देवगडात पहिल्या दिवशी शून्य उमेदवारी अर्ज
देवगडात पहिल्या दिवशी
शून्य उमेदवारी अर्ज
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १६ ः तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीतील आजच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. केवळ संभाव्य उमेदवारांनी एकूण ९ उमेदवारी अर्ज घेतले आहेत. मात्र, त्यातील एकही अर्ज दाखल केलेला नाही. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी नितीन राऊत काम पहात आहेत. त्यांना तहसीलदार रमेश पवार सहकार्य करीत आहेत.
तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला. बुधवारपर्यंत (ता. २१) उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत. आलेल्या अर्जांची गुरुवारी (ता. २२) छाननी होणार आहे. तर २७ ला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी एकही अर्ज भरलेला नाही. संभाव्य इच्छुक उमेदवारांनी एकूण ९ उमेदवारी अर्ज घेतले असून त्यातील एकही अर्ज आज कार्यालयात प्राप्त नाही. पंचायत समितीसाठी ३ तर जिल्हा परिषदेसाठी ६ असे एकूण ९ उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती निवडणूक यंत्रणेने दिली.

