चिपळूणमध्ये तिरंगी लढतीची शक्यता

चिपळूणमध्ये तिरंगी लढतीची शक्यता

Published on

19064


जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक - लोगो

चिपळूणमध्ये तिरंगी लढतीची शक्यता
शिवसेना- भाजप युती निश्चित; राष्ट्रवादीची वेगळी चूल शक्य
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २० : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेना - भाजप युतीने जोरदार तयारी केली आहे. युतीच्या उमेदवारांची तालुक्यात अनेक ठिकाणी ठाकरे गटाशी तर काही ठिकाणी राज्यात सत्तेत असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पक्षाबरोबर लढत होणार आहे. त्यामुळे चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघात तिरंगी लढती होतील, असा अंदाज बांधला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने उमेदवार निश्चित केले आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार रमेश कदम यांनी आपल्या पदासह सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याने चिपळूणमध्ये हा पक्ष नेतृत्वहीन झाला आहे. नुकत्याच झालेल्या चिपळूण नगरपालिका निवडणुकीत महायुती झालेली नाही; मात्र शिवसेना-भाजप युती एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे गेली तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरला होता. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला पालिका निवडणूक सोबत न घेण्याची भूमिका शिवसेना भाजपने घेतली होती. रत्नागिरी जिल्ह्यात ही कायम राहिली. पालिका निवडणुकीमध्ये यश संपादन केल्यानंतर युतीचा आत्मविश्वास वाढला त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीला सोबत न घेण्याचा निर्णय युतीने घेतला आहे.
गेल्या महिनाभरापूर्वी झालेल्या चिपळूण नगरपालिका निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) युतीने नगराध्यक्षपदासह १६ जागांवर विजय संपादन केला. शिवसेना (शिदेंगट) ९ तर भाजपने ७ जागांवर यश संपादन केले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन दोन, शिवसेना उबाठा ५, काँग्रेसचे ३ उमेदवार विजयी झाले. विशेष म्हणजे चिपळूणमधील जनतेने नवख्या उमेदवारांना चिपळूण नगरपालिकेवर निवडून पाठवले आहे. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने स्वबळाची तयारी करून उमेदवार निश्चित केले आहे. त्यांनी प्रचाराला सुरवात केली आहे. शिवसेना-भाजपचे उमेदवार जाहीर झाले आहेत. त्यांचाही प्रचार सुरू झाला आहे.

कोट
शहरातील मतदारांनी आम्हाला पालिका निवडणुकीच्या निमित्ताने साथ दिली. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीतही आम्हाला मतदार साथ देतील. भाजपला या निवडणुकीत प्रथमच चिपळूणमधून यश मिळेल.
- प्रशांत यादव, भाजप

Marathi News Esakal
www.esakal.com