सकारात्मक नव्हे; स्वीकारात्मक व्हा

सकारात्मक नव्हे; स्वीकारात्मक व्हा

Published on

swt141.jpg
17685
वैभववाडीः ताणतणाव आणि उपाय या व्याख्यानाचे उद्घाटन तहसिलदार सुर्यकांत पाटील यांनी दीपप्रज्वलन करून केले. बाजूला डॉ. प्रतीक लाड, डॉ. राहुल पेंढारी, जयेंद्र रावराणे व इतर मान्यवर.

सकारात्मक नव्हे; स्वीकारात्मक व्हा
डॉ. प्रतीक लाडः वैभववाडीत ‘ताणतणाव आणि उपाय’ व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १४ः प्रत्येकाच्या आयुष्यात कमी-अधिक प्रमाणात ताणतणाव, नैराश्य येतच असतात. भविष्यात देखील ते येत राहणार आहेत. त्याचा स्वीकार करून वाटचाल करणे आवश्यक आहे. त्यामुळे सकारात्मक बनण्यापेक्षा स्वीकारात्मक व्हा, असे प्रतिपादन केईएम मुंबईचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रतीक लाड यांनी येथे केले.
येथील दत्तकृपा प्रतिष्ठान आणि जीवन प्रबोधनी ट्रस्टच्या सौजन्याने ताणतणाव, नैराश्य आणि उपाय या विषयावर अर्जुन रावराणे विद्यालयाच्या सभागृहात व्याख्यानाचे आयोजन केले होते. व्यासपीठावर तहसीलदार सूर्यकांत पाटील, केईएमचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. राहुल पेंढारी, शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष तेजस आंबेकर, मुख्याध्यापक बी. एस. नादकर, दत्तात्रय माईणकर, राकेश कुडतरकर आदी उपस्थित होते.
डॉ. लाड म्हणाले, ‘‘दैनंदिन जीवन जगत असताना प्रत्येकाला ताण येतच असतो. तो कुणालाच चुकलेला नाही. त्यामुळे तो येणारच, या दृष्टीने त्याचा सामना करायला शिकले पाहिजे. शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्य खूप महत्त्वाचे आहे. मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. ताण समजून घेतला पाहिजे, तो ओळखता आला पाहिजे. आपण त्याकडे कानाडोळा केला तर समस्या निर्माण होऊन आत्महत्येसारखे मार्ग निवडले जातात. तत्पूर्वीच उपाययोजना केल्या पाहिजेत. ताणतणाव आला असे जाणवताच योग, व्यायाम करा. स्वतःचे छंद जपा. मानसिक ताणतणाव असलेली व्यक्तीत स्वतःच्या जीवनशैलीत बदल करते. काही लोक रागावतात तर काही अधिक आनंदी होतात. काही लोक आपल्यावर असलेल्या कर्जाची परतफेड करतात, तर काहीजण वसुली करतात. अशावेळी त्या लोकांकडे काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे असते. तातडीने त्यांच्यावर मानसोपचार तज्ज्ञाकडे जाऊन उपचार करून घेणे अत्यावश्यक असते.’’
तहसीलदार पाटील म्हणाले, ‘‘दहावी-बारावीची परीक्षा म्हणजे अंतिम नाही. शैक्षणिक पात्रता ठरविणारी ती परीक्षा आहे. त्यानंतर आयुष्यात अनेकदा परीक्षा होत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एखाद्या अपयशाने खचून जायचे कारण नाही. यश-अपयश येतच असते, परंतु नव्या उमेदीने, योग्य दिशेने वाटचाल करण्याची जिद्द बाळगली पाहिजे. आयुष्यात ध्येय निश्चित करून त्या ध्येयाचा पाठलाग करा. हे सर्व करीत असताना खेळा, स्वतःचे छंद जोपासा.’’
डॉ. राहुल पेंढारी यांनी तणावाच्या वेळी कोणते व्यायाम करावे, याची माहिती दिली. त्याचे प्रात्यक्षिक करून घेतले. या कार्यक्रमाला संतोष माईणकर, दीपक माईणकर, अमेय पोरे, आकाश कानडे, सागर माईणकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रफुल्ल जाधव यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com