संस्कृत उपकेंद्रात उद्या चर्चासत्र
संस्कृत उपकेंद्रात
उद्या चर्चासत्र
रत्नागिरी ः राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राज्य संस्कृत साहित्य अकादमीद्वारे आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे (रामटेक) भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रातील रत्नागिरी उपकेंद्राच्या सहयोगाने शनिवारी (ता. १७) कोकणातील विद्वानांचे संस्कृत साहित्यातील योगदान या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र आयोजित केले आहे. कोकणातील विविध विद्वानांनी कशारितीने संस्कृत भाषेत आणि साहित्यात योगदान दिले यावर विविध वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. उद्घाटन सत्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील प्रा. दिनेश रसाळ उपस्थित राहणार आहेत. चर्चासत्राच्या माध्यमातून कोकणातील विद्वानांची संस्कृत साहित्यातील भूमिका व योगदान यावर प्रकाश टाकला जाणार आहे. तसेच या द्वारे उपस्थितांना कोकणातील संस्कृत साहित्यिक व विद्वान यांच्या कार्याचा सुक्ष्म शोध घेण्याची संशोधनात्मक दृष्टी विकसित होण्यास सहाय्य प्राप्त होणार आहे. चर्चासत्रात सर्व सहभागींना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या चर्चासत्रात रत्नागिरीतील शिक्षक, शोधछात्र, विद्यार्थी आणि संस्कृतप्रेमी नागरिक यांनी आवर्जून नोंदणी करावी आणि उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुकांनी प्रा. अविनाश चव्हाण, स्वरूप काणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी सांगितले.
खेडमध्ये १ पासून
नाट्य अभिनय कार्यशाळा
खेड : आयसीएस महाविद्यालय, लिटिल थिएटर बालरंगभूमी संवर्धन समितीच्यावतीने १ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत जिल्हास्तरीय नाट्य अभिनय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेत अभिनेते व दिग्दर्शक डॉ. विजय केंकरे, संजय क्षेमकल्याणी, लेखक दत्ता सावंत अभिनयाचे धडे देणार आहेत. यातील कलावंतांना नाटक व चित्रपटात काम करण्याची संधीही मिळणार आहे. या वेळी संस्था कार्याध्यक्ष मंगेश बुटाला, उपाध्यक्ष नंदकुमार गुजराथी, गव्हर्निंग कौन्सिल चेअरमन ॲड. आनंद भोसले, विश्वस्त विलास बुटाला उपस्थित राहणार आहेत. पहिल्या ५० प्रशिक्षणार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार असून, इच्छुकांनी संस्था संचालक उत्तमकुमार जैन यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कार्याध्यक्ष बुटाला, बालरंगभूमी संवर्धन समिती प्रवर्तक रघुनाथ कासेकर यांनी केले आहे.
लोटे परिसरात
टाकाऊ अवशेष
खेड : तालुक्यातील लोटे पंचक्रोशीवासीय रासायनिक कारखानदारीमुळे आरोग्याशी झगडत असतानाच आता चिकन, मटण, मासळीच्या टाकाऊ अवशेषांची भर पडली आहे. याबाबत संबंधित यंत्रणेकडून कोणतीच कारवाई करण्यात आलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखानदारीमुळे आजूबाजूच्या गावातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. जल व वायुप्रदूषणामुळे इथले जीवनमान खालावत चालले आहे. आता टाकावू अवशेषांमुळेही ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पंचक्रोशीतील दाभिळ आवाशी, लोटे, घाणेखुंट, पीरलोटे या ठिकाणी मटण, चिकन, मासळी विक्री मोठ्या प्रमाणात होते; मात्र, विक्रीनंतर शिल्लक अवशेष आसपास फेकले जात आहेत. यावर लक्ष देण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

