दाखल उमेदवारी संख्या शून्यच
दाखल उमेदवारी संख्या शून्यच
युती सावध पवित्र्यात; शिवसेना ठाकरे गट ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १९ ः उमेदवारी अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशीही जिल्हा परिषद तसेच आठही पंचायत समितीसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. आता केवळ अर्ज दाखल करण्यासाठी दोनच दिवस शिल्लक राहिल्याने उमेदवारांची उमेदवारी दाखल करण्याची लगबग सरू होणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात महायुती झाल्याने संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी भाजप, शिवसेनेने आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत, तर महायुतीतील बंडखोर उमेदवारांना आपल्या पक्षात ओढता येईल, या अपेक्षेमुळे ठाकरे शिवसेनेने ‘वेट अँड वॉच’ अशी भूमिका घेतली आहे.
जिल्हा परिषद आणि आठही पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका ५ फेब्रुवारीला होत आहेत. यासाठी १६ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाली; मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज चौथा दिवस असतानाही एकाही उमेदवाराने जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. आता केवळ मंगळावर, बुधवार असे दोनच दिवस उमेदवारी दाखल करण्यास शिल्लक राहिले आहेत. यामुळे शेवटच्या या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती निश्चित झाली आहे; मात्र महाविकास आघाडीबाबत अद्याप काहीच बोलणी होताना दिसत नाहीत. महायुती ५० पैकी ३१ जिल्हा परिषद मतदारसंघ भाजपसाठी तर १९ जिल्हा परिषद मतदारसंघ शिवसेनेसाठी निश्चित झाले आहेत, तर १०० पैकी ६३ पंचायत समिती गण भाजपसाठी आणि ३७ पंचायत समिती गण शिवसेनेसाठी सोडले गेले आहेत. जागा वाटप निश्चित झाल्यानंतर त्यानुसार मतदारसंघ भाजप आणि शिवसेनेसाठी निश्चित करण्यात आले; मात्र यावेळी भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी पूर्वतयारी केलेले मतदारसंघ मित्रपक्षांना गेल्याने या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत मोठी नाराजी पसरली आहे. ओरोस मंडळमधील भाजपच्या प्रमुख ४३ पदाधिकाऱ्यांनी दिलेले राजीनामे हे त्याचे उदाहरण आहे.
त्यामुळे अनेकांनी बंडखोरी करण्याची तयारी सुरू केली आहे. आपल्याच घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून बंडखोरी होणार असल्याने भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांची यादी आज सायंकाळपर्यंत जाहीर केली नव्हती. ही यादी उद्या (ता. २०) सकाळी अथवा रात्री उशिरा दाखल होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर महायुतीतील नाराज कार्यकर्त्यांना आपल्याकडे ओढण्याचा ठाकरे शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांनीही आपल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केलेली नाही. परिणामी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज चौथ्या दिवशीही जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीसाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही. आता मंगळावर, बुधवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडणार आहे. याचा ताण शेवटच्या दोन दिवसांत निवडणूक यंत्रणेवर येणार आहे.
....................
भाजपने घेतल्या मुलाखती
सावंतवाडी विधानसभेतील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती आज येथील भाजपच्या ''वसंतस्मृती'' या जिल्हा कार्यालयात घेतल्या. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शैलेंद्र दळवी, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आदी प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती.
..................
आतापर्यंत ३४१ अर्ज वितरित
जिल्ह्यात एकही उमेदवारी अर्ज जिल्हा परिषद अथवा पंचायत समित्यांसाठी दाखल झालेला नसला तरी आतापर्यंत ३४१ कोरे उमेदवारी अर्जांचे वितरण झाले आहे. त्यात १६ रोजी ५८, १७ रोजी ९५ आणि १९ रोजी १८८ अशाप्रकारे उमेदवारी अर्ज वितरण झाले आहे. वैभववाडी २६, देवगड २१, कणकवली ६३, मालवण २८, कुडाळ ६५, सावंतवाडी ५१, वेंगुर्ले ५६, दोडामार्ग ३१ अशाप्रकारे तालुकानिहाय उमेदवारी अर्ज वितरण झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

