उद्यापासून पटवर्धन हायस्कूलमध्ये
मनाचे श्लोकपठण स्पर्धेची
उद्यापासून जिल्हास्तरीय फेरी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : पुण्यातील समर्थ भारत अभियान आणि सज्जनगड येथील समर्थ सेवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा उद्या (ता. १७) आणि १८ जानेवारी रोजी होणार आहे. ही स्पर्धा पटवर्धन हायस्कूलच्या नवीन इमारतीत दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत होईल.
या स्पर्धेतून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील १८ शाळांमधील ४४० विद्यार्थ्यांनी प्राथमिक फेऱ्यांमध्ये सहभाग घेतला होता. त्यामधून निवड झालेल्या २२५ गुणवंत विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. १५ फेब्रुवारीला राज्यस्तरीय स्पर्धा पुण्यात होणार आहे. १७ जानेवारी रोजी दुपारी ३ ते संध्याकाळी ५ या वेळेत पहिली ते दहावी या गटांसाठी स्पर्धा होणार आहे. या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून विशाखा भिडे, डॉ. राजीव नगरकर आणि प्रवीण जोशी उपस्थित राहणार आहेत. १८ जानेवारी रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खेळघर व बालवाडी गटांच्या स्पर्धा होणार आहेत. या दिवशी नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, बालरोगतज्ज्ञ डॉ. नीलेश शिंदे आणि डॉ. राजीव नगरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोकांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, सदाचार, आत्मशिस्त व सकारात्मक विचार रुजवणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. लहान वयातच समर्थांचे विचार आत्मसात करण्याची संधी या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मिळत असून, पालक, शिक्षक व समर्थ विचारांचे अभ्यासक यांच्याकडून या उपक्रमाचे विशेष स्वागत होत आहे, अशी माहिती समर्थ अभिनयाचे डॉ. राजीव नगरकर आणि रत्नागिरीतील संयोजिका डॉ. निशिगंधा पोंक्षे यांनी दिली.

