत व्यवसाय करू नये
-rat१३p११.Jpg-
P26O17398
चिपळूण ः बैठकीत व्यापाऱ्यांचे प्रश्न ऐकून घेताना नगराध्यक्ष उमेश सकपाळ.
-----
‘त्या’ व्यापाऱ्यांनी अनधिकृत व्यवसाय करू नये
नगराध्यक्ष उमेश सकपाळ ः प्रश्न सोडवण्यासाठी व्यापारी संघटनांसह प्रशासनाशी चर्चा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १३ : व्यापारी जगला तरच शहर जगेल, व्यापार वाढला तर शहर वाढेल. व्यापारी मोठा झाला पाहिजे. मी व्यापाऱ्यांसोबत आहे आणि त्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध आहे. स्थानिक व्यापाऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. आजपासून स्थानिक व्यापाऱ्यांना वगळून बाहेरील व्यापाऱ्यांनी चिपळूण शहरात अनधिकृतपणे व्यवसाय करू नये, अशी सूचना नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी दिले.
चिपळूण शहरातील पाग येथील श्रीकृष्ण सभागृहात चिपळूण शहरात झालेल्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी व्यापाऱ्यांचे प्रश्न, समस्या व सूचना सविस्तरपणे ऐकून घेतल्या. त्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी काय करता येईल, यावर सखोल विचारविनिमय झाला. बैठकीला शंभरहून अधिक व्यापारी उपस्थित होते. बैठकीला नगरसेवक कपिल शिर्के, उदय जुवळे, गणेश आग्रे, राणी महाडिक, हर्षाली पवार, शिवसेनेचे गटनेते अंकुश आवले, निहार कोवळे, मुख्याधिकारी विशाल भोसले, उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे, मंगेश पेढांबकर यांच्यासह नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान व्यापारी संघटना व चिपळूण व्यापारी महासंघाच्यावतीने नगराध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.
अतुल पेठकर यांनी पानगल्ली परिसरात गटार तुंबून रस्त्यावर वाहने उभी राहत असल्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीचा मुद्दा मांडला. शमशुद्दीन सनगे यांनी बाजारपेठेत बेकायदेशीर गाड्या लागणे व बाहेरील व्यापाऱ्यांकडून कांदा, बटाटा, लसूण, फळे विक्री केली जात असल्याकडे लक्ष वेधले. संदीप लवेकर यांनी बाहेरील व्यापाऱ्यांना एका ठिकाणी जागा द्यावी, फळविक्रेत्यांसाठी स्वतंत्र बाजारपेठ, ग्राहकांसाठी स्वच्छतागृहे व वाहनतळ उपलब्ध करावेत, अशी मागणी केली. व्यापारी महासंघाचे सचिव उदय ओतारी यांनी संघाच्या वतीने निवेदन वाचन केले. ज्येष्ठ व्यापारी शिरीष काटकर यांनी बाहेरील व्यापाऱ्यांबाबत कडक भूमिका घेण्याची गरज व्यक्त करत महावितरण व पोलिस प्रशासनाची संयुक्त बैठक घेण्याची मागणी केली. रामशेठ रेडीज यांनी सांडपाणी थेट नदीत जाण्याचा मुद्दा उपस्थित करत वृक्षलागवडीचा आढावा घेण्याची मागणी केली.
-------
चौकट
व्यापाऱ्यांसोबत समस्या जाणून घेणार
नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी पन्नास मिनिटे व्यापाऱ्यांशी थेट संवाद साधला. चिंचनाका ते पॉवरहाऊस तसेच बहादूरशेख नाका ते भेंडीनाका या रस्त्यांचे रुंदीकरण झाल्यास व्यापाराला चालना मिळेल, असे सकपाळ यांनी नमूद केले. बाजारपेठेतील समस्या प्रत्यक्ष पाहण्यासाठी व्यापाऱ्यांच्या दहा-दहाजणांच्या पथकासोबत ठराविक वेळेत फेरी मारण्याचा प्रस्तावही त्यांनी दिला. वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचे काम, खाऊगल्लीचे व्ही गॅलरीत स्थलांतर, रेडलाईन–ब्ल्यूलाईनसंदर्भातील प्रश्न, भूमिगत वीजवाहिन्या, पोलिस व महावितरण यांची संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
------
चौकट
गटारे स्वच्छ करा, सिग्नल उभारा
चिपळूण शहरातील सर्व गटारे आठवड्यातून एकदा स्वच्छ करावीत, सुलभ शौचालयांची आवश्यकता, चिकन-मटणविक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागा असावी, अशी मागणी करण्यात आली. बापू काणे यांनी शहरातील जुने टेलिफोन खांब हटवणे, वाहतूक सिग्नल यंत्रणा उभारणे व खाटीकआळी ते सनगे घर रस्त्याबाबत उपाययोजना करण्याची सूचना केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

