गावठी बाजारातून श्रमप्रतिष्ठा, विक्रीकौशल्याचा धडा
18193
गावठी बाजारातून श्रमप्रतिष्ठा, विक्री कौशल्याचा धडा
विद्यार्थ्यांचाही उत्साह; कट्टा येथील वराडकर हायस्कूलचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १६ : ग्रामीण भागातील पारंपरिक पिके, स्थानिक उत्पादने यांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी आणि त्यांच्यामध्ये श्रमप्रतिष्ठा तसेच विक्री कौशल्य विकसित व्हावे, या उद्देशाने वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा येथे गावठी आठवडी बाजाराचे आयोजन केले होते. या उपक्रमाला परिसरातील ग्रामस्थ, पालक आणि माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या बाजाराचे उद्घाटन शालेय समितीचे अध्यक्ष सुधीर वराडकर आणि संस्थेचे सहसचिव साबाजी गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव सुनील नाईक, मुख्याध्यापिका देवयानी गावडे उपस्थित होते. या वैशिष्ट्यपूर्ण बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी स्थानिक स्तरावर पिकविली जाणारी विविध धान्ये व उत्पादने विक्रीसाठी ठेवली होती. यामध्ये प्रामुख्याने गावठी उकडीचे तांदूळ, सुरय तांदूळ, कुळीथ, चवळी, वालीचे गर, नाचणी, शेंगा, गावठी हळद, खोबरेल तेल, कोकम, आगळ, गावठी अंडी, घावण पीठ, वडे पीठ, पिठी, कणगी, करांदे, सुरण, नारळ, शहाळी, सुके खोबरे, ताज्या गावठी भाज्या, बांबूची उत्पादने आणि मातीच्या वस्तू यांचा समावेश होता. विशेष आकर्षण म्हणून ‘स्काऊट गाईड’ विभागामार्फत ‘विद्यार्थी खरी कमाई’ स्टॉल लावला होता. यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या खाद्यपदार्थांची विक्री करून प्रत्यक्ष व्यावसायिक अनुभवातून अर्थार्जनाचे धडे गिरविले. या उपक्रमासाठी मुख्याध्यापिका सौ. गावडे, पर्यवेक्षक महेश भाट आदींचे मार्गदर्शन लाभले. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर, ॲड. एस. एस. पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, सचिव सुनील नाईक, सचिव श्रीमती विजयश्री देसाई, खजिनदार रवींद्रनाथ पावसकर आदींनी शुभेच्छा दिल्या.
---------------
कोट
विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना प्रत्यक्ष व्यवहार ज्ञान मिळावे आणि स्थानिक बाजारपेठेची ओळख व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
- देवयानी गावडे, मुख्याध्यापिका, वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा

