गौरवगाथा ः कोकणरत्नांच्या कर्तृत्वाचा सन्मान - लेख

गौरवगाथा ः कोकणरत्नांच्या कर्तृत्वाचा सन्मान - लेख

Published on

(गौरवगाथा ः पुरवणी ः लेख )
-----
गौरवगाथा ः कोकणरत्नांच्या कर्तृत्वाचा सन्मान

कोकण म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो अथांग समुद्र, हिरवीगार वनराई आणि साध्या-भोळ्या माणसांचा प्रदेश. पण आजचा कोकण केवळ निसर्गसौंदर्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. इथल्या मातीने अनेक जिद्दी व्यक्तिमत्त्वे घडवलेली आहेत, ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने कोकणच्या सीमा ओलांडून आपली स्वतंत्र ओळखही निर्माण केलेली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील अशा कर्तृत्ववान व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना समाजापुढे आणून त्यांची गौरवगाथा ‘सकाळ’ने ‘ब्रँड्स ऑफ कोकण’ या अभिनव संकल्पनेतून मांडलेली आहे. ज्यांनी समाजमनावर आपल्या कामाचा ठसा उमटवताना कोकणला वेगळी ओळख देणाऱ्या अशा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडक ५७ रत्नांचा सन्मान २३ जानेवारीला रत्नागिरीत होत आहे. या निमित्ताने ....!
- राजेश कळंबटे, रत्नागिरी
-----
कोकणातील माणसे कष्टाळू आहेतच, पण अलीकडच्या काळात त्यांनी कल्पकता आणि आधुनिकतेची कास धरली आहे. यातून तयार झालाय ‘ब्रँड्स ऑफ कोकण,’ त्यांचा गौरव म्हणजे केवळ नावांचा सत्कार नाही, तर त्या नावामागे असलेल्या संघर्षाचा, नावीन्याचा आणि जिद्दीला हा सलाम आहे. शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, उद्योग, राजकारण, लघुउद्योग, बांधकाम, कोकणी मेव्याशी निगडीत छोटे उद्योग, सहकार, प्रशासनात काम करताना जिल्ह्याला विकासात्मक दिशा देण्यासाठी झटणारी व्यक्तिमत्व, ज्यांचे योगदान हे येणाऱ्या पिढीसाठी दीपस्तंभासारखे ठरणार आहे. शिक्षण हा कोणत्याही समाजाचा कणा असतो. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षणाची गंगा घराघरात पोहोचवण्यासाठी अनेक संस्थाचालकांनी आपले आयुष्य वेचलेले आहे. केवळ साक्षरता नव्हे, तर कौशल्य आधारित शिक्षण देऊन कोकणातील तरुणांना जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी तयार करणाऱ्यांची निवड या पुरस्कारासाठी केली आहे. दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांवर ज्ञानाचा प्रकाश पोहोचवण्याचे काम या ‘ब्रँड्स’नी केले आहे.
‘सकाळ’ माध्यम समूहाने ‘ब्रँड्स ऑफ कोकण’ या संकल्पनेतून लाल मातीतील, कोकणातील हिऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासात प्रशासकीय अधिकाऱ्यांचे योगदान मोलाचे आहे. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी आपल्या कार्यकुशलतेने जिल्ह्याला विकासाच्या मार्गावर नेले आहे. प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी आपल्या उपक्रमशीलतेतून प्रशासनाचा चेहरा अधिक लोकाभिमुख केला. विशेषतः रत्नागिरीच्या नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यात डॉ. जयप्रकाश रामानंद यांचा वाटा अत्यंत महत्त्वाचा आहे. तसेच, डॉ. संघमित्रा फुले यांनी आधी जिल्हा शल्य चिकित्सक आणि सध्या मनोरुग्णालयाच्या अधिक्षिका म्हणून काम करताना रुग्णांप्रति दाखवलेली संवेदनशीलता हा एक आदर्श आहे.
शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या व्यक्तींमुळेच ग्रामीण भागातील तरुणांना प्रगतीची दारे उघडली जातात. त्यात रिगल एज्युकेशन सोसायटीचे नाव घेतले जाते. विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान बनून उच्चशिक्षणाची कवाडे खुली करून देण्यात जे. डी. पाटील यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्यासारख्या शिक्षकांचा यामध्ये समावेश केला गेला आहे. ‘आनंददायी शिक्षण’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे गुरुकुल, आदर्श शिक्षकाची भूमिका बजावत नवी पिढी घडवणारे हृदयनाथ गावडे यांच्यासारखे शिक्षक, शून्यातून विश्व निर्माण करणारे कोकणातील उद्योजक, तांत्रिक कौशल्यातून इतरांच्या स्वप्नांचा पाया रचणारे अभियंता आदित्य चौगुले, तर इंजिनिअरिंग क्षेत्रात आपली नाममुद्रा उमटवणारे मिलिंद करंबेळकर अशा व्यक्तींचा गौरवगाथेत समावेश केलेला आहे. टाइल्स उद्योगात नावीन्य आणणारे उद्योजक असोत वा परिवहन क्षेत्रातील यशस्वी व्यावसायिक, यांनी कोकणच्या अर्थव्यवस्थेला गती दिली आहे. ‘माणसे जोडणारा वेल्डर’ अशी ओळख असलेले अशफाक मापारी हे जिद्दीचे प्रतीक आहेत, तर गजानन रेवडेकर यांनी कोकणातून मुंबईत स्थलांतर करूनही आपल्या मेहनतीने उत्तुंग प्रगती साधली आहे.
कोकणची अस्मिता असलेल्या आंबा-काजू व्यवसायात नव्या पिढीने क्रांती केली आहे. ‘दादा’ सामंत यांनी हापूस उत्पादनात आपला दरारा निर्माण केला, तर कल्याणी मलुष्टे यांनी महिला उद्योजिका म्हणून आंबा व्यवसायातही यश मिळवले. काजू व्यवसायातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणारे गणपत देसाई, सहकार क्षेत्रात दापोली अर्बन बँकेने जिल्ह्याचा आर्थिक कणा म्हणून ओळख निर्माण केली आहे. दंतचिकित्सक डॉ. मीरा बाणावलीकर आणि होमिओपॅथीत ओळख निर्माण करणाऱ्या डॉ. स्नेहल गोवेकर यांनी जनसामान्यांना दर्जेदार आरोग्य सेवा दिली. समाजकारणात सचिन हातणकर यांच्यासारखे लोकसेवक आणि ग्रामविकासाचा रथ हाकणारे कार्यकर्ते कोकणच्या विकासात हातभार लावत आहेत. पर्यटनाच्या बाबतीत सुवर्णदुर्ग फाउंडेशनने ‘क्रीडा पर्यटन’ ही नवी संकल्पना राबवून पर्यटकांना कोकणाकडे आकर्षित केले आहे.
कोकणच्या खाद्यसंस्कृतीचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून ओंकार रहाटे आणि फूड कल्चरमध्ये नावीन्य जपणाऱ्या रश्मीन दुर्वे यांनी कोकणी चव जगापर्यंत पोहोचवली. समाजकार्यात वेगळेपण जपत तुषार साळवी यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. माणगाव येथील श्री दत्तमंदिर हे केवळ धार्मिक स्थळ न राहता अध्यात्माचा समृद्ध वारसा जपणारे केंद्र बनले आहे. चित्रकला आणि कलेचा वारसा जपणाऱ्या कलाकारांनी कोकणचे सौंदर्य कॅनव्हासवर जिवंत ठेवले आहे. त्यांच्यातील कलाकृतीला इतरांपुढे नेण्याचे काम ‘सकाळ’ने केले आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही ५७ रत्ने लोकांसाठी आदर्शवत अशीच आहेत.
सकाळ माध्यम समूहाने नेहमीच विधायक पत्रकारितेचा वारसा जपला आहे. ‘ब्रँड्स ऑफ कोकण’च्या माध्यमातून त्यांनी केवळ बातम्या न देता, समाजातील आदर्श व्यक्तिमत्त्वे शोधून त्यांना प्रकाशात आणले आहे. ५७ मान्यवरांची निवड करताना चोख निकषांआधारे पारख करण्यात आली आहे, ज्यामुळे या पुरस्काराची उंची अधिक वाढली आहे. अशा उपक्रमांमुळे सुप्त गुणांना वाव मिळतो आणि इतरांनाही प्रेरणा मिळते. हा गौरव सोहळा म्हणजे केवळ समारंभ नाही, तर तो कोकणच्या भविष्यातील विकासाचा एक ‘रोडमॅप’ आहे. जेव्हा एखादा उद्योजक किंवा सामाजिक कार्यकर्ता सन्मानित होतो, तेव्हा त्याच्यासोबत त्याचे विचार आणि कार्यपद्धती देखील अधोरेखित होते. गौरवगाथेद्वारे सन्मान करण्यात आलेले हे मान्यवर भविष्यात कोकणच्या सर्वांगीण विकासाचे नेतृत्व करतील, यात शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com