सदर- सूर्यपूजा ही आत्मसंघर्ष, धर्मनिष्ठा यांचे प्रतीक
तळपत्या सूर्याचे दैवीत्व............. लोगो
(४ जानेवारी पान ६)
सूर्यपूजा ही आत्मसंघर्ष,
धर्मनिष्ठा यांचे प्रतीक
भारतीय सांस्कृतिक इतिहासातील महाकाव्यकाल म्हणजे रामायण व महाभारत युग होय. या कालखंडात धार्मिक श्रद्धा, काव्यात्मक अभिव्यक्ती आणि नीतिकल्पना यांचा संगम झालेला दिसून येतो. वैदिक आणि पुराणिक युगातील तत्त्वचिंतनातून पुढे आलेली सूर्यपूजा महाकाव्यकथांमध्ये अधिक व्यक्तिनिष्ठ, नायक-केंद्रित आणि धार्मिक-नैतिक मुल्यांनी परिपोषित स्वरूपात प्रकट होताना दिसते. रामायण आणि महाभारत या दोन्ही ग्रंथांमध्ये सूर्यदेवतेचे उल्लेख केवळ धार्मिक अंगानेच नव्हे तर सामाजिक, राजकीय आणि नैतिक दृष्टिकोनातूनही फार महत्त्वाचे ठरतात.
-rat१७p८.jpg-
P26O18398
--मिलनाथ पातेरे
-----
रामायणामध्ये श्रीराम हा सूर्यवंशी राजा म्हणून ओळखला जातो. वाल्मिकी रामायणाच्या प्रारंभीच इक्ष्वाकू वंशाचा उल्लेख असून, तो वंश सूर्यापासून उद्भवलेला मानला गेला आहे. यावरूनच रामाचे दैवी आणि नैतिक अधिष्ठान सूर्याशी संबंधित आहे, हे स्पष्ट होते. विशेषतः युद्धकाळात रामाला सूर्यस्तुतीतून आत्मबल मिळवणारा एक अत्यंत प्रभावी प्रसंग आहे तो म्हणजे ‘आदित्यहृदय स्तोत्र’. लंकेच्या रणभूमीवर रावणाशी अंतिम युद्धाला सामोरे जाताना ऋषी अगस्त्य रामाला हे स्तोत्र सांगतात. या स्तोत्रात सूर्याचे तेज, त्याचे विश्वव्यापी रूप, कालाचं नियंत्रण आणि रोगांवरील उपाय म्हणून केलेलं वर्णन अत्यंत प्रभावशाली आहे. येथे सूर्यपूजा ही आत्मशक्ती जागवण्याचे साधन ठरते.
महाभारतामध्येही सूर्यपूजेचे तितकेच महत्त्वाचे स्थान आहे, विशेषतः कर्णाच्या जन्मकथेत. कर्ण हा सूर्यदेवतेचा पुत्र असल्याचे मानले गेले आहे. कुंतीला ऋषी दुर्वासांनी दिलेल्या वरामुळे तिने सूर्यमंत्राचा जप केला आणि त्यातून सूर्यदेवतेच्या तेजातून कर्णाचा जन्म झाला. ही कथा केवळ एक पुराणकथा नसून, सूर्याच्या तेजाची मानवी स्वरूपात अवतरण घडवणारी कल्पना आहे. कर्णाच्या आयुष्यात सत्य, निष्ठा, दानशीलता आणि साहस यांचे दर्शन होते जे सूर्याच्या गुणधर्माशी सुसंगत आहे.
या दोन्ही महाकाव्यांमध्ये सूर्यपूजा ही दैवी शक्ती आणि मानवी नियतीमधील एक दुवा बनलेली दिसून येते. यामध्ये सूर्य ही केवळ उपास्य देवता राहिलेली नसून, तो वंशाचा आधार, युद्धातील प्रेरणा, नीतीचा मार्गदर्शक आणि आत्मबलाचा स्रोत अशा विविध स्वरूपात समोर येताना दिसून येतो. वैदिक मंत्रातील सविता येथे आदित्याच्या स्वरूपात बदलतो आणि पुढे मानवाच्या जीवनात थेट हस्तक्षेप करणारा आणि मनुष्यावर कृपा करणारा देव बनतो.
महाकाव्यकालातील सूर्यपूजेमध्ये एक वैशिष्ट्य स्पष्ट दिसते, ते म्हणजे व्यक्तिकेंद्रित श्रद्धा. रामाने आदित्यहृदय स्तोत्राद्वारे विजय प्राप्त केला, कर्णाने सूर्याचे पुत्रत्व मानून आपली नीतिमूल्ये पाळली, अशा अनेक उदाहरणांमधून सूर्यपूजा ही केवळ धार्मिक क्रिया न राहता व्यक्तिगत जीवनातील संघर्षांशी निगडित शक्ती ठरते. या श्रद्धेमुळे सूर्यपूजा लोकमानसात अधिक खोलवर रूजते. या काळात सूर्याला उद्देशून केलेली स्तोत्रे, पूजाविधी, उपवास आणि कथा या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून सूर्यपूजा ही पुराणकथा, भक्ती, आत्मसंघर्ष आणि धर्मनिष्ठा यांचे प्रतीक बनते. वैदिक तत्त्वज्ञानाच्या तुलनेत येथे भावना, भक्ती आणि वीरतापूर्ण आस्था यांचे प्राबल्य अधिक आहे.
(लेखक इतिहास आणि पुरातत्त्व अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

