''प्लास्किटमुक्त कार्यालय'' संकल्पना राबवा
swt1525.jpg
17985
रवींद्र खेबुडकर
‘प्लास्किटमुक्त कार्यालय’ संकल्पना राबवा
रवींद्र खेबुडकर ः प्रशासकीय कामकाजात वापर टाळण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १५ ः पर्यावरणाचे रक्षण आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने प्लास्टिकचा वाढता वापर ही एक गंभीर समस्या बनली आहे. प्लास्टिक कचऱ्याचे विघटन होण्यास शेकडो वर्षे लागतात, ज्यामुळे सार्वजनिक आरोग्य व पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने ''प्लास्टिकमुक्त कार्यालय'' ही संकल्पना राबवून समाजासमोर एक आदर्श ठेवण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद मुख्यालय तसेच सर्व तालुका व ग्रामीण स्तरावरील अधिनस्त कार्यालयांनी प्लास्टिकचा वापर करू नये, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिले आहेत.
प्लास्टिक वापरावर बंदी घालताना श्री. खेबुडकर यांनी कार्यालयामध्ये एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू म्हणजेच प्लास्टिक पाणी बाटल्या, कप, ग्लास, प्लेट्स आणि स्ट्रॉ यांच्या वापरावर पूर्णतः बंदी घातली आहे. तसेच याला पर्याय म्हणून स्टील किंवा मातीची भांडी वापरण्यास सांगितले आहे. कार्यालयातील पिण्याच्या पाण्यासाठी प्लास्टिक बाटल्यांऐवजी स्टील व काचेच्या बाटल्या किंवा मातीच्या बाटल्यांचा, माठांचा वापर करावा. बैठकी दरम्यान पाहुण्यांना पाणी देण्यासाठी स्टील किंवा काचेच्या पेल्यांचा वापर करण्यात यावा, असेही या आदेशात नमूद केले आहे.
कागदी, काथ्याचे फोल्डर वापरण्याचे आदेश दिले आहेत. यात कार्यालयीन कामकाजात कागदपत्रे ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक फोल्डरचा वापर त्वरित थांबवावा. त्याऐवजी कागदी फोल्डर, पुठ्ठा फोल्डर किंवा काथ्या कापडी फोल्डरचा वापर करावा, पर्यावरणपूरक वस्तूंची (स्टील बाटल्या, ग्लास, कागदी फोल्डर्स आदी) खरेदी करण्यासाठी संबंधित विभागांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या ''सादील'' निधीचा विनियोग करावा, अशा सूचना केल्या आहेत. कार्यालयातील कर्मचारी व अभ्यागतांमध्ये जाणीव निर्माण करण्यासाठी कार्यालयाच्या दर्शनी भागात घोषवाक्ये प्रदर्शित करावीत. यात विविध प्रकारचा घोषवाक्ये लिहिण्याच्या सूचना करण्यात आल्या. या सूचनांचे प्रभावी पालन तत्काळ लागू करण्यात आले आहे. सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या अधिनस्त कार्यालयांचा आढावा घेऊन प्लास्टिक वस्तूंचे निर्मूलन झाल्याची खात्री करावी, असेही आदेशात नमूद केले आहे.

