संगमेश्वर-नागवेलीच्या पानाला महागाईची ''लाली
rat19p4.jpg -
18778
संगमेश्वर ः बाजारपेठेतील दुकानावर विक्रीसाठी ठेवलेली पाने.
------------
नागवेलीच्या पानाला महागाईची ‘लाली’
आठवड्यात दर तिप्पट ; कर्नाटक, तामिळनाडूतील पावसाचा परिणाम, शेकड्याचा दर १२० रुपयांवर
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १९ ः कोकणच्या ग्रामीण भागात आजही चंची अथवा पानाचा डबा सोबत बाळगून पान सुपारी खाणारी अनेक मंडळी आहेत. पानाच्या अन्य साहित्याचे दर वाढत गेले तरीही नागवेलीची पानं मात्र केवळ ४० रुपये शेकडा या दराने मिळत होती. गेल्या आठवडाभरात मात्र हा दर तिप्पट झाला आहे. संगमेश्वर वगळता अन्यत्र हाच दर आणखी वाढला असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या संगमेश्वरच्या पान बाजारात नागवेलीची पानं १२० रुपये शेकडा या दराने विकली जात आहेत.
कोकणच्या ग्रामीण भागात पान सुपारी जवळ असणारं शेतकरी वर्ग अथवा अन्य मंडळींचं नातं सर्वश्रुत आहे. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत अनेकदा पान सुपारी खाल्ली जाते. काही मंडळीना तर अर्ध्या एक तासाने पान सुपारी खाण्याची सवय असते. अशा मंडळींची तोंड काताने कायमचीच लाल झाल्याचे पाहायला मिळते. चंचीतील पानाची देवाण घेवाण हा एक शिष्टाचार समजला जातो. अनेक कप्पे असलेली पानांची चंची अथवा डबा सोबत ठेवायला खवय्ये विसरत नाहीत.
एका पानाने अनेक गोष्टी साध्य करता येतात. दोन माणसं पारावर अथवा सार्वजनिक ठिकाणी भेटली तर, गप्पा सुरु होण्याआधी चंचींतील पान सुपारीची देवाणघेवाण सुरु होते. कात खाल्ल्यावर आधी तोंड रंगते आणि नंतरच गप्पांचा फड रंगतो. चंचीत पानं कमी असतील तर, वेळ प्रसंगी अर्ध-अर्ध पान एकमेकांना दिले जाते. मात्र पानाची देवाणघेवाण थांबत नाही. अर्ध्या एक तासाच्या गप्पात किमान चार पाच वेळा तरी पान खाल्लं जातं.
सुपारी सध्या ५५० रुपये किलो या दराने विकली जात आहे. कधी तंबाखूचा दर वाढतो तर, कधी काताचा वाढतो. हे दर वाढले तरी नागवेलीचे पान मात्र त्याच्या नेहमीच्या दरावर स्थिर होते. संगमेश्वरच्या बाजारपेठेत गत आठवड्यापर्यंत केवळ ४० रुपये शेकडा या दराने मिळणाऱ्या नागवेलीच्या पानाने आठवडाभरात मोठी भरारी घेतली असून हा दर तिप्पट होत थेट १२० रुपये शेकड्यावर पोहचला आहे. असं असलं तरीही पान सुपारी खाणाऱ्या मंडळींकडून पानाला असणारी मोठी मागणी कायम आहे.
कोट
नागवेलीच्या पानांना संगमेश्वरमध्येच नव्हे तर, संपूर्ण कोकणात मोठी मागणी असते. पानाच्या साहित्यात नागवेलीची पाने आणि चुना यांचेच दर स्थिर असतात. मात्र कर्नाटक, तामिळनाडू इकडे अवकाळी पाऊस झाल्याने नागवेलींना याचा फटका बसला आणि उत्पादन घटले. यामुळे पानांचे दर वाढत असून सध्या हा दर ४० शेकडा वरून १२० रुपये झाला आहे. अन्य ठिकाणी हाच दर १५० ते २०० आहे. आम्ही संगमेश्वरला मात्र आमच्या ग्राहकांसाठी पान विक्री व्यवसायातून फारसा फायदा न घेता नागवेलीच्या पानांची विक्री करत आहोत. नजीकच्या काळात पानांचे दर मात्र आणखी वाढणार आहेत.
- महेश सावंत, पान विक्रेते, संगमेश्वर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

