बांदा कॉलेजमध्ये मंगळवारी ''मालवणी बोलीभाषेचा जागर''
बांदा कॉलेजमध्ये मंगळवारी
‘मालवणी बोलीभाषेचा जागर’
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १५ ः मराठी भाषेतील विविध बोलींचे जतन व संवर्धन व्हावे, या उद्देशाने मराठी भाषा संवर्धन पंधरावड्यानिमित्त भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य व गोगटे-वाळके महाविद्यालय, बांदा यांच्यावतीने ‘बोलींचा जागर’ या उपक्रमांतर्गत मालवणी बोलीभाषेचा जागर मंगळवारी (ता. २१) आयोजित करण्यात आला आहे.
मराठी भाषेत मालवणीचे योगदान, बदलत्या सोशल मीडियाच्या युगात या बोलींचे अस्तित्व, त्यांचे जतन व संवर्धनासाठी आवश्यक उपाय, मालवणी बोलीतील संस्कृती व भाषिक वैशिष्ट्ये यांचे संवर्धन या विषयांवर या कार्यक्रमात सखोल मंथन होणार आहे. बोली भाषातज्ज्ञ प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत, प्रा. डॉ. गोविंद काजरेकर हे सविस्तर मार्गदर्शन व मांडणी करणार आहेत. मालवणी भाषेची नजाकत व येथील जीवनपद्धती उलगडून दाखवणारा पारंपरिक ''गाऱ्हाणा'', मालवणी परंपरा व वारसा जपणारा ''वळेसार'' हा कार्यक्रमही सादर होणार आहे. सण-उत्सवात गायली जाणारी मालवणी लोकगीते आडाळी (ता. दोडामार्ग) येथील फुगड्यांचा संघ नृत्याच्या माध्यमातून सादर करणार आहे.
मालवणी बोलीतील नाट्यप्रसंग सादर करण्यात येणार असून यामध्ये तुकाराम गावडे, कृष्णा घाटकर, श्रीराम साहिल, सुहास गावडे आदी कलावंत सहभाग घेणार आहेत. या कार्यक्रमाचे संयोजन नितीन आसयेकर प्रस्तुत श्री देवी भूमिका दशावतारी नाट्यमंडळ, मळगाव (ता. सावंतवाडी) करणार आहे. मालवणी मुलुखातील विविध लोकगीते व कविता तसेच लग्नसमारंभात गायली जाणारी, कोकणी संस्कृतीचे प्रतिबिंब उमटवणारी पारंपरिक ''लग्नगीते'' सादर केली जाणार आहेत. शासनाच्या वतीने संबंधित विभागांचे पदाधिकारीही विचार मांडणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत गोगटे-वाळके महाविद्यालयाच्या रंगमंचावर होणार आहे. सकाळी शोभायात्रा व ग्रंथदिंडीने कार्यक्रमाची सुरुवात होईल. दुपारी १ वाजता कार्यक्रमाची सांगता होणार आहे. जिल्ह्यातील भाषातज्ज्ञ, अभ्यासक, संशोधक तसेच मालवणीप्रेमींनी उपस्थित राहून मालवणी बोलीचा जागर साजरा करावा, असे आवाहन संयोजक प्रा. डॉ. गोविंद काजरेकर यांनी केले आहे.

