हावरटपणापायी श्री सोवळे विसरून जाई

हावरटपणापायी श्री सोवळे विसरून जाई

Published on

परिवर्तन---------लोगो
(८ जानेवारी टुडे ३)

हावरटपणापायी ‘श्री’
सोवळे विसरून जाई

दुपारी काही पक्वान्न किंवा त्याला आवडणारी भाजी श्रीची आई चुलीजवळ गरम होण्यासाठी ठेवून कपडे धुवायला जाई. हा मौका साधून तो त्यातील पदार्थ हळूच तोंडात टाकी. ही भाजी सोवळ्यातील असे हे माहीत असूनही भूक आणि हावरटपणापायी हे सोवळे तो विसरून जाई. हा देवाचेप्रती अपराधच होता. त्यामुळे तो आपल्या कृतीला मनातून घाबरलेला असे. देव आपले आता काहीतरी वाईट करणार, असे त्याला वाटे आणि तो घाबराघुबरा होई; पण हे काही कोणाजवळ बोलण्यासारखे नव्हते. बाबा यासाठी कोणती शिक्षा देतील, हे सांगता येणे कठीण होते. त्यामुळे गप्प बसणे अधिक श्रेयस्कर असे त्याला वाटे. मग तिन्हीसांजेला देवाला नमस्कार करताना तो या आपल्या गुन्ह्यासाठी देवाजवळ माफी मागत असे. या सोवळ्याच्या नियमांच्या उल्लंघनामुळे आपले काही वाईट होणार, असेच श्रीला वाटे. त्याचे बालमन आपण असे वागू नये असे अनेकवेळा ठरवी; पण भूक आणि हावरटपणापायी अशा चुका परत परत होत असत.

- rat१४p५.jpg-
26O17677
- डॉं. शरद प्रभूदेसाई, रत्नागिरी
----
‘श्री’ आठ वर्षाचा झाल्यावर घरच्या नवरात्रोत्सवात बदल करायचे बाबांनी ठरवले. एकतर रात्रीची पूजा करणे दिवसेंदिवस गैरसोयीचे होते. भटजीही मिळणे कठीण जात होते म्हणूनच बाबांनी देवीची महापूजा दिवसा करायचे ठरवले. नवव्या दिवशीचा होम करणेही बंद केले. या होमाऐवजी सप्तशतीचे दोन पाठ जास्त वाचणे गरजेचे होते. हे सर्व देवाचे काम एका भटजीकडून करून घेणे सहजशक्य होते. आता हे सगळे ग्रामोपाध्या करत असे. बाहेरगावाहून भटजी बोलावण्याची गरज नव्हती. ग्रामोपाध्ये प्रथम सकाळी सप्तशतीचे पाठ वाचत. त्यानंतर दोन-तीन तास देवीची महापूजा चाले. दुपारी दोन वाजेपर्यंत महानैवेद्य आणि जेवणे होत असत. पूर्वीप्रमाणे पक्वान्ने असत. सर्वकाही दिवसा होत असल्याने रात्रीचा रामरगाडा बंद झाला. हे सर्व बदल करण्याआधी बाबांनी एका दशग्रंथी ब्राह्मणाचे मत घेतले होते. त्याने वरीलप्रमाणे उत्सव साजरा करण्याचा बाबांना सल्ला दिला. सप्तशतीची दररोज दोन पाठ जास्त वाचले की, होम न केल्याचे पातक लागणार नव्हते. पूर्वीच्या उत्सवाच्या धबडग्यातून पातक न लागता सुटका मिळाल्याने आई-बाबांना आनंद झाला. पातकाचे बालट पदरी येऊ नये म्हणून दरवर्षी शतचंडी स्वाहाकार करण्याचेही आई-बाबांनी ठरवले. त्याची कार्यवाही दरवर्षी होऊ लागाली. त्यामुळे देवीची गैरमर्जी होणार नाही, याची त्यांना खात्री झाली.
असे नवरात्रोत्सव साजरे होत होते आणि श्रीही वयाने वाढत होता. शाळेत जात होता. एका इयत्तेतून दुसऱ्या इयत्तेत जात होता. शाळेत तो हुषार समजला जात असे. त्याला एक भाऊ व बहीण होती. ती त्याच्यापेक्षा वयाने मोठी होती. शाळेत पूर्वी गणवेश नसे; पण आईने ठरवून दिलेले कपडेच शाळेत जाताना घालावे लागत. घरी आल्यावर ते कपडे बाजूला काढून ठेवावे लागत किंवा त्या कपड्यावरून आंघोळ करायची. कोणत्याही परिस्थितीत ते कपडे घरात घालायचे नाहीत, असा शिरस्ता होता. दप्तरालाही घरातल्या कपड्यांनी शिवलेले चालत नसे. अभ्यास करण्यासाठी लागणारी पुस्तके दप्तरातून शाळेतून आल्या आल्या लगेच काढून घ्यायची.
शाळेचा विटाळ टाळण्यासाठी या सर्व गोष्टी कटाक्षाने पाळव्या लागत. हे नियम पाळणे म्हणजे सोवळे पाळण्याचा एक भाग होता. श्रीचे कूळ उच्च म्हणजे ब्राह्मण! इतरांनी शिवलेल्या कपड्यांनी घरात वावरणे हे अशौच मानले जाई. हा विटाळ टाळण्यासाठी हा सगळा खटाटोप होता. या सर्व नियमांचे पालन श्री मुंबईला शिकायला जाईपर्यंत करत होता. हे नियम पाळणे श्रीला त्या वेळी पटत असावे.
घरात दोन शिक्षक भाडेकरू होती. ते ब्राह्मणेतर होते. त्यांनाही स्वयंपाकघरात आणि देवघरात जायची परवानगी नव्हती. ते जर कधी श्रीकडे जेवायला असले तर त्यांचे पान माजघरात घेतले जाई तसेच जेवून झाल्यावर त्यांचे ताट त्यांनी घासून ठेवायचे असे. हा नियम कोणीही ब्राह्मणेतर जेवावयास आला की, त्यांना लागू होता. वाडीतील कुणबी लोकांना हाच नियम होता. ब्राह्मणेतरांना चहा वगैरे देण्याची भांडी कप वेगळे ठेवत. घरातील देव आणि माणसे बाटू नयेत म्हणून हा सर्व खटाटोप होता. या सर्व गोष्टींबाबत श्रीचा समज हळूहळू दृढ होत होता. हे सोवळ्याचे नियम पाळले नाही तर आपल्याला पाप लागेल, आपल्यावर आरिष्ट्य कोसळेल अशी भीती श्रीला कायम वाटत असे; पण कधी कधी हावरटपणा पोटी या नियमांचा श्रीकडून नकळत भंग व्हायचा.
नवरात्राप्रमाणे इतर सणही साग्रसंगीत साजरे होत. प्रत्येक सणाच्यावेळी पूजा सांगायला भटजी येत असत. पूजा करायला बाबा बसत. अगदी कोजागिरी पौर्णिमेलाही रात्री बारा वाजता भटजी येत. बाबा आंघोळ करून पूजेला बसत. थोडक्यात काय तर एवढ्या रात्रीही भटजी पूजा सांगायला येई. पूजा सांगून चंद्राला दुधाचा नैवेद्य दाखवला जाई. त्यानंतर सर्वजण ते दूध पित असत. श्री झोपला असला तरी त्याला उठवून दुधाचा प्रसाद पिण्यास फर्मावले जाई. तो नाराजीनेच झोपेतून उठे आणि दूध पित असे. बाबांच्या धाकापुढे त्याचे काहीही चालत नसे.


(लेखक बालरोगतज्ज्ञ आणि चिंतनशील अभ्यासक आहेत.)
-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com