टक्केवारीसाठी एजन्सी बदलली का?

टक्केवारीसाठी एजन्सी बदलली का?

Published on

swt१६३.jpg
18178
हर्षा ठाकूर

टक्केवारीसाठी एजन्सी बदलली का ?
हर्षा ठाकूरः देवगड पाणी प्रश्‍नावरून विरोधकांवर आरोप
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १६ः देवगड जामसंडे शहराला भविष्यात पाणी पुरवठा करण्यासाठी संभाव्य प्रस्तावित कोर्ले सातंडी प्रकल्पावरील नळपाणी योजनेची सुरूवातीची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडील एजन्सी बदलून खासगी संस्थेची नियुक्ती का करण्यात आली? असा प्रश्‍न ठाकरेगट शिवसेनेच्या महिला तालुका संघटक तथा माजी नगरसेविका हर्षा ठाकूर यांनी उपस्थित केला आहे. संबंधितांना टक्केवारी मिळणार नसल्यामुळे ही एजन्सी बदलण्यात आली का? अशी शंकाही त्यांनी यानिमित्तने उपस्थित केली.
येथील देवगड जामसंडे शहराच्या पाणी प्रश्‍नावरून सौ. ठाकूर यांनी विरोधकांना लक्ष्य केले आहे. याअनुषंगाने त्यांनी टिकास्त्र सोडले आहे. त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, कोर्ले सातंडी धरण प्रकल्पावरून संभाव्य प्रस्तावित नळपाणी योजनेची एजन्सी यापूर्वी नियुक्त केली होती. ती एजन्सी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अर्थात राज्य शासनाची होती. परंतु, ही संस्था शासनाची असल्यामुळे संबंधितांना टक्केवारी मिळणार नसल्यामुळे खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्याचे उदिष्ट नसून मंजूर सुमारे ९ कोटी २१ लाखाच्या योजनेत कमिशन खाणे व कोर्ले सातंडी प्रस्तावित नळयोजनेतून कमिशन मिळवणे हेच आहे. या योजनेसाठीच्या सुमारे १० टक्के लोकवर्गणीतून गोळा करायची सुमारे ९२ लाख रक्कम कशी भरणार याचे प्रथम स्पष्टीकरण द्यावे. यापूर्वीही देवगड जामसंडे शहरातील जनतेकडून तत्कालीन आमदार आप्पासाहेब गोगटे यांच्या कालावधीत दोन्ही ग्रामपंचायतींनी जनतेकडून लोकवर्गणी गोळा केली होती त्याचा अद्याप हिशोब दिलेला नाही. येथील जनतेची दिशाभूल केली जात असून शिरगांव पाडागर योजनेचे विद्युत बील थकित असल्याने पाणी पुरवठा होत नसल्याचे सांगितले गेले. परंतु, जुलै २०१८ च्या ठरावातून शहरातील जनतेला दर दिवशी होणारा पाच लक्ष लिटर पाणी पुरवठा याची आम्हाला गरज नाही, असा ठराव दिला आहे.
त्यावेळी चुकीची माहिती देऊन सभागृहाचीसुध्दा दिशाभूल केली आहे. वास्तविक त्यावेळी शहरातील नागरिकांची सभा बोलावून चर्चा करून निर्णय घेणे गरजेचे होते. तसेच मागील ९ वर्षात सुमारे चार कोटीचा निधी दहिबांव नळपाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन दुरूस्ती करण्यासाठी खर्ची घालण्यात आला आहे. ही रक्कम कोणाच्या घशात गेली याचा खुलासा प्रथम करावा. एका गळतीच्या अंदाजपत्रकामध्ये सुमारे १४ हजार प्रति गळती दराने पैसे काढून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला आहे. पंधरा दिवसात येथील पाणी पुरवठा सुरळित करण्याची वल्गना झाली. मात्र, अद्यापही जनतेला ३ ते ४ दिवसांनीच पाणी पुरवठा होत आहे. फक्त फोटोसेशन करून शायनिंग मारण्याचे काम सुरू आहे. पाईप लाईनचे आत्ताचे जोरात सुरू असलेल्या कामाचे सर्व श्रेय नगरपंचायतीचे संबधित कर्मचारी व कोल्हापूरचे ठेकेदार यांचे आहे. हे काम जलदगतीने होण्यामागे शहर विकास आघाडीने आयोजित केलेल्या बैठकीचे फलित आहे.

चौकट
राख रांगोळी नको
स्थानिक आमदार तथा पालकमंत्री नीतेश राणे आमचे राजकीय विरोधक असले तरीही त्यांनी या योजनेसाठी सुमारे ९ कोटी २१ लाख एवढा निधी उपलब्ध करून दिला. याबद्दल मी त्यांचे आभार मानण्यास कोणताही कमीपणा बाळगत नाही. परंतु, पालकमंत्री यांनी माकडाच्या हातात कोलीत देऊन पुन्हा या शहराची राख रांगोळी करू नये, अशी प्रतिक्रिया सर्व स्तरांतून व्यक्त होत असल्याचेही ठाकूर यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com