शासनाच्या आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा

शासनाच्या आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा

Published on

swt167.jpg
18188
नेरूर ः येथील (कै.) यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व रिसर्च सेंटरमध्ये कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिमेअंतर्गत आयोजित शिबिराचे उद्घाटन करताना सरपंच भक्ती घाडीगावकर. सोबत इतर मान्यवर.

शासनाच्या आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा
भक्ती घाडीगावकरः नेरूर येथे कर्करोग तपासणी, जनजागृती मोहिम
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १६ः नियमित आरोग्य तपासणी केल्यास भविष्यात उद्भवू शकणाऱ्या गंभीर आजारांपासून वेळीच बचाव करता येतो. त्यामुळे शासन व आरोग्य विभागातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या विविध आरोग्य तपासणी शिबिरांचा ग्रामस्थांनी आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन नेरूरच्या सरपंच भक्ती घाडीगावकर यांनी केले. बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेसारखी सेवाभावी संस्था व्यावहारिक नफा-तोट्याच्या पलीकडे जाऊन अशा उपक्रमांना सहकार्य करते, ही बाब खरोखरच कौतुकास्पद, अभिमानास्पद व अभिनंदनास पात्र असल्याचे त्यांनी नमूद केले.
नेरूर येथे सार्वजनिक आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद आरोग्य विभाग (सिंधुदुर्ग), तालुका आरोग्य कार्यालय कुडाळ तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र वालावल यांच्यावतीने कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिमेअंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. बॅ. नाथ पै शिक्षण संस्था संचलित कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र, नेरूर येथे हे शिबिर पार पडले. यात नेरूर, चेंदवण, वालावल व कुडाळ परिसरातील नागरिकांची तपासणी करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन सरपंच घाडीगावकर यांच्या हस्ते पार पडले.
त्या म्हणाल्या, ‘‘आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे नागरिकांना विविध आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्या गंभीर स्वरूप धारण करू नयेत, यासाठी अशा प्रकारच्या आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येते. नागरिकांनी कोणताही संकोच न करता या सुविधांचा लाभ घ्यावा.’’
या कार्यक्रमास वालावल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन जंगम, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. संतोष सावंत, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. दिगंबर करंबेळकर, डॉ. हर्षला शिंगाटे, तसेच बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य कल्पना भंडारी, प्रा. वैशाली ओटवणेकर आदी उपस्थित होते. याशिवाय टीना रॉडरिक्स, आरती पवार, प्रा. प्रथमेश हरमलकर आदींचीही उपस्थिती होती. वालावल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन जंगम यांनी शिबिराच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.
वालावल प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत नेरूर परिसरातील नागरिकांना कोणत्याही प्रकारची वैद्यकीय गैरसोय भासू दिली जाणार नाही, असे सांगितले. या शिबिरासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांनी बॅ. नाथ पै शिक्षण संस्था व कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्राचे विशेष आभार मानले. यावेळी उमेश गाळवणकर यांनी, (कै.) यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय, नेरूर व बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना जास्तीत जास्त वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस आहे. नागरिकांनी या सुविधांचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन केले. या शिबिराचा एकूण १४८ नागरिकांनी लाभ घेतला. प्रास्ताविक प्रा. वैशाली ओटवणेकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com